संपूर्ण जग म्हातारे होत चालले आहे; आपले काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:18 AM2023-02-11T10:18:04+5:302023-02-11T10:19:50+5:30

जपानमध्ये आत्ताच मुलांपेक्षा वृद्धांचे डायपर्स अधिक विकले जातात. लोकसंख्येचे म्हातारे होणे हा आता मागे न फिरवता येणारा जागतिक कल आहे.

The whole world is getting older what about you | संपूर्ण जग म्हातारे होत चालले आहे; आपले काय?

संपूर्ण जग म्हातारे होत चालले आहे; आपले काय?

googlenewsNext

साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी

गेल्या ६० वर्षांत प्रथमच गेल्या महिन्यात चीनची लोकसंख्या घटली आणि भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला. सध्या आपल्या लोकसंख्येत निम्म्याहून अधिक सदस्य २५ वर्षे वयाच्या खाली आहेत. २०४० पर्यंत आपण हळूहळू शिखराकडे जाऊ. देशातल्या काही राज्यांनी आधीच वार्धक्याच्या टप्प्यावर पाऊल ठेवलेले आहे. २०५० पर्यंत भारत वृद्धांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल, असा अंदाज आहे.

केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग म्हातारे होत चालले आहे. जगातला एकही देश त्याला अपवाद नाही. २०२१ साली जगातल्या १० लोकांपैकी एकजण ६५ आणि त्याहून अधिक वयाचा होता. २०५० मध्ये सहातला एक माणूस वयोवृद्ध असेल. या भूतलावरील मनुष्यजात वेगाने म्हातारी होत चालली आहे; याकडे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक सामाजिक अहवालातही लक्ष वेधण्यात आले आहे. २०२३चा हा अहवाल आहे. त्यातली आकडेवारी आपल्यापैकी बहुतेकांना नवी असेल.

जागतिक स्तरावर ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांपेक्षा ८० वर्षे वय असलेल्यांची संख्या वेगाने वाढते आहे. २०५० पर्यंत ८० च्या घरात असलेल्यांची संख्या ४५९ दशलक्ष असेल. २०२१ मध्ये असलेल्या संख्येच्या ती तिप्पट होईल. २०५० मध्ये ६५ आणि ऐंशीच्यावर असलेल्या लोकांच्या संख्येत महिलांचे प्रमाण अधिक-  अनुक्रमे ५४ आणि ५९ टक्के इतके असू शकेल. 

सध्या युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाई देश म्हातारे होण्याच्या प्रक्रियेत अतिशय वेगाने पुढे जात आहेत. जपानमध्ये मुलांच्यापेक्षा वृद्धांचे डायपर्स अधिक विकले जातात. दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटे या प्रक्रियेत मधल्या टप्प्यावर आहेत. तर सब सहारन आफ्रिकेत या प्रक्रियेची  सुरुवात झाली आहे. सगळे जगच या टप्प्यावर आले आहे.  
खरेतर, लोकसंख्येचे म्हातारे होत जाणे हे एका सार्वत्रिक, सामुदायिक यशाचे लक्षण आहे. चांगले राहणीमान, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि पोषक आहार यामुळे घडलेले हे स्थित्यंतर आहे. त्यातून आयुर्मान वाढले. त्याचबरोबर प्रजननक्षमता कमी झाली. काळाच्या ओघात हा बदल अपरिहार्य होता. अहवालात म्हटल्यानुसार लोकसंख्येचे म्हातारे होणे हा आता मागे न फिरवता येणारा जागतिक कल आहे. 

 सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्था आणि एकूणच समाज यावर लोकसंख्येच्या वृद्धत्वाचा परिणाम होत असतो. आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार ते कर आकारणी अशा सगळीकडे त्याचे पडसाद उमटतात. लोकसंख्येच्या सरासरीने काढलेले निर्देशांक कायमच वृद्धांच्या क्षमता, विविध गरजा आणि मोठ्या प्रमाणावरील विषमता लपवत असतात. उदाहरणार्थ वृद्धांमधील गरिबीचे प्रमाण स्त्रियांच्या बाबतीत अधिक आहे. त्यांच्याकडे साधनसामग्री अपुरी असते. त्या एकट्या राहण्याची शक्यता अधिक. प्रागतिक आणि प्रगतीशील अशा दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये वृद्ध व्यक्ती काम करणाऱ्या लोकांपेक्षा सामान्य प्रकारच्या घरात राहत असण्याची शक्यता जास्त असते. आरोग्य सुविधा आणि मृत्यूचे प्रमाण याहीबाबतीत ‘कोविड १९’चा वृद्धांवर जास्त परिणाम झाला.

जेव्हा एखादा देश म्हातारा होतो तेव्हा काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण साहजिकच कमी होते. या कमावत्या तरुणांना वाढत्या संख्येतल्या निवृत्तांना  आधार द्यावा लागतो. अशा अवलंबित्वाचा खर्च अर्थातच वाढता असतो आणि त्याचा ताण वेळ आणि साधनसामुग्रीवर पडतोच. आरोग्य सुविधा आणि निवृत्ती वेतनावरही अप्रत्यक्षपणे ताण येतो. 
लोकसंख्या वृद्धत्वाकडे जात असलेल्या देशांनी या प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर प्रगमनशील दृष्टीकोन ठेवून उपाय योजले पाहिजेत; त्यात अभिनवता असली पाहिजे. श्रम बाजारात फेरबदल, अधिक स्वयंचलीत होणे, वृद्धांना पुरेसा आर्थिक आधार मिळेल आणि तो परवडेल अशारितीने व्यवस्था उभारल्या पाहिजेत.
हवामानात बदल होत आहेत. अशात पृथ्वीचे वय वाढणे महत्त्वाचे ठरत आहे. वेगवेगळे देश या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
    sadhana99@hotmail.com
 

Web Title: The whole world is getting older what about you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान