वरुणच्या चिमट्यांवर चिंतन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:18 AM2018-04-24T03:18:44+5:302018-04-24T03:18:44+5:30

स्पष्टवक्तेपणाचा मूळ गुण त्यांच्यात अजूनही कायम आहे आणि मागील आठवड्यात नागपुरात याचे प्रत्यंतर आले.

There is a need for contemplation on Varun's tongs | वरुणच्या चिमट्यांवर चिंतन हवे

वरुणच्या चिमट्यांवर चिंतन हवे

Next

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेले भाजप खासदार वरुण गांधी यांनी गेल्या काही काळापासून मौन धारण केले आहे. प्रसारमाध्यमांशीदेखील बोलण्याचे ते बहुतांश वेळा टाळतात. मात्र स्पष्टवक्तेपणाचा मूळ गुण त्यांच्यात अजूनही कायम आहे आणि मागील आठवड्यात नागपुरात याचे प्रत्यंतर आले. सार्वजनिक मंचावरून बोलत असताना वरुण गांधी यांनी स्वपक्षीयांच्या विरोधक द्वेषावरच अप्रत्यक्षपणे चिमटे काढले. अनेकदा विरोधी बाकांवर तज्ज्ञ सदस्य असतात. त्यांचा सन्मान व्हायला हवा, असे स्पष्ट मत त्यांनी नागपुरात एका परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. सत्तापक्षातच असल्यामुळे वरुण गांधी यांच्या या वक्तव्याला जास्त गंभीरतेने घेतले गेले पाहिजे. मुळात वरुण गांधी यांना असे वाटणे आणि जाहीरपणे त्यावर भाष्य करणे याची आवश्यकता का भासली याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. केवळ बोलण्यासाठी त्यांनी वरील भावना नक्कीच व्यक्त केलेल्या नाही. गेल्या काही काळापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील संघर्ष जास्तच तापल्याचे दिसून येत आहे. लहानलहान व जनहिताशी काहीही संबंध नसलेल्या अनेक मुद्यांना राजकीय स्वरूप देण्यात येत आहे. यातूनच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. अनेकदा अतिउत्साहात संयम सुटतो आणि लोकशाहीच्या परंपरांना हरताळ फासत समोरच्याचा अपमान करत शब्दबंबाळ करण्यात येते. याहून पुढे जात काही जण तर आपल्या कृतीनेच सन्मानाची चिरफाड करतात. निवडणुकांच्या काळात तर अशी अनेक उदाहरणे दिसून येतातच. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे हे देशाचे दुर्दैव आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेचा इतिहास लक्षात घेतला तर विरोधकांप्रती सन्मानाची एक मोठी परंपरा आपल्या देशात राहिलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दुर्गेची दिलेली उपमा असो किंवा डावी विचारसरणी असूनदेखील ए.बी.बर्धन यांची तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी खुल्या दिल्याने केलेली स्तुती, अशा अनेक घटना भारतीय राजकारणाच्या इतिहासाने अनुभवल्या आहेत. मात्र आता राजकारण गलिच्छ पातळीवर जात आहे. संसदेतदेखील एकमेकांचा सन्मान करण्याची नेत्यांमधील भावना कमी होत असल्याचे जनतेला ‘लाईव्ह’ दिसून येत आहे. लोकशाहीसाठी ही बाब नक्कीच धोकादायक आहे.

Web Title: There is a need for contemplation on Varun's tongs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.