घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 07:56 AM2024-10-09T07:56:10+5:302024-10-09T07:58:39+5:30
पक्षाध्यक्षपदासाठी योग्य माणूस सापडेना अशी वेळ भाजपवर याआधी आली नव्हती. बारावा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया मात्र गुंतागुंतीची झालेली दिसते.
प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
जगातला सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये गुणवत्तेचा दुष्काळ दिसतो आहे. एरवी सत्तेची सुगी अनुभवणाऱ्या पक्षाने अनेक यशस्वी प्रशासक निर्माण केले हेही खरे. निसर्गाला पोकळी नको असते आणि पोकळीला अडगळ. मे २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला बहुमताइतक्याही जागा मिळू शकल्या नाहीत. पक्षाध्यक्षांचे काम आणखीनच कठीण झाले. जून महिन्यात मुदत संपली असतानाही जे.पी. नड्डा हे जिकिरीचे काम करत राहिले कारण नेतृत्वाला पर्याय शोधता आला नाही. पक्षाचे ते केवळ तात्पुरते प्रमुख नाहीत. केंद्रातले एक मंत्रिपदही त्यांच्याकडे आहे. आता मात्र भाजपला पक्षाध्यक्षपदाचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. विरोधी पक्षात असताना भाजपकडे एका अटल बिहारींसारखे चार चार वाजपेयी असत; तसेच अडवाणीही. त्यामुळे पक्षाध्यक्षपदासाठी माणूस सापडेना अशी वेळ येत नसे. आता बारावा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया चालू असताना एकामागून एक नावे समोर येत आहेत आणि मागेही पडत आहेत...
शिवराजसिंह चौहान
१९७२ साली वयाच्या १३व्या वर्षी संघ स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलेले शिवराजसिंह आता ६५ वर्षांचे असून, त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. वय, जात, विश्वासार्हता, अनुभव आणि स्वीकारार्हता एवढ्या गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत, शिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतले आहेत. विरोधकही त्यांच्याकडे फार रागाने पाहत नाहीत. मध्य प्रदेशात मामा म्हणून ओळखले जाणारे शिवराज लोकांमधला माणूस असून, कोणालाही ते सहज उपलब्ध होतात. वाजपेयी आणि अडवाणी अशा दोघांनीही भविष्यातला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले आणि २००५ साली त्यांना मुख्यमंत्री केले. ग्रामीण भागातून त्यांना चांगला पाठिंबा मिळतो. मात्र स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या बाबतीत वजाबाकीचे कारण ठरू शकते.
देवेंद्र फडणवीस
नागपूरचे ५४ वर्षीय मराठी नेते देवेंद्र फडणवीस ३५ वर्ष संघ परिवाराशी जोडले गेलेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून ते पुढे आले. २०१४ साली महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर गुणवंतांच्या शोधात असलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी त्यावेळी ४४ वर्षे वय असलेल्या या ब्राह्मण नेत्याला मुख्यमंत्री केले. कोणत्याही स्थानिक गटांशी ते जोडलेले नाहीत तसेच ते श्रेष्ठींच्या जवळचे असल्याने त्यांचेही नाव अग्रभागी आहे. मात्र त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर मोठे असे संघटनात्मक काम केलेले नाही; त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा फारच थोडा संपर्क आहे. केवळ मोदी आणि शाह यांच्याशी असलेली जवळीक त्यांना या सर्वोच्च पदापर्यंत न्यायला पुरेशी नाही.
वसुंधराराजे शिंदे
७१ वर्षीय वसुंधराराजे गेला काही काळ बाजूला पडल्या असल्या तरी रिंगणातून बाहेर गेलेल्या नाहीत. श्रेष्ठींनी त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद तिसऱ्यांदा मिळू दिले नाही. संघ परिवाराशी त्यांचा घरोबा असल्याने संघ नेतृत्व त्यांच्या बाबतीत अनुकूल दिसते.
धर्मेंद्र प्रधान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घडविलेल्या ५५ वर्षीय प्रधान यांचा ओडिशात चांगला दबदबा असून, राज्य तसेच दिल्लीत संघ आणि भाजपच्या कार्यक्रमात त्यांच्या शब्दाला वजन असते. वैचारिकदृष्ट्या विश्वासार्हता असलेले, राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अटल-अडवाणी युग मागे पडल्यानंतर मोदी यांनी त्यांना संघटनात्मक आणि सरकारी कामात गुंतवले. दीर्घ काळ पेट्रोलियम मंत्रालय त्यांनी सांभाळले आहे. मात्र त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील स्वीकारार्हता नाही, असे त्यांच्या विरोधकांना वाटते.
भूपेंद्र यादव
व्यवसायाने वकील असलेले ५५ वर्षांचे राजस्थानी नेते भूपेंद्र यादव यांनी संघप्रणीत वकील संघटनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. अटल-अडवाणी कालखंडातच राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणून ते उदयास आले. २०१० साली नितीन गडकरी यांनी त्यांना भाजपचे राष्ट्रीय चिटणीस केले. तेव्हापासून श्रेष्ठी कायम विश्वास टाकत आले आणि महत्त्वाची पदेही त्यांना मिळाली. यादव यांनी राजस्थान, गुजरात आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुका हाताळल्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु संघातील काही लोकांना वाटते की पक्षाध्यक्षपदासाठी त्यांना बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.
मोदी आणि संघाकडे नकाराधिकार आहे. भाजपकडे राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांची भक्कम अशी फळी होती, तेव्हा अध्यक्ष मिळणे सोपे होते. भैरवसिंग शेखावत, प्रमोद महाजन, कल्याण सिंह, गोपीनाथ मुंडे, अनंत कुमार, सुषमा स्वराज, बी. एस. येडियुरप्पा यांच्यासारखे बडे नेते त्यावेळी होते. एखाद्याला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षाचे काम करायला सांगितले जाणे भाजपसाठी नवीन नाही. राजनाथ सिंह, गडकरी किंवा शिवराजसिंह चौहान, नाही तर विश्वासातला एखादा स्वयंसेवक नड्डा यांची जागा घेऊ शकेल. भाजपच्या ४४ वर्षांच्या वाटचालीत वाजपेयी आणि अडवाणी यांनी १५ वर्षे नेतृत्व केले. अमित शाह यांनी एकसंध असा राष्ट्रीय ठसा उमटवला. भाजप संघाच्या पाठिंब्याशिवाय तग धरू शकतो, असे म्हणणाऱ्या नड्डा यांच्या काळात त्यांचाच हा विचार पक्षाला महागात पडला.
कदाचित येत्या जानेवारीत नवा अध्यक्ष निवडला जाईल तेव्हा नड्डा म्हणाले ते योग्यच होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मातृअधिकार अजूनही चालतो हे कळेलच.