मग कसं.. पंत म्हणतील तसं !
By सचिन जवळकोटे | Published: March 28, 2021 06:57 AM2021-03-28T06:57:53+5:302021-03-28T07:25:54+5:30
लगाव बत्ती...
सचिन जवळकोटे
पंढरपूरच्याराजकारणात पूर्वी ‘पंतांचा वाडा’ हा परवलीचा शब्द. वाड्यावर ‘थोरल्या पंतां’नी आदेश काढायचा. चंद्रभागा तीरावरच्या सर्व गावांनी ऐकायचा, हीच रीतभात. मात्र अकरा वर्षांपूर्वी हीच भीमा नदी वळणं-वळणं घेत ‘दामाजीं’च्या शिवारात शिरली. राजकारणाची परंपरा बदलली. समीकरणं चुकली. यामुळेच की काय यंदा ‘पंत म्हणतील तसं !’ हा संदेश वाड्यावरच्या बैठकीत ऐकविला गेला.. पण नेमके कोणते पंत ? पंढरपुरातले की नागपुरातले.. याचा शोध काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागलाच नाही.
एकेकाळी पंढरीचं राजकारण दोनच व्यक्तिमत्त्वांभोवती फिरत राहिलेलं. एक ‘पंत’. दुसरे ‘अण्णा’. तालुक्यातली कोणतीही संस्था असो, सत्ता आलटून पालटून दोघांकडेच राहिलेली. तिसऱ्याचा कधी शिरकाव न झालेला; मात्र २००९ साली ‘अकलूजकरां’नी नीरा नदी सोडून भीमा गाठली, तसं सारं गणित बदललं. बिघडलं. सत्तेचा केंद्रबिंदू ‘पंतांचा वाडा’ सोडून ‘नानांचा बंगला’ बनला. मग काय.. सलग तीन इलेक्शनमध्ये नानांची टोपी झंझावात बनून राहिली..
अकरा वर्षांपूर्वीची ‘ती चूक’ दुरुस्त करण्याची संधी आत्ता कुठं ‘प्रशांत पंतां’ना मिळालीय. एक तर आमदारकी वाड्यावर आली पाहिजे किंवा रिमोट कंट्रोलमध्ये असली पाहिजे, हे पक्कं ध्यानात घेऊनच ते एकेक पाऊल सावधपणे टाकताहेत. जेव्हा ‘समाधान मंगळवेढेकरां’साठी ‘चंदूदादा कोथरुडकरां’नी शब्द टाकला, तसं त्यांनी ‘देवेंद्रपंत नागपूरकर’ यांच्याकडे धाव घेतली; मात्र सरकारच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगायला आसुसलेल्या ‘देवेंद्र पंतां’च्या डोक्यात वेगळीच गणितं. पंढरपूरची सीट हिसकावून घेतली तर ‘जनतेला सध्याचं सरकार नकोय,’ हे सिद्ध करायला ‘पेन ड्राईव्ह’चीही गरज नाही भासणार, हे त्यांच्या लक्षात आलेलं. त्यामुळेच ‘पंत निष्ठा’ यापेक्षाही ‘पक्ष प्रतिमा’ याक्षणी खूप महत्त्वाची असल्याचं त्यांनी ‘प्रशांत पंतां’ना पटवून दिलं.
सध्या प्रत्येक प्रकरणात क्लिपचा वापर करणाऱ्या ‘देवेंद्रपंतां’ना या निवडणुकीत ‘प्रशांत पंतां’च्या भाषणाची जुनी क्लिप नक्कीच परवडणारी नव्हती. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत ‘दामाजी’च त्यांच्या तोंडी राहिले. किती योगायोग पहा.. आजपर्यंत पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ की ‘पांडुरंग’ याचा निकाल ‘दामाजी’वर अवलंबून असायचा. आता ‘विठ्ठल’ की ‘दामाजी’ हा निर्णय ‘पांडुरंग’ची बावीस गावं घेणार. मात्र अजूनही दोन दिवस बाकी. शेवटच्या क्षणापर्यंत घडू शकतं काहीही. अकस्मात बदलू शकते उमेदवारी. तोपर्यंत लगाव बत्ती ..
