संध्याकाळी टीव्ही बंद करणारं अन् पोरांना भाकरी भाजायला शिकवणारं पश्चिम महाराष्ट्रातील गाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 08:18 AM2022-11-02T08:18:21+5:302022-11-02T08:19:08+5:30

संध्याकाळी टीव्ही बंद करणारं गाव, मुलग्यांना भाकरी भाजायला शिकवणारं गाव... पश्चिम महाराष्ट्रातल्या ‘बदलां’चा वेध!

The village that turns off the TV in the evening in western Maharashtra! | संध्याकाळी टीव्ही बंद करणारं अन् पोरांना भाकरी भाजायला शिकवणारं पश्चिम महाराष्ट्रातील गाव!

संध्याकाळी टीव्ही बंद करणारं अन् पोरांना भाकरी भाजायला शिकवणारं पश्चिम महाराष्ट्रातील गाव!

Next

- श्रीनिवास नागे

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातलं मोहित्यांचं वडगाव. पहिल्या मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक, दिवंगत वृक्षमित्र धों. म. मोहिते या अवलियाचं हे गाव. संध्याकाळी ७ वाजता इथल्या ग्रामपंचायतीवर बसवलेला भोंगा वाजतो. त्या कर्ण्यावरून आठवण करून दिली जाते आणि घराघरातले टीव्ही पटाटा बंद होतात. मोबाईल खाली ठेवले जातात. दीड तास सगळं बंद. बायका टीव्हीसमोरून हलतात. चुलीसमोर जातात, तर पोरं अभ्यासाला. या वेळेत पोरं रस्त्यावर दिसली की, त्यांना अभ्यासाची आठवण करून देत घरी पाठवलं जातं. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या कचकड्याच्या दुनियेत गुरफटलेल्या बायकांना आणि मोबाइलच्या मोहजालात अडकत चाललेल्या पोरांना आभासी जगापासून वास्तवात आणण्याचा हा प्रयत्न!

शेजारच्या पलूस तालुक्यातल्या भिलवडीत सकाळी नऊला भोंगा सुरू होतो. त्यावरून सूचना दिली जाते आणि सगळे स्तब्ध होतात. रस्त्यावरच्या गाड्याही जागेवर थांबतात. लोक असतील तिथं उभं राहतात. राष्ट्रगीत सुरू होतं. बावन्न सेकंदांनंतर पुन्हा सगळे आपापल्या कामाला लागतात. उत्साहानं आणि देशभक्तीची प्रेरणा घेऊन. हा दोन वर्षांपासूनचा पायंडा, व्यापारी संघटनेनं पाडलेला. कुलाळवाडी हे जत तालुक्यातल्या पूर्व भागातलं ऊसतोड मजुरांचं गाव. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की, पुरुषमाणसं बायका-पोरांना घेऊन ऊसपट्ट्यातली गावं जवळ करतात. दिवसभर बापयगडी, बायका ऊसतोड करण्यात गुंततात, तेव्हा पालावर साताठ वर्षांवरची पोरंच कच्च्याबच्च्यांना सांभाळत असतात. आईबापामागं जाताना गाव सोडल्यामुळं शाळेत जाणाऱ्या पोरांची शाळा सुटते.

साखर कारखान्यांनी काढलेल्या साखरशाळाही चालत नाहीत. या पोरांना गावाकडं ठेवता येत नाही, कारण घरात मागं राहिलेली म्हातारी-कोतारी कशीबशी जगत असतात, मग या पोरांना भाकरतुकडा कोण करून घालणार? त्यांना कोण सांभाळणार? त्यांच्या वाट्याला आबाळच. यावर उपाय म्हणून कुलाळवाडी गावातल्या गुरुजींनी पोरांना चुलीवर भाकरी करायला शिकवलं. भाकरी करण्याच्या स्पर्धा घेऊन बक्षिसं दिली. ऐंशी-नव्वद पोरं भाकरी करायला शिकली आणि त्यांची आईबापामागं जायची फरफट थांबली. ती गावात थांबून शाळेतच शिकू लागली.

गावानंही त्यांना जगण्याचं बळ दिलं. सांगलीजवळच्या बिसूरसारख्या काही गावांनी मृताच्या रक्षाविसर्जनालाच सर्व विधी आटोपून सुतक संपवायचा निर्णय घेतला. त्यात मराठा समाजातल्या जाणत्यांनी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांत शेजारच्या गावांतल्या भावक्यांनीही तोच कित्ता गिरवला. अलीकडं पर्यावरण जपण्यासाठी गावं शहाणी व्हायला लागलीत. मृताची रक्षा नदी-तलावाच्या पाण्यात विसर्जित करण्याऐवजी झाडांना घालण्याचा आदर्श समोर ठेवला जातोय.

