जगाला भारताचा ‘आधार’ वाटतो, ‘भीती’ नाही; कुशल मनुष्यबळ ही जगासाठी एक संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:14 AM2023-07-14T11:14:41+5:302023-07-14T11:14:53+5:30
भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांना २५ वर्षे झाल्याने पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त ‘लेस इकोस’ या फ्रेंच दैनिकाला त्यांनी दिलेली मुलाखत.
भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. त्यामुळे जागतिक पटलावर देशाची स्थिती कशी बदलेल?
भारत ही हजारो वर्षे जुनी समृद्ध संस्कृती आहे. आज भारत जगातील सर्वात युवा राष्ट्र आहे. जगातील अनेक देश वृद्धत्वाकडे झुकत असताना येणाऱ्या दशकांमध्ये भारताचे युवा आणि कुशल मनुष्यबळ ही संपूर्ण जगासाठी एक संपत्ती असेल. हे कुशल मनुष्यबळ खुलेपणाने विचार करणारे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणारे, नवीन तंत्रज्ञानाला आपलेसे करणारे आणि बदलत्या जगाशी जुळवून घेणारे आहे. आर्थिक मंदी, अन्न सुरक्षा, महागाई, सामाजिक क्लेश यामुळे जागतिक स्तरावर आलेले मळभ पाहता मला भारतीयांमध्ये एक नवी दुर्दम्य ऊर्जा, भविष्याबद्दल आशावाद आणि जगात आपले योग्य स्थान मिळवण्यासाठीची उत्सुकता दिसते. जग अशांतता आणि विखंडनाच्या उंबरठ्यावर असताना एकता, अखंडत्व, शांतता व समृद्धीसाठी भारत अपरिहार्य आहे, अशी भावना संपूर्ण जगाच्या मनात आहे. शांतता, सौहार्द्र आणि सहअस्तित्व यांची खोलवर रुजलेली मूल्ये, आमच्या चैतन्यदायी लोकशाहीची यशस्विता, भारतीय संस्कृतीची श्रीमंती, परंपरा आणि तत्त्वज्ञान, आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांततेप्रती बांधिलकी या गोष्टींमुळे जगाला भारताचा आधार वाटतो, हे मला फार महत्त्वाचे वाटते.
‘ग्लोबल साउथ’चे नेतृत्व अपापत: भारताकडेच येते असे तुम्हाला वाटते का?
भारताने कोणत्याही पदाचा अहंकार करू नये. ‘ग्लोबल साउथ’ला बळकटी येण्यासाठी सामूहिक शक्ती आणि सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. ग्लोबल साउथचे अधिकार फार पूर्वीपासून नाकारले गेले आहेत. जागतिक व्यासपीठांवर ग्लोबल साउथला समान आदर, समान अधिकार मिळाले असते तर जग अधिक शक्तिशाली, मजबूत बनू शकले असते, हे खरेच आहे. या प्रांतात भारताचे स्थान इतके मजबूत आहे की, भारताच्या बळकट खांद्यावरून ग्लोबल साउथला उंच उडी मारता यावी. ग्लोबल साउथच्या वतीने भारत ग्लोबल नॉर्थशी उत्तम संबंध निर्माण करू शकतो. त्या अर्थाने हा खांदा हा एक प्रकारचा पूल होऊ शकतो.
२०४७ मधील भारताविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे? जागतिक संतुलनामध्ये भारताच्या योगदानाकडे तुम्ही कसे पाहता?
२०४७ साली आमच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे होतील. तोवर भारत हे एक विकसित राष्ट्र झालेले असावे, अशी आमची महत्त्वाकांक्षा आहे. सर्व नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संधी यांच्याशी संबंधित सर्व गरजांची पूर्तता करू शकणारा भारत एक क्रियाशील आणि समावेशक संघीय लोकशाही बनेल. सर्व नागरिकांना त्यांच्या अधिकारांची हमी मिळेल, देशातील त्यांच्या स्थानाबाबत ते आश्वस्त असतील आणि त्यांच्या भविष्याबाबत आशादायी असतील. इथे शाश्वत जीवनशैली, स्वच्छ नद्या, निळे आकाश, जैवविविधतेने सचेतन असलेली जंगले असतील. भारतीय अर्थव्यवस्था हे संधींचे केंद्र, जागतिक वृद्धीचे इंजिन असेल आणि कौशल्य आणि गुणवत्ता हे त्याचे स्रोत असतील. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आधार असलेल्या आणि बहुपक्षवादाच्या नियमांनुसार चालणाऱ्या एका अधिक संतुलित बहुध्रुवीय जगाच्या निर्मितीला आम्ही पाठबळ देऊ.
पाश्चिमात्य मूल्यांना अजूनही सार्वत्रिक आयाम आहे, असे तुम्ही मानता का?
जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील विचार प्रक्रिया आणि तत्त्वज्ञान हे त्या-त्या कालखंडात विशेष महत्त्वाचे होते. त्याच आधाराने आपण इथवर आलो आहोत. पश्चिम चांगली की पूर्व, हा विचार चांगला की तो; अशा दृष्टिकोनातून मी पाहत नाही. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आमचे वेद, सर्व बाजूंनी येणाऱ्या उदात्त विचारांचा स्वीकार करण्याची शिकवण देतात. आम्ही स्वतःला एका चौकटीत अडकवत नाही. जगामध्ये जे काही चांगले आहे, त्याचा स्वीकार आणि अंगीकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणूनच आमच्या ‘जी-२०’ परिषदेची संकल्पना आहे, ‘वसुधैव कुटुंबकम!’ आम्ही ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ म्हटले आहे; पण एक तत्त्वज्ञान म्हटलेले नाही.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला यंदा २५ वर्षे होत आहेत. या दोन देशांमधील नातेसंबंधाचे वर्णन तुम्ही कसे कराल?
भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, आर्थिक, मानव-केंद्री विकास आणि शाश्वतताविषयक सहकार्य अशा सर्वच क्षेत्रांना सामावून घेणारी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. ज्यावेळी समान दृष्टिकोन आणि मूल्ये असलेले देश द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय व्यवस्थेत किंवा प्रादेशिक संस्थांतर्गत एकत्र काम करतात, त्यावेळी ते कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम असतात. हिंद-प्रशांत क्षेत्रासह आमची भागीदारी कोणत्याही देशाच्या विरोधात किंवा कोणत्याही देशाच्या बळावर नाही. या प्रदेशातील आमच्या आर्थिक आणि संरक्षणविषयक हितसंबंधांचे रक्षण करणे, व्यापारी-प्रवासी वाहतूक आणि व्यापारासाठी दिशादर्शन सुनिश्चित करणे, या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय कायदा कायम राखणे, हाच आमचा उद्देश आहे. आम्ही इतर देशांसोबत त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांना मुक्त सार्वभौमत्वाची निवड करण्यामध्ये मदत करण्यासाठी काम करत आहोत. आमचे द्विपक्षीय संबंध दृढ, विश्वासार्ह आणि उत्तम आहेत. अत्यंत नकारात्मक परिस्थितीतही ते टिकून राहिले आणि सतत नव्या संधींच्या शोधात राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदेपालनाबाबत दोन्ही देश वचनबद्ध आहेत. जग बहुध्रुवीय असावे, यावर दोघांचेही एकमत आहे.
मुलाखत : निकोलस बर्रे आणि क्लेमेंच पेरुचे,
नवी दिल्ली प्रतिनिधी, ‘लेस इकोस’