...तर खरंच भाकरीला महाग होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:41 AM2018-11-30T11:41:36+5:302018-11-30T11:43:39+5:30

मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे.

... then the bread really becomes expensive | ...तर खरंच भाकरीला महाग होऊ

...तर खरंच भाकरीला महाग होऊ

Next

- धर्मराज हल्लाळे

महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे. अगदी शेवटचा पर्याय म्हणजे भाकर. म्हणजेच रोजचे अन्न तेही न मिळणे म्हणजे मोठी अडचण असणे. मात्र आजच्या परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प किमतीत मिळणारे गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल यामुळे अन्नधान्याची उपलब्धता शेवटच्या घटकापर्यंत झाली आहे. सदरील दुकानांमधून अजून तरी ज्वारी मिळत नाही. रबी हंगामातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. परंतु, यंदाच्या दुष्काळजन्य स्थितीत रबीचा पेराच झालेला नाही. परिणामी पुढच्या वर्षी ज्वारी मिळणे कठीण आहे. त्याला आणखी एक वर्ष असताना आत्ताच बाजारपेठेत ज्वारीची आवक एकदम कमी झाली आहे.

लातूरची बाजार समिती राज्यात नावाजलेली आहे. गेल्या तीन वर्षांतील आवक लक्षात घेतली तर ज्वारी उत्पादनात फार मोठी घट झाल्याचे दिसते. त्यामुळे गेल्या  वर्षीच्या तुलनेत आत्ताच दुप्पट भाव झाला आहे. साधारणपणे १७३५ रूपये क्विंटल असणारी ज्वारी ३२०० रूपयांवर गेली आहे. पुढच्या वर्षी तर जवळजवळ आवक नगण्य होईल. त्यामुळे भाव किती पटीने वाढतील, हे सांगणे कठीण आहे. उद्भवलेल्या स्थितीचा फायदा घेऊन काही जण ज्वारीचा साठा करण्याची शक्यता आहे. परिणामी ज्वारीचे भाव आणखी वाढतील.

अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट झाली आजपर्यंत भाव कितीही वाढले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ज्वारीच्या भाकरी आहारात असतात. मात्र भविष्यात आवकच झाली नाही तर नेहमी सहज परवडणारी ज्वारी मिळणे कठीण होईल. त्यामुळे नक्कीच आपण भाकरीला महाग होऊ त्याचवेळी पशुधनाचीही मोठी अडचण होणार आहे. कारण ज्वारीच्या कडब्याला सर्वाधिक मागणी असते. साधारणत: रबी ज्वारीची पेरणी आॅक्टोबरमध्ये होते. काढणी फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊन ज्वारी बाजारपेठेत उपलब्ध होते. मात्र रबी पेराच निम्म्यावर आला. त्यातही ज्वारी अत्यल्प असल्याने पुढचे वर्ष भाकरीसाठी नक्कीच महाग असणार आहे.

एकीकडे भाकरीचा प्रश्न, दुसरीकडे खरिपातील तुरीचा खराटा झाला आहे. त्यामुळे तुरीच्या दरातही वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथे लातूरबरोबरच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शेतमाल विक्रीसाठी येतो. साधारणपणे दररोज २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. दुष्काळामुळे आवक कमी होऊनही उलाढाल मोठी आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राच्या आॅनलाईन फेऱ्यात न अडकता सोयाबीनची विक्री थेट बाजारात करीत आहेत. सोयाबीनचा भाव स्थिर असून तुरीचा मात्र पाच हजारावर पोहोचला आहे. हरभरा, मूग, उडीद या शेतमालाच्या दरातही वाढ झाली असून आवक कमी झाल्याने येणाऱ्या काळात भाव वाढतीलच असे दिसते. 

Web Title: ... then the bread really becomes expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.