‘त्यांची’ रक्ताची तहान कधी शमणार?
By admin | Published: April 2, 2017 01:07 AM2017-04-02T01:07:16+5:302017-04-02T01:07:16+5:30
छत्तीसगड या छोट्याशा राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १२ जवान मृत्युमुखी पडले.
- प्रा. संदीप चौधरी
छत्तीसगड या छोट्याशा राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १२ जवान मृत्युमुखी पडले. गेल्या काही वर्षांत नक्षलींच्या हिंसक कारवायांमुळे बळी गेलेल्या निरपराध नागरिकांची संख्या काही हजारांत गेली आहे. अनेक प्रयत्न करूनही त्यावर नियंत्रण मिळविण्यात सरकारच्या हाती अपयशच आले आहे. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक व नक्षलवाद्यांचे हितचिंतक जी. एन. साईबाबा यांना गडचिरोली न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. समाजातील तरुण पिढीचा बुद्धिभेद करून त्यांना नक्षली चळवळीत भरती करण्यास प्रोत्साहन देण्याचा साईबाबावर आरोप आहे. आदिवासी हिताची भाषा करणाऱ्या नक्षलींनी आजवर केवळ क्रौर्यच दाखविले आहे, असे खेदाने म्हणावे लागते.
तत्त्वज्ञान कितीही उदात्त वाटत असले तरी त्याचा पाया जर हिंसेच्या समर्थनावर आधारित असेल तर ती चळवळ कधीही यशस्वी होऊ शकत नाही; हा जगाचा इतिहास आहे. हे नक्षलवादी चळवळीतील लोकांनी लक्षात घ्यावे. सामान्य नागरिकांची पिळवणूक आणि हत्या करून त्यांना सहानुभूती कदापीही मिळू शकणार नाही. त्यासाठी नक्षलवादी तत्त्वज्ञानाची नव्याने मांडणी करावी लागेल. पोलीस काय किंवा सैन्य बले काय, ते तर हुकुमाचे ताबेदार. त्यांच्यावर हल्ला करून कोणता हेतू साध्य करीत आहात? त्यापेक्षा शासन आणि प्रशासन यांच्याशी चर्चेचा मार्ग अवलंबला पाहिजे. त्यातूनच योग्य तो मार्ग निघू शकेल. आपला कोणी वापर तर करीत नाही ना हेदेखील नक्षलवादी आंदोलकांना तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. अन्याय, अत्याचाराची भावना झाली असेल तर ते रास्त आहे; पण ‘बदला’ घेण्याची मानसिकता कदापीही ‘अन्याय’ दूर करू शकत नाही.
सरकारी पातळीवर नक्षलवादी चळवळीचा सामना करण्यासाठी नियमित प्रयत्न करण्यात येत आहेत. सरकारने ‘आॅपरेशन ग्रीन हंट योजना’ तयार करून नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, देशातील एक पंचमांश जंगल व तब्बल १८० जिल्ह्यांमध्ये प्रभाव मिळविलेल्या नक्षलवाद्यांना नेस्तनाबूत करणे मोठे आव्हान ठरले आहे. नक्षलवादी चळवळीवर अंकुश ठेवण्यासाठी महेश भागवत या पोलीस अधिकाऱ्याने तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात ‘कम्युनिटी पोलिसिंग’, ‘पोलीस तुमच्यासाठी’, ‘परिवर्तन सभा’ आणि ‘प्रशासन तुमच्या दारात’ असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नक्षलवादी चळवळीला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. विकासाचे प्रकल्प राबवून नक्षलवादी चळवळीला मदत करणाऱ्या आदिवासींना विश्वासात घेऊन नक्षलवाद्यांना गावबंद केली. आज आदिलाबाद जिल्हा बऱ्यापैकी नक्षलवादी कारवायांपासून मुक्त आहे.
नक्षलवाद्यांनी हे समजून घेतले पाहिजे की लोकशाही शासन व्यवस्था हीच सध्या अस्तित्वात असलेली सर्वोत्तम व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था नाकारून कोणतेही शहाणपण नाही. महिला, तरुण आणि किशोरवयीन मुले यांचे आयुष्य खडतर बनवून, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून, त्यांना व्यवस्था बदलण्याचे स्वप्न दाखवून, त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन तर होत नाही ना याचाही विचार व्हायला हवा. निष्पाप आदिवासींना वेठीस धरणे योग्य आहे का? तर निश्चितच अयोग्य आहे. म्हणूनच नक्षलवाद्यांचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती दोन्हीही कुचकामी ठरत आहेत. नक्षलवाद्यांना दुर्गम जंगलात जेथे पायी जाण्याचीदेखील सोय नाही तेथे अद्ययावत शस्त्रास्त्रे कोण पुरवीत आहेत. त्यांनाही शोधण्याची आणि कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता आहे. क्रूर पद्धतीने हत्या करणे, जिवंत जाळणे, प्रेताचे अमानुष पद्धतीने प्रदर्शन यात कोणते कर्तृत्व आहे. याचाही गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. महिलांना नक्षलवादी चळवळीत ओढून महिला आणि मुलांचा वापर करणे कितपत सयुक्तिक आहे? त्याऐवजी त्यांना गरज आहे ती खडतर आयुष्य सोडून मुख्य प्रवाहात आणण्याची.
आणखी आवश्यकता आहे ती शासनाला अधिक प्रामाणिक प्रयत्न करण्याची, प्रभावी पुनर्वसन करण्याची, विकासाची फळे दुर्गम भागात जलद गतीने पोहोचविण्याची, सामाजिक-आर्थिक विषमता नष्ट करण्याची, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची, दुर्गम आदिवासी भागापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्याची, आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याची, त्यासाठी सरकारने ‘एकत्रित आणि सर्वांगीण योजना’ आखून तडीस नेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांशी चर्चेद्वारे मार्ग काढण्यावरदेखील भर देऊन त्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करण्याची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची.
नक्षलवाद्द्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, महावीरांचा-अहिंसेचा, बुद्धाचा-शांतीचा आणि महात्मा गांधी यांचा सत्याचा मार्गच त्यांना स्वीकारावा लागेल; अन्यथा नक्षलवादी तत्त्वज्ञान मूळ हेतूपासून दूर जाईल आणि असे रक्तपात सुरूच राहतील. अनेक पिढ्या बरबाद होत राहातील; आणि काळ मात्र प्रश्न विचारीत राहील, ‘त्यांची’ रक्ताची तहान कधी शमणार ?
(लेखक हे शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)