कर्ज नको.. लस पाहिजे !
एका जागरूक नागरिकानं उत्साहानं ‘दाराशा’ दवाखान्याच्या मॅडमला फोन केला, ‘मला लस घ्यायचीय. काय-काय लागेल ?’ तिकडून गंभीरपणे आवाज आला, ‘आधारकार्ड लागेल. त्याला तुमचा फोन नंबर अटॅच हवा. जो तुमच्या खात्याशी जोडलेला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं केवायसी झालेलं असेल तरच ठीक.’ बिचाऱ्या नागरिकानं शांतपणे सांगितलं, ‘मॅडम.. मला लोन नकोय. लस हवीय.’ फोन कट.. सोलापूरकरांनो आलं का लक्षात ? शहरात लसीकरणाचा वेग का वाढेनासा झालाय ?
खासदार नको..
.. महाराज म्हणा !
…अक्कलकोटच्या गौडगाव मठाचे ‘महाराज’ तसे धर्माचे गाढे अभ्यासक. संस्कृतीचा इतिहास त्यांना पाठ. भवितव्य ओळखण्यातही म्हणे तसे ते हुशार. म्हणूनच की काय आजकाल सार्वजनिक सोहळ्यात हात जोडून लोकांना विनंती करताहेत, ‘मला खासदार म्हणू नका हो.. मला फक्त महाराज म्हणा. यातच मला आत्मिक समाधान.’ चपळगावच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांनी सर्वांसमोर अशीच विनंती केली, तेव्हा सारेच पडले चाट. ‘त्यांना आता खासदार राहण्यात आत्मिक इंटरेस्ट नसावा,’ असं गर्दीतला एक जण म्हणाला. ‘इल्ला..
हंग इल्ला. त्यांना आता आपण खासदार राहणार नसल्याची भौतिक जाणीव झाली असावी,’ दुसरा हळूच कानात पुटपुटला. नेमकं कारण महाराजांनाच माहीत. असो. जे इतिहास बदलायला जातात, त्यांचं भविष्य काय असतं, हे परफेक्ट एकच जण सांगू शकतो. तो म्हणजे बुळ्ळा. होय. शिवसिद्ध बुळ्ळा. लगाव बत्ती.
सोलापुरी रेटचं रेटिंग..
‘आयपीएस बदली फोन टॅप’ अहवालात सोलापूरशी संबंधित अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांची नावं लिस्टमध्ये झळकली. विशेष म्हणजे सोलापूरला पोस्टिंग मिळावं म्हणून एका एक्साईजवाल्यांनं म्हणे तब्बल ‘अर्धा खोका’ ओपन करण्याचीही तयारी दर्शविली. सोलापूरचा एवढा हाय रेट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढं काय सोलापूरला लागून गेलंय, असाही प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकला. मुंबईनंतर सर्वाधिक टीआरपी सोलापूरचा, या मागचं खरं कारण खूप कमी लोकांना ठाऊक. ‘मंथली’ अन् ‘तोडी’ हा इथल्या दोन नंबर धंदेवाल्यांचा आवडीचा शब्द ठरलेला. म्हणूनच एकेकाळी इथल्या ‘जेलरोड’ला सर्वोच्च बोलीचं मानांकन मिळालेलं. इथं जॉईन झालेल्या प्रामाणिक मंडळींनाही इथून ट्रेण्ड करूनच या लोकांनी पाठवून दिलेलं. ‘जाऊ द्या साहेब .. मिटवून टाका,’ हीच मेन्टॅलिटी राहिलेली. आता सांगा.. ‘खोकी क्लब’चं मेंबर बनायला कोणाला नाही आवडणार ? मग.. येताय का सोलापुरात ? लगाव बत्ती..