मग नक्षली वाईट कसे?
By admin | Published: January 9, 2015 11:30 PM2015-01-09T23:30:17+5:302015-01-09T23:30:17+5:30
काही लोकाना सतत चर्चेत आणि खरे तर वादात राहण्याची मोठी हौसच असते. आपल्या या हौसेपायी आपण आपल्याच मातुलांना वेळोवेळी अडचणीत आणीत असतो,
काही लोकाना सतत चर्चेत आणि खरे तर वादात राहण्याची मोठी हौसच असते. आपल्या या हौसेपायी आपण आपल्याच मातुलांना वेळोवेळी अडचणीत आणीत असतो, हे समजूनदेखील त्यांच्या हौसेला काही ते मुरड घालीत नाहीत. मणिशंकर अय्यर हे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील एक बडे नाव, अशा हौशी लोकांमध्ये सहज सामावून जाणारे. भारतीय विदेश सेवेचे सदस्य ते काँग्रेसचे नेते हा त्यांचा प्रवास आणि राज्यसभेचे सदस्यत्व हा त्यांचा पत्ता. जेव्हां केव्हां केन्द्रात काँग्रेसची सत्ता असते, तेव्हां तेव्हां त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतच असतो. फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील एका साप्ताहिकाच्या कचेरीवर बुधवारी जो भीषण अतिरेकी हल्ला झाला आणि त्यात बारा व्यक्तींची हत्त्या केली गेली, त्या घटनेबद्दल एकीकडे खेद व्यक्त करतानाच दुसरीकडे त्यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले. दहशतवादाविरुद्धचे युद्ध म्हणजे वॉर अगेन्स्ट टेरर हा सध्याच्या काळातील एक परवलीचा शब्द झाला असून, चार्ली हेब्दो साप्ताहिकावर झालेला हल्ला म्हणजे या युद्धाच्या विरोधातली एक प्रतिक्रिया असल्याचे मणिशंकर यांचे निदान आहे. अमेरिकेवर झालेल्या आजवरच्या अतिभयानक दहशतवादी हल्ल्यानंतर त्या राष्ट्राने दहशतवादाविरुद्धचे युद्ध ही संकल्पना जन्मास घातली आणि आजवर अनेक मुस्लिमांचा या युद्धात खात्मा केला गेला, असे वर्णन करुन, अशा स्थितीत ज्यांचा खात्मा केला गेला, ते लोक उसळून येणार नाहीत काय, हा मणिशंकर यांचा सवाल. पण त्यांच्या मातुल घराण्याला म्हणजे काँग्रेस पक्षाला तो काही पटला नाही व काँग्रेसने लगेचच स्वत:ला अय्यर यांच्या विधानापासून अलग करुन घेतले. अर्थात असे होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सुमारे दहा वर्षांपूर्वी मणिशंकर केन्द्रातील मंत्री म्हणून अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देण्यास गेले होते, तेव्हां त्यांनी या कारागृहात बंदी म्हणून राहिलेल्या सावरकरांच्या गौरवार्थ तिथे लावलेला लेख काढून टाकण्याचे आदेश जारी केले होते. तेव्हांही काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांना माध्यमांसमोर येऊन अय्यर यांच्याशी असलेली या बाबतीतली पक्षाची फारकत सांगावी लागली होती. तरीही मणिशंकर यांच्या ताज्या विधानाची चिकित्साच जर करायची, तर ज्या नक्षल्यांना एतद्देशीय दहशतवादी म्हणून संबोधले जाते, त्यांचा नि:पात करण्याची भूमिकादेखील सोडून द्यावी लागेल. आज संपूर्ण भारत देशाच्या एक तृतीयांशापेक्षा अधिक भूभागाला नक्षलवादी चळवळीने ग्रासलेले आहे. त्यांच्या दहशतवादामुळे केन्द्र आणि संबंधित राज्य सरकारांनीही नक्षलवादाविरुद्ध एकप्रकारचे युद्धच पुकारले आहे व नक्षल्यांना ठेचून काढण्याचे सत्र सुरु ठेवले आहे. या सत्रात जे मारले जातात, त्यांच्या मृत्युचा बदला घेण्याचे नक्षल्यांचे कृत्यदेखील मग समर्थनीय ठरवावे लागेल. विशेषत: अंदमानात जाऊन ‘विघटनवादी सावरकर’ यांचा निषेध करताना, आपण गांधीवादी आहोत, असे आवर्जून सांगणारे माणिशंकर ईसीसच्या दहशतवाद्यांच्या कृत्याचे अपरोक्षपणे समर्थन करतात तेव्हां ते स्वत: येवोत अथवा ना येवोत काँग्रेस पक्ष मात्र अडचणीत येत असतो आणि गांधीवाद पराभूत होत असतो. तरीदेखील एकवेळ मणिशंकर परवडले म्हणावे लागतील, असे एक महाभाग उत्तर प्रदेशात निपजले आहेत. याकूब कुरेशी नावाचे हे सद्गृहस्थ बहुजन समाजवादी पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांनी तर पॅरीस घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, चार्ली हेब्दो हल्ल्यातील हल्लेखोरांना चक्क एक्कावन्न कोटी रुपयांचे रोख पारितोषिकच जाहीर करुन टाकले. अर्थात हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी कोणाला तरी समोर यावे लागेल. जो कोणी समोर येईल त्याला आपले कर्तृत्व सिद्ध करुन दाखवावे लागेल. अर्थात फ्रान्सच्या पोलिसांच्या तावडीतून तो सुटला तरच. म्हणजे नुसताच बोलभांडपणा. इतके मोठे पारितोषिक का, तर म्हणे जो कोणी प्रेषिताचा अपमान करील, त्याला मृत्युदंड हीच शिक्षा योग्य ठरेल. अर्थात बसपाने लगेचच खुलासा करताना, कुरेशी जे काही बोलले, ती पक्षाची भूमिका नसून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे जाहीर केले आहे. पण असे अचरट व्यक्तिगत मत व्यक्त करणाऱ्याच्या विरोधात तो पक्ष कोणतीही कारवाई मात्र करणार नाही. कारण त्या पक्षाला अचरटपणाचे तसे बाळपणापासूनच वावडे नाही. मुळात बुधवारी झालेला हल्ला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या झालेल्या कथित अपमानातून झाला की ईसीसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याच्यावरील व्यगंचित्रापायी झाला, याबाबत अद्याप पुरेशी स्पष्टता नाही. परंतु त्याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे बुधवारच्या हल्ल्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारीदेखील पॅरीसमध्ये असाच गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या. या घटना वाईट आहेत, दुर्दैवी आहेत असे म्हणून खेद व्यक्त करायचा आणि त्याचवेळी त्यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले जाईल अशी वक्तव्येही करायची, हा प्रकार अन्य देशांमध्ये दिसून येत नसला तरी भारतात मात्र तो दिसून येतो आहे. त्यातील याकूब कुरेशीसारख्या वावदूकांना बाजूला काढता येईल. पण मणिशंकर अय्यर यांच्यासारखा जुना आणि मुरलेला काँग्रेसी नेतादेखील तशीच भाषा बोलतो, तेव्हां आपल्या विधानांद्वारे आपण कोणत्या उपद्रवकारी शक्तींना बळ देत असतो, याची उमज त्यांना पडत नसेल काय?