उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 07:40 AM2024-07-03T07:40:28+5:302024-07-03T07:40:57+5:30
डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अविरोध निवड झाल्यास, बायडेन यांची पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होणे अपेक्षित होते
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचे वैशिष्ट्य असलेला पहिला दूरचित्रवाणी वादविवाद कार्यक्रम पार पडला असून, त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्विवादपणे बाजी मारली आहे. असे वादविवाद हे गत काही काळात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य बनले असून, प्रत्येक निवडणुकीपूर्वी असे एक किंवा दोन कार्यक्रम होतात. त्यामध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार समोरासमोर येऊन ताज्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करतात. प्रामुख्याने कुंपणावरील मतदारांना नजरेसमोर ठेवून आयोजित केल्या जाणाऱ्या या वादविवाद कार्यक्रमांमधून तयार होणाऱ्या जनमताच्या आधारेच अलीकडे निवडणुकीचे निकाल निश्चित होतात.
यावर्षीचा असा पहिला वादविवाद एवढा एकतर्फी झाला, की डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चक्क निवडणुकीतून माघार घ्यायला हवी, असा सूर उमटू लागला आहे. केवळ प्रसारमाध्यमेच नव्हेत, तर डेमोक्रॅटिक पक्षातूनही तशी मागणी होऊ लागली आहे. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, शिकागो ट्रिब्यून, द अटलांटा जर्नल, द इकॉनॉमिस्ट यासारख्या प्रमुख वर्तमानपत्रांनी बायडेन यांना आत्मपरीक्षण करण्याचे, निवडणुकीतून माघार घेण्याचे सल्ले दिले आहेत. बायडेन यांचे वय आणि वादविवाद कार्यक्रमातील त्यांच्या कामगिरीमुळे सत्ता कायम राखण्याची डेमोक्रॅटिक पक्षाची संधी धूसर होऊ शकते, असे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षातही अस्वस्थता वाढीस लागली आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि देणगीदार त्यांच्या चिंता उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत.
मॅसॅच्युसेट्सच्या राज्यपाल मौरा हिली यांनी तर प्रचार मोहिमेचे तातडीने पुनरावलोकन करण्याची गरज प्रतिपादित केली आहे. एवढेच नव्हे, तर निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी मजबूत नेतृत्व गरजेचे असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले आहे. प्रचार मोहिमेसाठी देणग्या गोळा करण्यातही डेमोक्रॅटिक पक्ष पिछाडला आहे. एकट्या एप्रिल महिन्यातच ट्रम्प यांनी बायडेन यांच्या तुलनेत तब्बल २५ दशलक्ष डॉलर्स जादा गोळा केले. परिणामी, ट्रम्प यांची प्रचारयंत्रणा मजबूत झाली आहे. कुंपणावरील मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी ट्रम्प यांना त्याचा लाभ होणार आहे. या सर्व घडामोडींमुळे डेमोक्रॅटिक पक्षात पर्यायी उमेदवाराचा शोध घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बायडेन यांनी माघार घेऊन एखाद्या युवा, उमद्या चेहऱ्याला संधी देणे, हाच पक्षासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत पक्षाचे काही नेते उघडपणे मांडू लागले आहेत. त्यासाठी कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅव्हीन न्यूसम, वाहतूकमंत्री पीट बुडजज, अशी काही नावेही समोर येऊ लागली आहेत. अर्थात, या टप्प्यावर उमेदवार बदलणे सोपेही नाही. असा निर्णय पक्षातील एकजुटीच्या मुळावरही उठू शकतो.
डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अविरोध निवड झाल्यास, बायडेन यांची पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होणे अपेक्षित होते; पण त्यांच्याच सूचनेनुसार नेहमीपेक्षा लवकर झालेल्या वादविवाद कार्यक्रमाने सारेच मुसळ केरात जाण्याची परिस्थिती निर्माण केली आहे. दबाव वाढत असला तरी बायडेन मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम दिसत आहेत. गर्भपाताचा हक्क, आरोग्य सुविधा आणि आर्थिक स्थैर्य यासारख्या मुद्द्यांवर जोर दिल्यास, मतदारांशी सूर जुळू शकतील आणि ट्रम्प यांना मात देता येईल, असा युक्तिवाद त्यांच्या समर्थकांतर्फे केला जात आहे; परंतु निवडणूक जशी जवळ येईल, तसा बायडेन यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यासाठी आवाज बुलंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षापुढे मोठाच पेच निर्माण झाला आहे.
बायडेन यांच्यामागे ठामपणे उभे राहून कमजोर पडत असलेल्या त्यांच्या प्रचार मोहिमेत प्राण फुंकायचे, की ट्रम्प यांचा सामना करण्यासाठी एखादा युवा, उमदा उमेदवार निवडायचा हा निर्णय पक्षाला लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. त्यासाठी जेवढा उशीर होईल, तेवढी मोठी किंमत पक्षाला नोव्हेंबरमध्ये होणार असलेल्या निवडणुकीत चुकवावी लागू शकते. काही दिवसांपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षासाठी निवडणूक कठीण नसल्याचे चित्र दिसत होते; पण पहिल्या राष्ट्राध्यक्षीय वादविवादामुळे ते पालटले आहे. पक्षाचा उमेदवारच पक्षासाठी संकट बनला आहे. वादविवाद कार्यक्रमातील बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू झाले नाहीत, तर पक्षाच्या भविष्यकालीन नेतृत्वाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पक्ष या संकटाला कसा तोंड देतो, या प्रश्नाचे उत्तर अमेरिकेच्याच नव्हे, तर जगाच्याही भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे!