कष्टाविना फळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 11:35 PM2017-04-07T23:35:45+5:302017-04-07T23:35:45+5:30

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते.

There is no tropical fruit | कष्टाविना फळ नाही

कष्टाविना फळ नाही

Next

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते. पण अगदी खेड्यापाड्यातील लोकांना आवडेल असे लोकसाहित्य त्यांनी सहजपणे व विपुल लिहिल्याचे दिसते. डफगाणी, देवीच्या भक्तांना प्रिय अशी लयबद्ध कवनेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या एका डफ गाण्यात अवघडराव, अभिमानराव, धीरराव असे अवघे रावच राव आहेत तर दुसऱ्या डफगाण्यात क, ख, जपासून सुरू होणाऱ्या गावांची नावे आहेत. एका ओवीत सात-आठ गावे सांगता सांगता ६० ओव्यातून चारपाचशे गावांची नावे त्यांनी दिली आहेत.
रामदासस्वामी हे समाजजीवनाशी जोडले गेलेले इहवादी संत होते. प्रपंचाचे व्यर्थपण अधोरेखित न करता ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग पाहावे परमार्थ विवेका’ हे परखड विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. समर्थांनी मारोती उपासना आणि रामभक्तीतून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा लोकात जागवली. लोकमान्य टिळकांनी कदाचित यातूनच प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवातून एका कालसापेक्ष चैतन्य समाजाला दिले असावे असे वाटते.
बारा वर्षे तप केल्यावर त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी आणि सोरटी सोमनाथ ते कामरूप असे भारतभ्रमण केले. देशभर होणारी लुटालूट, नापिकी, घरेदारे जाळणे, गुरे पळवणे, गावांचा विध्वंस, बायकांचे अपहरण सारे त्यांनी पाहिले. नि:सत्त्व जनता, प्रतिकारशून्य मृतवत् समुदाय पाहिला. अस्मानी-सुल्तानी आणि परचक्र निरूपण ही दोन प्रकरणे त्याकाळची सामाजिक परिस्थिती चितारणारी आहेत.
अकरा महिन्यांच्या काशी मुक्कामात मुक्त झालेल्या आपल्या देशाचे जे स्वप्न त्यांनी पाहिले ते आनंदभुवन किंवा श्रीवनभुवनी या काव्यात त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. ‘समर्थ साधक’ या नावाने रामदासांविषयी महत्त्वाची माहिती देताना समर्थांचा प्रभावी हजरजबाबीपणा लेखकाने व्यक्त केला आहे. ते सांगतात की, समर्थ सज्जनगडावरून चाफळास निघाले असता मार्गात पाली येथील खंडोबा यात्रेत त्यांनी शाहिरांचे सवालजवाब ऐकले.
जिंकल्यामुळे गर्वाने फुगलेल्या शाहिराला त्यांनी प्रश्न टाकला - ‘किती पृथ्वीचे वजन? किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टाक? किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी सखया। संख्या सांग।। अशी मर्यादांची जाणीव देत निरुत्तर करणारा, नशिबाला दोष देणाऱ्यांना ‘कष्टाविण फळ नाही’, अचूक यत्न करायला हवेत हे सांगणारा मार्गदर्शक मोलाचा असतो. संत रामदास हे असेच मार्गदर्शन करणारे संत होते. त्यांनी प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनाही उपदेश करण्यात मागे-पुढे पाहिले
नाही.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

Web Title: There is no tropical fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.