प्रचंड चीड येते, भावनाही होतात अनावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:23 AM2023-03-19T11:23:21+5:302023-03-19T11:23:45+5:30

कोवळ्या वयातील मुलींना जेव्हा नात्यातील किंवा परिचित वा शेजारच्या विश्वासातील माणसाकडून न कळणारे अत्याचार सहन करावे लागतात, तेव्हा एक माणूस म्हणून आम्हा पोलिसांनाही प्रचंड चीड येते आणि भावनाही अनावर होतातच...

There is a lot of irritation, feelings are also felt... | प्रचंड चीड येते, भावनाही होतात अनावर...

प्रचंड चीड येते, भावनाही होतात अनावर...

googlenewsNext

- मितेश घट्टे
(अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

'संवेदना’ या शब्दाची जाणीव गुन्हेगारी प्रवृत्तीला असतेच असे नाही. किंबहुना, गुन्हेगारी प्रवृत्तीला जात, धर्म, भाषा वा प्रांत असा कोणताही शिक्का मारता येत नाही. लहान वयाच्या मुलांवर शारिरीक व मानसिक अत्याचाराच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होते, तेव्हा त्याचे गांभीर्य निश्चित जास्त असते. सामाजिक, मानसिक संवेेदना नष्ट होऊन ‘असंवेदनशील’तेचा कळस गाठणारा एखादा संशयित समोर येतो तेव्हा मनात प्रचंड चीड येते. कायद्याचा आदर रक्तात भिनलेला असल्याने अनेकदा चीड येऊनही स्वतःला सावरत गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसवण्यासाठी आम्ही पोलीस प्रयत्नशील राहतो. 

पोलीस तपास करीत असताना समाज मनाचे अनेक कंगोरे समजतात. काही वेळा मनात निराशेचे ढग दाटून येतात.  अशा घटना ‘संवेदना’ या शब्दाला पुरते चिरडून टाकत ‘असंवेदनशिल’तेचा कळस गाठल्याची जाणीव करुन देतात. समाजात मुली, स्त्रियांना आजही स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचे उदाहरण म्हणजे अशा घटना तर नव्हेत ना? असा विचार घोळू लागतो.
अत्यंत गोपनीयता बाळगून संवेदनशील तपास करावा लागतो.  आरोपीने केलेल्या कृत्याचे खरे रूप बाहेर आणताना पिडितेच्या कोमल बाल मनावरचे ओरखडे पुसण्याचेही भान ठेवावे लागते.

पिडितेच्या घरातील वा शेजारचा कोणी वडीलधारी इसम कधी प्रेमाच्या नावाखाली तर कधी धाक दाखवून वासनेची भूक शमविण्यासाठी सरसावतो त्यावेळी ती गोष्ट जास्त दिवस लपून राहत नाही. कधी कधी अध्यात्माचा आव आणत तोळामोळा शरीर असणारा जर्जर आपले कृत्य जेव्हा कबूल करतो, तेव्हा एका बाजूला त्याच्याकडे पाहून चीड टोकाला जाते,  अन् दुसरीकडे त्या निरागस मुलीकडे पाहून मनात हळहळीने कमालीचा भावनिक हुंदका दाटून येतो. जगाची सोडाच स्वतः च्या  शरीराची, मनाचीही ओळख न झालेल्या त्या निष्पाप मुलीवर ओढवलेला प्रसंग समाजाच्या संवेदनेची वीण उसवत चालली आहे का? असा प्रश्न उभा करतो. गर्दीत राहणारी माणसे मनाने स्वत:ला एकाकी समजत अपवादात्मकरित्या  शारिरिक भूक भागवण्यासाठी सामाजिक संवेदनेचे लचके तोडण्याची मानसिकता घेऊन फिरत असतात हे या घटनेने समोर येते. 

सोशल मिडीया जगरहाटी बनलेला असून तो गावागावात, घराघरात पोहचला आहे. सोशल मिडीयावर व घराघरात पाहिल्या जाणाऱ्या दूरचित्रवाणी मालिकांमधून दाखवला जाणारा लैंगिक स्वातंत्र्याचा स्वैराचार हासुद्धा अशा घटनांना कारणीभूत ठरतोय, असे म्हणायला वाव आहे. कारण माध्यमांतून लैंगिकतेचे  आभासी चित्र तयार करून वास्तवाला छेद दिला जातोय आणि नेमके त्याचेच आकर्षण वेगाने वाढत आहे. या आभासी सोशल मिडीयाने अनेकांची मानसिक वृत्ती एका असंवेदनशील प्रवृत्तीत बदलते. यातून दुर्गा म्हणून गौरवली जाणारी, सरस्वती म्हणून पूजली जाणारी स्त्री अनेकदा अस्तित्वासाठी किती संघर्ष करते हा विचार सुन्न करतो. स्त्री-पुरूष समानता नक्कीच आहे, पण शहराच्या काही भागांत आणि ग्रामीण भागातील वाड्या-वस्तीत या समानतेचा वारा अजुनही फिरकलेला नाही असे चित्र डोळ्यासमोर येते. ते वास्तव आहे याची जाणीवदेखील अशा घटनांमधूून होते. 

समाजातील मुली, स्त्रियांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी आपले पोलीस दल कायमच प्रयत्नशील आहे. प्रत्येक मुलीला गुड टच...बॅड टच यांसह समाजात नेमके कोण कसे वागते याची जाणीव करून देण्यासाठी विविध  उपक्रम राबविले जातात. पोलिसांच्या या प्रयत्नांना खूप वेळा यश येऊन कितीतरी गुन्हे घडण्यापुर्वी त्या प्रवृत्तींना आळा बसला आहे. यापुढेही हे प्रयत्न महाराष्ट्र पोलीस दलाकडून होत राहतील यात शंका नाही.

सुरक्षिततेची सावली
समाजात ठराविक मानसिकतेत उरलेली असंवेदनशिलता नष्ट करण्यासाठी सामाजिक संस्कार आणि सामाजिक शिक्षण याची बिजं रूजवावी लागतील. जेव्हा ही सामाजिक संस्काराची बिजं बाळसं धरतील तेव्हा त्याचे रूपांतर सुदृढ समाज रचनेच्या व्यापक वृक्षात होईल. हाच सामाजिक संस्कारांचा व्यापक वृक्ष समाजातील मुली, स्त्रियांना सुरक्षिततेची सावली देईल. 

Web Title: There is a lot of irritation, feelings are also felt...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.