त्यांचे बुद्धीशीच वैर आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:20 AM2019-03-08T05:20:35+5:302019-03-08T05:20:45+5:30

आजही ज्या थोरा-मोठ्यांची नावे समाज आदराने घेतो आहे ते बुद्धी व तर्क, प्रज्ञा व प्रतिभा यांच्या आधारानेच मोठे ठरले आहेत.

 Their intellect is hostile! | त्यांचे बुद्धीशीच वैर आहे!

त्यांचे बुद्धीशीच वैर आहे!

Next

आजही ज्या थोरा-मोठ्यांची नावे समाज आदराने घेतो आहे ते बुद्धी व तर्क, प्रज्ञा व प्रतिभा यांच्या आधारानेच मोठे ठरले आहेत. अडचण या साऱ्यांपासून दूर राहणाऱ्या निर्बुद्धांची आहे. त्यांना पुढे जाता येत नाही. जमलेच तर ते कुणा पुढाºयाचे अनुयायी तेवढे होतात.‘बुद्धिवाद्यांना जागीच मारा’ हा एका ज्येष्ठ संघपुत्राने नागपुरात आपल्या श्रोत्यांना व अनुयायांना दिलेला संदेश जेवढा अंतर्मुख करणारा तेवढाच आपल्या भवितव्याच्या वाटचालीविषयी चिंता करायला लावणारा आहे. ज्ञान, बुद्धी, प्रज्ञा, विचार, तर्क आणि प्रतिभा या समाजाला पुढे आणि उंचीवर नेणाºया बाबी आहेत. त्यांचा आधार, आश्रय व अध्ययन करणाऱ्यांना समाजाने नेहमीच त्याचे मार्गदर्शक म्हणून गौरविले आहे. आजही ज्या थोरा-मोठ्यांची नावे समाज आदराने घेतो आहे ते बुद्धी व तर्क, प्रज्ञा व प्रतिभा यांच्या आधारानेच मोठे ठरले आहेत. अडचण या साºयांपासून दूर राहणाºया निर्बुद्धांची आहे. त्यांना पुढे जाता येत नाही. नेते होता येत नाही. जमलेच तर ते कुणा पुढाºयाचे वा बुवाबाबाचे अनुयायी, वारकरी वा झेंडेकरीच तेवढे होतात. अशी माणसे मग स्वत:ला निष्ठावान व श्रद्धावान म्हणवतात. श्रद्धा वा निष्ठा या वाईट बाबी अर्थातच नाहीत. त्यामुळे समाजाचे स्थैर्य बºयापैकी दिसत असते. मात्र, त्यांच्यात पुढे जाण्याची, पुढचे पाहण्याची वा भविष्याचा वेध घेण्याची क्षमता कमी असते. ती बहुदा स्थितीवादी माणसे असतात. माणसे सगळीच वाढत वा मोठी होत नाहीत. काही किंवा बहुसंख्य माणसे तशीच राहतात. लहान असताना होती तशीच तारुण्यात व तरुणपणी असतील तशीच म्हातारपणी. ती स्थितीशील असतात. त्यातून त्यांची बुद्धी मारण्याच्या व्यवस्था आपल्याकडे आहेत. त्याच्या संस्था व संघटना आहेत. त्याचे गुरू व श्रद्धास्थाने आहेत. या माणसांवर त्यांची ती श्रद्धास्थाने एकच एक संस्कार घडवीत असतात. ‘विचार करू नका, श्रद्धा ठेवा’. श्रद्धेनेच कल्याण होईल, विचार भरकटतात, श्रद्धा तुम्हाला जागच्या जागीच ठेवतात, म्हणून श्रद्धेची कास धरा, ज्ञानाला दूर ठेवा इ.इ. ‘जगातील सारे ज्ञान कुराणात आहे, त्यामुळे बाकीची ग्रंथालये जाळायला हरकत नाही’ असे एका धर्माने सांगितले; तर दुसºयाने ‘व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम’ म्हणून सारे ज्ञान महाभारतात आले आहे, तुम्ही दुसरे काही वाचण्या-अभ्यासण्याची गरज नाही, असे सांगितले. श्रद्धा अशाच वाढतात. विल ड्युरांट म्हणतो धर्मश्रद्धांनी तर्कच नव्हे, तर तत्त्वज्ञाने मारली, विचार संपविले आणि जग आहे तेथेच रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला. आता जग अशा वेडगळ समजुतींच्या फार पुढे गेले आहे. अशा स्थितीत, बदललेल्या वातावरणात ज्यांच्या श्रद्धांची आसने डळमळीत झाली त्यांना नव्याने जोर चढला आहे व ते पुन्हा एकवार ‘बुद्धी मारा, बुद्धिवाद्यांना जागीच मारा’ असे उपदेश करायला निघाले आहेत. बुद्धी सत्तेला व व्यवस्थेला प्रश्न विचारते, शंका उत्पन्न करते. अमूक गोष्ट अशीच का, कशामुळे, असे मुद्दे उपस्थित करते. त्यातून सत्य पुढे आणण्याचा, ते उघड करण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण ज्यांना सत्य समोर येणे सहन होत नाही, त्यांच्यातूनच मग दाभोलकरांचा खून होतो, पानसरे मारले जातात, गौरी लंकेशला घरात मारले जाते आणि कलबुर्गींना गोळ्या घातल्या जातात. गांधीजी असेच मारले गेले. तुकारामाची गाथा नदीत बुडविली गेली, ज्ञानेश्वरांना समाधी घ्यावी लागली, सॉक्रेटिसला विष दिले गेले. हे जगात सर्वत्र झाले कारण सत्ता व प्रस्थापित यांना सत्याने विचारलेले, बुद्धीला घाम फोडणारे प्रश्न चालत नाहीत. त्यांना आज्ञाधारक स्वयंसेवकांची फौज लागते. जी फक्त आज्ञा पाळते. त्यांनी प्रश्न विचारायचे नसतात. बुद्धी हेच या प्रश्नांचे मूळ असल्याने मग बुद्धी नको आणि बुद्धिवादीही नको असे म्हटले जाते. श्रद्धावानांचे मोर्चे निघत नाहीत, त्यांची आंदोलने होत नाहीत, त्यांच्या मिरवणुका निघत नाहीत. निघतात त्या त्यांच्या दिंड्या. ते तसे का करतात याचे उत्तर पुष्कळदा त्यांनाही देता येत नाही. कारण ते त्यांना समजावून देण्याची गरज त्यांच्या मार्गदर्शकांना नसते. एकदा बुद्धी नाकारायची हे ठरले की मग समजुतीची गरजच संपते. मग नागरिकांना विचारवंत व्हायचे की प्रचारवंत, ज्ञानजीवी व्हायचे की अज्ञानजीवी, असे प्रश्न पडतात. ज्ञानी विवेकाची कास धरतात. विवेकाला बुद्धी लागते, तर्क लागतो व विचारशक्ती लागते. ‘बुद्धिवाद्यांना जागीच ठार करा’ म्हणणारे त्यांना मारत नाहीत. त्यांना सत्ता व व्यवस्था यांना अवघड प्रश्न विचारणारे मारायचे असतात. कारण प्रश्न नसले की शांतता असते. (फक्त तेथे लोकशाही नसते एवढेच).

Web Title:  Their intellect is hostile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.