तिकडं कोल्हापुरातल्या हेरवाड गावानं तर पुढचं पाऊल टाकलं. गावात विधवा प्रथेला मूठमाती दिली. नवऱ्याच्या निधनानंतर बायकोचं कुंकू पुसणं, गळ्यातलं मंगळसूत्र काढणं, हातातल्या बांगड्या फोडणं, पायातली जोडवी काढणं, धार्मिक-सामाजिक कार्यात डावलणं हे सगळं बाईला जिवंतपणी जाळण्यासारखंच. सौभाग्यलेणी हिरावून घेणं म्हणजे सतीच्या चटक्यांपेक्षा भयानक. त्यामुळं  या गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. असा निर्णय घेणारं राज्यातलं हे पहिलंच गाव. नंतर राज्य शासनानंही तसा निर्णय घेण्याचं आवाहन ग्रामपंचायतींना केलं. बघताबघता सगळीकडं अनुकरण होऊ लागलं.

आता या विधवाप्रथा बंदी निर्णयाच्याही पुढं जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्याच दोन ग्रामपंचायतींनी विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी ११ हजारांचं अनुदान जाहीर केलंय. शिरोळ तालुक्यातली टाकळीवाडी आणि राधानगरी ही ती दोन गावं. या ग्रामपंचायतींनी विधवांना कार्यक्रमांमध्ये हळदी-कुंकवासाठी बोलावणंही सुरू केलं. सांगली-कोल्हापूर-साताऱ्यातल्या काही गावांनी महिला सन्मान समितीच स्थापन केली, तर काहींनी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात विधवांचं पूजन सुरू केलं. त्यांच्या हस्तेच झेंडावंदन, पायाभरणी, उद्घाटनांचा घाट घातला. हा नवा दिशादर्शक वस्तुपाठ! ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली गावं. जिथं महात्मा जोतिबा फुल्यांनी सामाजिक क्रांतीची बीजं रूजवली, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचारांची कृतिशील पेरणी केली, क्रांतिसिंह नाना पाटलांनी ग्रामोद्धाराचा धडा शिकवला. या गावांना वाटलं, आता बदललं पाहिजे. नवतेचा आग्रह धरत अनिष्ट रूढी-परंपरांचं जोखड झुगारून दिलं पाहिजे.

कर्मकांडांना फाटा दिला पाहिजे. एकत्र येऊन निर्णय घेतले पाहिजेत. बुरसटलेल्या विचारांचं विसर्जन करताना आधुनिकतेचा अतिरेकही पाचर मारून रोखायला हवा. ‘गाव करील ते राव काय करील’ याचा प्रत्यय आणून द्यायला हवा. तसं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मागील सहा दशकांत प्रचंड उलथापालथ झाली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर चढउतार दिसून आले. इथल्या समाजधुरिणांनी पुरोगामी-परिवर्तनावादी महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. त्यानुसार खेड्यांचा सर्वांगीण विकास केंद्रबिंदू मानून पहिली दशकं महाराष्ट्राची वाटचाल सकारात्मक पद्धतीनं सुरू झालेली.

स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुशीतून तयार झालेल्या ध्येयवादी नेतृत्वानं विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्यक्रम देऊन आश्वासक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली; पण १९८० नंतर नागरीकरणाच्या झपाट्यात खेड्यांचा सर्वांगीण विकास मागं पडत गेला. गावखेड्यांत कमीत कमी राजकारण आणि अधिकाधिक समाजकारण-अर्थकारण या मूल्यांवर आधारित वाटचाल अभिप्रेत होती. प्रत्यक्षात मात्र १९८० नंतर सत्ताकेंद्री स्पर्धात्मक राजकारणाचा उदय झाल्यामुळं ही वाटचाल अगदी विरुद्ध दिशेनं झाली. दुसऱ्या बाजूला सामाजिकदृष्ट्या राहणीमानातला बदल स्वीकारला गेला, पण गावातलं गावपण कानकोंडं होऊ लागलं. त्यामुळंच वेगळं काहीतरी करण्याची ऊर्मी तयार झाली... आणि छोटेछोटे पण दीर्घकालीन परिणाम करणारे बदल गावकरी घडवू लागलेत; त्याची ही कहाणी! 

Web Title: The village that turns off the TV in the evening in western Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली