भाजपमध्ये सगळे आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही; पक्षात सुप्त गटबाजीचे काटे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 09:03 AM2022-09-16T09:03:10+5:302022-09-16T09:03:40+5:30
गटबाजी म्हटली की चर्चा होते ती काँग्रेसची; पण भाजपमध्येही ती आहे. खपवून घेतले जात नाही ते सोडा; पण भाजपमध्ये ‘आपसी संघर्ष’ आहेच!
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
चंद्रशेखर बावनकुळे १२ ऑगस्टला भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. गेल्या ३४ दिवसांत ते १४ जिल्ह्यांमध्ये फिरून आले. ती हवाई पाहणी नव्हती. रात्री एकेक वाजेपर्यंत बसून त्यांनी बैठका घेतल्या, मेळावे घेतले. नव्या बाटलीत जुनी दारू याप्रमाणे या नव्या प्रदेशाध्यक्षांसोबत जुनीच कार्यकारिणी आहे. जानेवारीपर्यंत तिलाच घेऊन त्यांना पुढे जावे लागेल. त्यापूर्वी फक्त सरचिटणीस बदलले आहेत. बावनकुळेंसमोर आव्हाने बरीच आहेत. गटबाजी म्हटली की पहिले चर्चा होते ती काँग्रेसची; पण भाजपमध्येही ती आहे. भाजपमधील चढाओढीची चर्चा मुंडे-गडकरी काळात व्हायची तेवढी आज होत नाही; कारण ती तेव्हा राज्य पातळीवरून गावतालुक्यापर्यंत झिरपलेली असायची.
फडणवीस प्रदेशाध्यक्ष आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यापासून हे चित्र बदलले. कारण, मुंडे-गडकरी या गटबाजीपासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले. फडणवीस विरुद्ध पक्षातील काही नेते असे चित्र निर्माण झाले; फडणवीसांनी काही नेत्यांचे खच्चीकरण केल्याचाही आरोप झाला; पण दोन गट आमनेसामने यासाठी आले नाहीत; कारण फडणवीसांचा खालपर्यंत स्वत:चा गट तेव्हा नव्हता. तसेच इतर नेत्यांनीही फडणविसांबरोबरचा वाद खाली झिरपू दिला नाही. त्यामुळे वाद नेत्यांपुरते मर्यादित राहिले. देशपातळीवर मोदी-शहा यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यानंतर गटतटाचे राजकारण करणाऱ्यांना आपसुकच मेसेज गेला की हे पक्षात यापुढे चालणार नाही, त्यामुळेही खूपजण तसेही वचकून असतात. जेवढे गट असतील तेवढा पक्ष वाढतो, असे म्हणत काँग्रेसमध्ये गटबाजीला खतपाणी घातले गेले, भाजपमध्ये आजतरी ते खपवून घेतले जात नाही. तरीही काही टापू आपसी संघर्षाचे आहेतच. त्याची सुरुवात नरिमन पॉईंटमधील प्रदेश भाजप कार्यालयापासून होते, तिथे स्कॅनिंग केले तर बावनकुळेंना तिथला पायओढेपणा दिसेल. नवीन आलेल्यांना तिकडचे मठाधिपती रुजू देत नाहीत.
भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलतात; प्रदेश कार्यकारिणीही बदलते; पण प्रदेश कार्यालयात मात्र अढळपदे आहेत. भाजपच्या दृष्टीने काही जिल्हे जमिनीखालच्या ज्वालामुखीवर उभे आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अमरावती. तिथे एकमेकांची तोंडे इतकी विरोधी दिशेला आहेत की आता दिशांची संख्या वाढवायची वेळ आली आहे. अमरावतीतल्या भाजप नेत्यांची सकाळ विरोधकांपेक्षा पक्षातील लोकांवर तोंडसुख घेण्यापासून होते. त्यात पुन्हा रवी राणा ही स्टेपनी आहेच. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर यांची ‘पुरानी रंजिश’ कायम आहे. त्यात मुनगंटीवार विरुद्ध आ. बंटी भांगडिया अशी भर पडली आहे. वर्धेत आ. पंकज भोयर यांचे वेगळे अन् बाकीच्यांचे वेगळे आणि मूळ भाजपवाले आणखी वेगळे असे काही वेळा चालते; पण फाटलेले वगैरे नाही.
अकोल्यात उभा दावा आहे तो खा. धोत्रे विरुद्ध रणजित पाटील यांच्यात. अर्थात पाटील यांचा गट एकट्यापुरता आहे. बाजूच्या बुलडाण्यात आ. संजय कुटे आणि आ. आकाश फुंडकर-आ. श्वेता महाले अशी कधीतरी कुठेतरी खुटखुट होते; पण फार नाही. जळगावमध्ये एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने मोठी गटबाजी राहिलेली नाही; पण खा. उन्मेष पाटील आणि महाजनांचे खास असलेले आ. मंगेश चव्हाण यांच्यात सुप्त खेचाखेची चाललेली असते. नंदुरबारमध्ये मंत्री विजयकुमार गावित भाजप विरुद्ध भाजप असे खटके उडायचे; पण आता दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. परवा, तिथले अध्यक्ष विजय चौधरी हे गावित यांच्याशी मंत्री दालनातील अँटीचेम्बरमध्ये छान गप्पा करत असल्याचे पाहून सुखद धक्काच बसला.
अमरावतीच्या खालोखाल खेचाखेची असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर अन् सोलापूर हे जिल्हे आहेत. लातूरमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अभिमन्यू पवार हा वाद लपून राहिलेला नाही. सोलापूरमध्ये माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजय देशमुख वादात नवीन जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टींचे भजे होऊ नये. कल्याणशेट्टी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आहेत, त्यामुळे त्यांना फार त्रास देण्याची कोणाची हिंमत होईल, असे वाटत नाही. सांगलीमध्ये खा. संजयकाका विरुद्ध पृथ्वीराज देशमुख अशी सुप्त संघर्षाची किनार आहेच. पुण्यात गिरीश बापट यांना मानणारा भाजपमधील वर्ग चंद्रकांत पाटील यांना मनापासून स्वीकारायला तयार नाही. शिवाय फडणवीस यांच्याशी थेट कनेक्ट असलेले चाळीशी-पन्नाशीतले नेतृत्व पुढे येत आहे. बाजूच्या अहमदनगरमध्ये भाजपमधील रुसवेफुगवे कमी झालेले दिसतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटबाजी टाळत आहेत. दोन-चार तोडीस तोड नेते असले की मतभेद धारदार असतात; पण तसे नसल्याने धुळे, नाशिक, वाशिम, जालना, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रायगड, कोल्हापूर अशा काही जिल्ह्यांमध्ये भाजपअंतर्गत उभा वाद वगैरे फारसा दिसत नाही.
राष्ट्रवादीतून आलेल्या दोन राजांची (खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले) वेगळी लढाई साताऱ्यात बघायला मिळते.
फडणवीस यांचे एक मानले पाहिजे. भाजपच्या जिल्हाजिल्ह्यातील दोन्ही गटांचे नेते आपणच फडणवीसांच्या जवळचे असल्याचा दावा करतात. असा विश्वास एकाचवेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांना देण्याचे कौशल्य फडणवीस यांनी साधले आहे. बावनकुळे लवकरच ते कौशल्य आत्मसात करतील अशी अपेक्षा आहे. भाजपमध्ये सगळे आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही. वरखाली सत्ता असल्याने गटबाजीचा फटका पक्षाला फारसा बसत नाही एवढेच. बावनकुळेंची वाट काटेरी आहे, लगेच न दिसणारे वाटेवरचे काटे वेचत त्यांना जावे लागेल. फडणवीस-बावनकुळे मैत्री घट्ट आहे. फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे लक्ष समोर ठेवून बावनकुळे काम करत आहेत.
अमित शहा येऊन गेले, आता जे. पी. नड्डा दोन दिवस मुंबईत येणार आहेत. दिल्लीची नजर महाराष्ट्रावर खिळलेली आहेच.