मग कसं... पंत म्हणतील तसं !

By सचिन जवळकोटे | Published: July 28, 2019 08:50 AM2019-07-28T08:50:38+5:302019-07-28T08:52:10+5:30

लगाव बत्ती..

Then how ... as the Pant would say! | मग कसं... पंत म्हणतील तसं !

मग कसं... पंत म्हणतील तसं !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

सोलापूर जिल्ह्यानं आजपावेतो अनेक गट बघितले. तट अनुभवले; मात्र मुंबईच्या मंत्रालयात बसून सोलापूरच्याराजकारणात नव्या गटाची केली जाणारी साखरपेरणी प्रथमच पाहिलेली. होय...इथल्या दोन्ही देशमुखांना पद्धतशीरपणे बाजूला सारून झपाट्यानं वाढत चाललाय नवा ‘हॉटलाईन’ गट. ‘कोल्हापूर’चे चंदूदादा अन् ‘नागपूर’चे देवेंद्रपंत यांच्याशीच थेट संवाद साधणारा ‘सोलापूर’चा गट. पक्षाचा तर सोडाच...घराचा उंबरठा ओलांडतानाही ‘मग कसं...पंत म्हणतील तसं !’ म्हणणारा नवा ‘इनकमिंग’ गट...

बबनदादा’ म्हणे कमळ...
...अन् ‘संजयमामा’ बाण !

एकेकाळी अवघ्या महाराष्टÑभर राज्य करणारे ‘धाकटे पुतणे बारामतीकर’ यांची राजकीय अवस्था भलतीच बिकट झालेली. काल ‘अजितदादा’ सोलापुरात आले तेव्हा त्यांना भेटायला तर सोडाच साधा फोनही केला नाही त्यांच्या दोन आमदारांनी. पार्टीच्या मुलाखती आहेत हे माहीत असूनही बार्शीचे ‘दिलीपराव’ गेले ‘तिरुपती-बालाजी’ला. बहुधा पाच वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानं गरज भासली असावी ‘लक्ष्मीनारायण’च्या दर्शनाची; परंतु ‘बबनदादां’चं काय ? त्यांनी किमान आपल्या लाडक्या लेकराला तरी किमान पाठवायला हवं होतं ना ‘अजितदादां’कडं...

...यात अंदर की बात फक्त आम्हा पामरालाच ठावूक. गेल्या काही दिवसांपासून ‘निमगाव’चे ‘रणजितभैय्या’ बारामतीच्या ‘अजितदादां’ऐवजी अकलूजच्या ‘रणजितदादां’सोबतच अधिक संपर्कात. दोघांचीही भेट होत असते पुण्यात गुप्त ठिकाणी. दोघांचाही प्रतिस्पर्धी समान. अर्थात संजयमामा. त्यामुळं आर्थिक भानगडींपासून राजकीय घडामोडीपर्यंत रंगते दोघांमध्ये चर्चा. या ओळखीतूनच ‘रणजितदादां’चाही नकळतपणे ‘बबनदादां’ना थोडाफार सॉफ्टकॉर्नर. हाच धागा पकडून ‘बबनदादा अन् रणजितभैय्यां’नी भेट घेतली म्हणे थेट ‘विजयदादां’ची. ‘आम्हाला संजयमामांच्या राजकारणाशी नाही देणं-घेणं.  तुम्ही माढ्यात करा माझ्या मुलाला कमळाचा आमदार. मी जिल्ह्यात मानेन तुमचंच नेतृत्व’, असा भावनिक शब्दही गेला म्हणे अगतिक पित्याकडून... कारण ‘अकलूजकरां’चा विरोध मावळला तर ‘बबनदादां’च्या शिवारात ‘कमळ’ फुलायला रान मोकळं... अन् मुंबईच्या ‘देवेंद्रपंतां’नाही हवंय हेच. त्यांना हवेत अकलूजचे दादा अन् माढ्याचेही बबनदादा. आलं का लक्षात... मग कसं ? पंत म्हणतील तसं...

मात्र याचवेळी ‘संजयमामा’ पुन्हा ‘तानाजीरावां’च्या संपर्कात. करमाळ्याचे ‘नारायण’ उठसूठ ‘अकलूजकरां’च्या सान्निध्यात राहिल्यानं सावंत घराण्याचा पारा नेहमीच वाढलेला. ‘आपल्याला आमदार सेनेचा पाहिजे, मोहित्यांचा नको’ हे वाक्यही त्यांनी आतापर्यंत बºयाचवेळा खासगीत उच्चारलेलं. त्यामुळं यदाकदाचित शेवटच्या क्षणी करमाळ्यातला बाण ‘मामां’च्या हाती दिसला तर नको आश्चर्य वाटायला; कारण ‘अकलूजकरां’चा कट्टर दुश्मन आयताच आपल्या जाळ्यात सापडत असेल तर का नकोय सावंतांना ?...
मात्र ‘संजयमामा’ हे कधीच कुणाचे कायमचे दुश्मन नसतात  (अन् मित्रही) हे सावंतांना समजायला लागेल बराच वेळ ! दरम्यान, चुकून-माकून ‘युती’ तुटली तर करमाळ्याची जागा जानकरांच्या पार्टीला सोडून तिथं ‘संजयमामां’ना उभं करण्यासही काही ‘कमळ’वाले नेते तयार. याचा अर्थ ‘मामां’चे हात एकाचवेळी तीन-चार डगरीवर. लगाव बत्ती...

नी बी इल्ला... ना बी इल्ला;
घेऊन चालले ‘सिद्धूअण्णा’ यल्ला !

अक्कलकोटच्या राजकारणात ‘सिद्रामप्पां’एवढा मुरब्बी नेता नसावा कुणीच. त्यांनी आजपावेतो कैक चमत्कार घडविलेले; मात्र दुधनीच्या ‘सिद्धूअण्णां’नी केलेला यंदाचा अचाट प्रयोग अनेकांची झोप उडविणारा. मध्यंतरी ‘देवेंद्रपंतां’च्या स्वागतासाठी ‘सिद्रामप्पा अन् सचिनदादा’ विमानतळावर एकत्र जमलेले. आपली जुनी दुश्मनी विसरून नव्या दुश्मनाच्या आगमनावर चिंतीत झालेले. त्या ठिकाणीही ‘सिद्धूअण्णां’ना पाहून ‘सचिनदादां’ची सटकलेली. (फोटोतील देहबोलीच सांगते त्यांच्या मनातली खदखद). ‘तुम्हीही नाही...मीही नाही...आता आपली आमदारकी कशी काय त्यांना ?’ हा हतबल सवाल करणाºया ‘सचिनदादां’ना अक्कलकोटच्या राजकारणातले उन्हाळे-पावसाळे समजायला पहाव्या लागतील बºयाच निवडणुका. ‘सिद्धूअण्णां’ना पार्टीत घेण्यासाठी खुद्द ज्या गौडगाव महाराजांनीही पुढाकार घेतलाय, त्यांच्या इलेक्शनला याच वाड्यातून गेली होती पाच पेटींची गुरुदक्षिणाा, हे खूप कमी मंडळींना ठावूक. याचाच अर्थ, ‘सिद्धूअण्णां’च्या आगमनाची तयारी लोकसभेलाच झालेली. फक्त आता प्रवेशाचा मुहूर्त ठरायचाय. कदाचित ‘अण्णां’च्या कारखाना स्थळावर डिस्टिलरी प्रोजेक्ट सोहळ्यात होऊ शकतो पंतांच्या हस्तेच प्रवेश. मग कसं...पंत म्हणतील तसं !...लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत. )

Web Title: Then how ... as the Pant would say!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.