कलाक्षेत्रातही नोकरी आणि शिक्षणाची सांगड आवश्यक

By Admin | Published: August 28, 2016 01:55 AM2016-08-28T01:55:59+5:302016-08-28T01:55:59+5:30

कोणत्याही कलाक्षेत्रात विशेषत: संगीत क्षेत्रात पदार्पण करताना कलाकारांना सांगितले जाते की, तुम्ही एकच काहीतरी करा, शिक्षण, नोकरी किंवा संगीत. आज मला तुमच्याशी

There is a need for employment and education in the field of art | कलाक्षेत्रातही नोकरी आणि शिक्षणाची सांगड आवश्यक

कलाक्षेत्रातही नोकरी आणि शिक्षणाची सांगड आवश्यक

googlenewsNext

- आनंद भाटे

कोणत्याही कलाक्षेत्रात विशेषत: संगीत क्षेत्रात पदार्पण करताना कलाकारांना सांगितले जाते की, तुम्ही एकच काहीतरी करा, शिक्षण, नोकरी किंवा संगीत. आज मला तुमच्याशी या विषयावरच बोलायचे आहे. तुम्हाला कोणतेही क्षेत्र निवडायचे असो. मात्र, त्यासाठी नोकरी किंवा शिक्षण सोडणे योग्य नाही. आजच्या काळात निदान पदवीपर्यंतचे शिक्षण तर आवश्यकच आहे. कारण शिक्षणामुळे तुमच्या कलेला आणखी उजाळा मिळतो, तुमच्यात मॅच्युरिटी येते, असे मला वाटते. माझ्या घरात पहिल्यापासूनच शिक्षण व संगीताचे वातावरण होते. माझी आई अर्थशास्त्राची प्रोफेसर होती, तर माझे पणजोबा रंगभूमीवरील शास्त्रीय नाट्यसंगीत क्षेत्रात ‘भाटेबुवा’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे शिक्षण व संगीत असे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले. मी जेव्हा दहा वर्षांचा होतो, तेव्हा मला एका दूरदर्शनच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळाली. मी माझे भाग्य समजतो की, भीमसेन जोशींसारखे दिग्गज माझे गुरू आहेत. मी त्यांच्याकडे संगीताचे धडे गिरवत असताना, मला आयटी इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी अडचण येत होती. त्या वेळी त्यांनीच मला माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गायकी जोपासताना शिक्षण सोड, असे त्यांनी कधीही म्हटले नाही, उलट वेळोवेळी ते मला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असत. मी आयटी क्षेत्रात इंजिनीअर आहे, ते केवळ त्यांच्या पाठिंब्यामुळेच. त्यांच्याकडे येणाऱ्यांना ते आवर्जून माझी ओळख करून देत की, हा माझा शिष्य आयटीचा इंजिनीअर आहे. त्यांच्या बोलण्यातून मला माझ्याबद्दलचे त्यांच्या मनातील कौतुक जाणवत असे. माझे शैक्षणिक क्षेत्र पूर्णत: वेगळे आहे. आज संगीत क्षेत्रात एक यशस्वी गायक म्हणून वावरताना, बऱ्याच वेळा मला हा प्रश्न विचारला जातो की, तुम्ही नोकरी आणि संगीत हे दोन्ही कशा प्रकारे मॅनेज करता? तर मला सांगावेसे वाटते की, कोणतीही कला जोपासायची तर त्यासाठी तुम्ही तुमची नोकरी, शिक्षण व कलेची सांगड घातली पाहिजे. मी शिक्षणाबरोबरच माझी गायकी जोपासू शकलो, यात माझ्या आई व दोन्ही बहिणींचाही खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मदतीशिवाय मला काही शक्यच नव्हते.
मी नोकरीनिमित्त परदेशी गेलो होतो, त्या वेळी संगीतामध्ये माझा जवळपास चार-पाच वर्षांचा खंड पडला होता. मात्र, नंतर मला माझ्या आॅफिसच्या मॅनेजमेंटने सहकार्य केले आणि या क्षेत्रात मी पुन्हा कार्यरत झालो. मला ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली आणि मी यशाचे एक शिखर पार केले. मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर, माझे खूप नाव झाले, मला खूप काम मिळू लागले. मग मी संगीतासाठी पूर्ण वेळ द्यायचे ठरविले. आयटीचे क्षेत्र सोडून संगीतात पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय तसा धाडसाचाच होता, पण या निर्णयात मला माझी पत्नी व मुलगा यांचे खूप सहकार्य व पाठिंबा मिळाला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हते. या क्षेत्रात येणाऱ्या उदयोन्मुखांना मी आवर्जून सांगू इच्छितो की, तुम्हाला एखाद्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षण किंवा नोकरी सोडली पाहिजे, असे नाहीये. उलट शिक्षणाने तुमच्या कलेला मॅच्युरिटी येते. मी तर म्हणेन की, सध्या पदवीपर्यंतचे शिक्षण अनिवार्यच आहे. मात्र, हेही लक्षात ठेवा की, कधी कुठली संधी तुमचे सोने करून जाईल, हे तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून मिळालेल्या प्रत्येक संधीला शंभर टक्के न्याय द्या. नोकरी करत असताना किंवा शिक्षण घेत असताना संधीकडे लक्ष असू द्या.

शब्दांकन- विद्या राणे-शराफ
(लेखक प्रसिद्ध गायक आहेत.)

Web Title: There is a need for employment and education in the field of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.