आडात आहे, पण पोहरा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:36 PM2020-09-16T22:36:41+5:302020-09-17T11:23:13+5:30

मिलिंद कुलकर्णी  माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच ...

There is a gap, but the pool is empty | आडात आहे, पण पोहरा रिकामा

आडात आहे, पण पोहरा रिकामा

Next

मिलिंद कुलकर्णी 
माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच पावसाने वार्षिक सरासरी गाठली. बहुसंख्य धरणे तुडुंब भरली. अतिवृष्टीने झालेले उडीद, मूग आणि काही प्रमाणात कापसाचे नुकसान वेदनादायक आहे. मात्र रब्बी हंगाम चांगला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. माणसाचा करंटेपणा पुन्हा ठळकपणे समोर आला, धरणे तुडुंब आहे, पण आमची नियोजनशून्यता, दूरदर्शीपणाचा अभाव, भ्रष्टाचाराची कीड यामुळे धरणे उशाला असून घसा कोरडा आहे. आडात आहे, पण पोहरा कोरडा राहिला आहे. शेती आणि नळपाणी योजनांना धरणातील पाणी पुरविण्यामध्ये जलसंपदा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे अपयश आले आहे. निसर्ग देतोय, पण आमची झोळी तोकडी आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.  
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पर्जन्यमानाची अचूक नोंद आणि माहिती मिळत आहे. पावसाचे अंदाज देखील बहुतांश खरे ठरले. वादळ, अतिवृष्टीची शक्यता वास्तवात उतरली. बिहार, आसाम आणि महाराष्टÑातील पूर्व विदर्भात महापुराने थैमान घातले. जीवित व वित्त हानी झाली. कोरोनाच्या संकटात पूरग्रस्तांचे दु:ख देशवासीयांना फारसे कळले नाही. मदतीचे हात तिथपर्यंत पोहोचले नाही. गेल्यावर्षी पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने हाहाकार उडविला होता. आपत्ती व्यवस्थापन, नदी जोड असे विषय अशा प्रसंगात पुन्हा ऐरणीवर येतात. चर्चा होते, मात्र कार्यवाही होत नाही, हे मोठे दुखणे आहे. 
पर्जन्यमानाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भडगाव (९४ टक्के) वगळता सर्व १४ तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाची तुलना केली तर अमळनेर, चोपडा, पारोळा व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस झाला आहे. तर जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव व बोदवड तालुक्यात गेल्या वर्षापेक्षा थोडा कमी पाऊस नोंदविला गेला आहे. अर्थात अर्धा सप्टेबर महिना बाकी असून परतीचा पाऊस चांगला होतो, असा अनुभव आहे. 
खान्देशातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा विचार केला तर १६ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर १५ प्रकल्प ८० टक्कयाहून अधिक भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण १०० टक्के भरले आहे, तर नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणदेखील भरले आहे. हतूनर धरणात ६५ टक्के साठा असला तरी त्याचा विसर्ग करण्यात येत असतो. 
मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी व मन्याड पूर्ण भरले आहेत. मोर व बहुळात ९० टक्कयापेक्षा अधिक साठा आहे. गुळ आणि अंजनी ७५ टक्कयापेक्षा अधिक भरली आहेत. भोकरबारी मात्र २१ टक्कयावर अडले आहे. धुळे जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी वाडीशेवाडी, सोनवद हे ९० टक्कयापेक्षा अधिक तर करवंद, अनेर ही ८० टक्के, अमरावती ७८ टक्के भरले आहेत. सुलवाडे बॅरेज ५० टक्के भरले असून सारंगखेडा, अक्कलपाडा ५० टक्कयापेक्षा कमी आहेत. पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. 
नंदुरबार जिल्ह्यात रंगावली प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकाशा बॅरेज ४४ टक्के, शिवण ९१ टक्के तर दरा ७२ टक्के भरले आहे. 
आबादानी स्थिती असताना प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे पाणी उपसा करुन बांधापर्यंत नेण्यासाठी असलेल्या उपसा सिंचन योजनांचे भिजत घोंगडे कायम आहे. बोदवडबाबतदेखील तीच स्थिती आहे. धरणे भरली आहेत, पण बांध कोरडे राहणार आहेत. ही स्थिती जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्यतेने आणि राजकीय मंडळींच्या भ्रष्ट कारभारामुळे उद्भवली आहे. 
धरणात पाणी असले तरी शहरांना रोज पाणीपुरवठा करणारी शहरे मोजकी आहेत. शहादा आणि नवापूरला रोज पाणीपुरवठा होतो. नंदुरबारला पाणीपुरवठा करणाºया विचरक धरणात ९० टक्के तर आंबेपारा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे, पण साठवण क्षमतेअभावी एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. धुळ्याला नकाणे तलावावरुन पाणी दिले जाते, तलाव पूर्ण भरलाय पण शहरात दोन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. वाघूर धरण १०० टक्के भरले आहे, पण जळगावला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. साक्रीमध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. केंद्र सरकारची अमृत पाणी योजना धुळे, जळगाव व भुसावळात सुरु आहे, पण त्यात अडथळे कायम आहे. शिरपुरात मात्र मुबलक पाणी पुरवठा होत आहे. निसर्गाचे देणे आम्ही कसे स्विकारतो, यावर बरेच अवलंबून आहे.

Web Title: There is a gap, but the pool is empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव