तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:57 AM2024-11-19T06:57:51+5:302024-11-19T06:58:47+5:30

दोघेही राष्ट्रभक्ती, परंपरावाद, राष्ट्रीय अस्मिता या मूल्यांचे पाईक आहेत. टीका होत असली, तरीही त्यांनी नव्या जागतिक रचनेवर प्रभुत्व मिळवले आहे.

There is Donald Trump.. and here is Narendra Modi | तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी

तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
‘सारख्याच प्रमाणात प्रेम आणि तिरस्कार वाट्याला आलेला जागतिक नेता कोण?’- असा प्रश्न कुणी विचारला तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेच नाव घ्यावे लागते. याबाबतीत नरेंद्र मोदी हे त्यांचे जुळे बंधूच म्हणावे लागतील. दोघेही राष्ट्रभक्ती, परंपरावाद आणि राष्ट्रीय अस्मिता या मूल्यांचे पाईक आहेत. डावीकडे झुकलेली माध्यमे तसेच हॉलिवूड आणि युरोपमधील उदारमतवादी लोक ट्रम्प यांचा तिरस्कार करतात. भारतातही निधर्मी विवेकाचे योद्धे, ‘आक्रमक राष्ट्रवादी’ म्हणून मोदींवर टीकेचे आसूड ओढत असतात. परंतु मोदी आणि ट्रम्प हे दोघेही नव्या जागतिक  रचनेवर प्रभुत्व गाजवणारे पंथ  बनले आहेत.

मोदी आणि ट्रम्प हे दोघेही वेगाने शक्तिमान झालेले राजकीय नेते आहेत. मोदींनी दिल्लीतील दरबारी शक्तिकेंद्रे नष्ट करण्याचा विडा उचलला होता, तर ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील राजकीय दलदल नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती. मोदींनीही आपले अंगीकृत कार्य आणि आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्तेचे केंद्रीकरण केलेले आहे. त्यांचे पंतप्रधान कार्यालयच आता सारे निर्णय घेत असते. ही दोन्ही माणसे सत्तेच्या परिघाबाहेरून सत्तेत आली आहेत.

२०१४ सालचा मोदींचा आणि ट्रम्प यांचा ताजा विजय या घटना एकवटलेल्या सत्ताकेंद्राचा स्वीकार, राष्ट्रभक्तीचे पुष्टीकरण आणि अधिकारशहांप्रति जनसमूहांमध्ये असलेल्या आकर्षणाचे पुरावेच आहेत. या दोघांमध्ये १२,००० किलोमीटरचे भौगोलिक अंतर असले तरी  समान निष्ठांनी ते परस्परांशी जोडलेले दिसतात. दोघेही आपापल्या पक्षापेक्षा अनेक अंगुळे उंच आहेत. ते राज्यघटनेची शपथ तर घेतात; पण घटना देते त्यापेक्षा अधिक सत्ता मिळवण्यासाठी घटनेतूनच हव्या तशा पळवाटाही काढतात. 

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या  घोषणेच्या जोरावर, येत्या जानेवारीत  ट्रम्प आपला दुसरा कार्यकाल सुरू करतील. एकसंध अमेरिका ही संकल्पना धोक्यात आली असल्याची खात्री त्यांनी मतदारांना पटवली. प्रचारादरम्यान खास ट्रम्पीय चुटके तसेच कुचेष्टा आणि अवहेलना करणारी मुक्ताफळे उधळत त्यांनी आपल्या पाठीराख्यांच्या आणि कुंपणावरच्या लोकांच्या मनात पक्के बिंबवले की डेमॉक्रॅट्स परत  सत्तेवर आले तर ‘जागतिक महासत्ता’ हे अमेरिकेचे स्थान धोक्यात येईल. त्यांची निवडणूक प्रचार मोहीम बरीचशी २०१३ च्या मोदी-मोहिमेसारखीच असल्याचे दिसते. 

त्यावेळी मोदींनी विभागलेल्या भारताला एक करण्यासाठी ‘सुरक्षित भारत’ हे ब्रह्मास्त्र वापरले. पाकिस्तानला कडक शासन करण्याची आणि जम्मू-काश्मीरला वेगळी ओळख देणारे कलम ३७० हटवण्याची प्रतिज्ञाही केली. बेकायदेशीर स्थलांतरितांना ट्रम्प यांनी केलेला कडाडून विरोध हे रिपब्लिकन पक्षाच्या विजयाचे प्रमुख कारण आहे. ‘कमला हॅरिसना मत म्हणजे  ४ ते ५ कोटी बेकायदेशीर उपऱ्यांना आपल्या देशावर आक्रमण करायला,  तुमचे पैसे चोरायला, तुमचे रोजगार पळवायला खुले आमंत्रण!’ - असे जहाल शब्द त्यांनी वापरले. मोदींनीही २०१४ च्या प्रचार मोहिमेत सांस्कृतिक अराजकता निर्माण करणाऱ्या तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या स्थलांतरितांच्या धोक्याचाच मुद्दा लावून धरला होता. 

मोदी आणि ट्रम्प दोघेही आपापल्या राष्ट्राच्या  जीवनपद्धतीचे  कट्टर  कैवारी आहेत. २०१७ साली पोलिटिको मॅगझिनने ट्रम्प यांचे वर्णन ‘सांस्कृतिक युद्ध लढणारा राष्ट्राध्यक्ष’ असे केले होते. ५० टक्क्यांहून जास्त मते मिळवून ट्रम्प यांनी हे सांस्कृतिक युद्ध आता जिंकलेले आहे. इकडे भारतात हिंदू जीवनपद्धतीचे महत्त्व पुनर्स्थापित करण्यासाठी नरेंद्र मोदी अविश्रांत झुंजत आहेत.  त्यांच्या नेतृत्वाखाली, भाजपशासित राज्य सरकारांनी जुन्या  शहरांची केवळ नावेच बदललेली नाहीत तर वेगाने नष्ट होऊ लागलेल्या प्राचीन हिंदू आणि आदिवासी  मंदिरांचेही  पुनरुज्जीवन केले आहे.

ट्रम्प उद्योजक घराण्यातच जन्माला आले आणि लहानाचे मोठे झाले. मोदींची उद्योगविषयक जाण त्यांच्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य असलेल्या वृत्तीतून आलेली आहे.  पंतप्रधान झाल्या झाल्या ते सरळच म्हणाले होते, ‘मी गुजराती आहे आणि प्रत्येक गुजरात्याला उद्योग कसा करावा हे चांगलेच माहीत असते.’ कर कमी करण्याची आणि सरकारचा आकार कमी करण्याची भाषा ट्रम्प करत आहेत.  

कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर २५ टक्क्यांपर्यंत खाली आणणारे मोदी हेच पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. उद्योजक हे संपत्तीचे निर्माते आहेत, असे ते म्हणतात आणि देशात उद्यमसुलभता निर्माण व्हावी म्हणून सरकारी यंत्रणांना चालना देतात. वैचारिक पातळीवर असो वा वैयक्तिक,  ट्रम्प आणि मोदींचा चीनवर मुळीच विश्वास नाही. इस्रायल हा ट्रम्प आणि मोदींमधील आणखी एक सामायिक दुवा. हे दोघे समाजमाध्यमांचा उत्तम वापर करण्यातही तितकेच वाकबगार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात अशी अनेक साम्ये दिसतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधान यांची चार वर्षांत आठ वेळा भेट होणे हे केवळ मोदी-ट्रम्प यांच्याच बाबतीत घडले आहे.  कट्टर राष्ट्रवादी लोकसमूहांच्या दृष्टीने तर हे दोघे, उदारमतवाद इतिहासाच्या कचरापेटीत फेकून देत, नवा इतिहास घडवत असलेले महानायक आहेत.

Web Title: There is Donald Trump.. and here is Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.