येथे अपराधालाही पक्ष आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:14 AM2018-05-08T00:14:12+5:302018-05-08T00:14:12+5:30

गुन्ह्याला जात नसते, बलात्काराला धर्म नसतो आणि खुनाला क्षमा नसते हे इतिहासाने आपल्याला शिकविले आहे. वर्तमानाची शिकवण मात्र गुन्हा जातिवंत, बलात्कार धर्मसंमत आणि खून क्षम्य असल्याचे सांगणारी आहे. त्यातही हे अपराध समूहाने केले असतील तर ते राजमान्य आणि यथाकाळ न्यायसंमतही होणारे आहेत.

There is a party to the crime ...! | येथे अपराधालाही पक्ष आहे...!

येथे अपराधालाही पक्ष आहे...!

Next

- सुरेश द्वादशीवार, (संपादक, नागपूर)

गुन्ह्याला जात नसते, बलात्काराला धर्म नसतो आणि खुनाला क्षमा नसते हे इतिहासाने आपल्याला शिकविले आहे. वर्तमानाची शिकवण मात्र गुन्हा जातिवंत, बलात्कार धर्मसंमत आणि खून क्षम्य असल्याचे सांगणारी आहे. त्यातही हे अपराध समूहाने केले असतील तर ते राजमान्य आणि यथाकाळ न्यायसंमतही होणारे आहेत. ओरिसात १२०० चर्चेस आणि गुजरातमध्ये ६०० मशिदी जाळणारे आता धर्ममान्य आणि राजमान्यही आहेत. शिवाय त्या धार्मिक अपराधाचा आता या देशाला विसरही पडला आहे. १९८४ मध्ये दिल्लीत शिखांचे हत्याकांड करणारे शिष्टसंमत तर गुजरातमध्ये २००२ साली मुसलमानांच्या कत्तली करणारे पूर्वी धर्ममान्य व आता राजमान्यही आहेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे व त्यानंतर देशात उसळलेल्या धार्मिक दंगलींना जबाबदार असणारे गुन्हेगार तर राष्ट्रीय मानांकित व धर्मपुरुष म्हणूनच गौरविले जाणारे आहेत. या गौरवांकित पुढाऱ्यांच्या राजकारणाने देशात ११००हून अधिक लोकांचे जीव घेतले आहेत.
मालेगाव, समझोता एक्स्प्रेस, हैदराबाद, बेंगळुरु आणि राजस्थानात हिंसाचार घडविणारे साधू आहेत आणि त्यात साध्व्याही आहेत. संशयाचा लाभ मिळून त्या साºया अपराधातून न्यायालयांनी मोकळे केलेले काहीजण आता लष्करसंमत अधिकारीही आहेत. गुन्हा व अपराध आता महत्त्वाचा उरला नाही. तो करणाºयांची जात, त्याचा पक्ष, त्याचे सत्तेत असणे वा त्याची संघटना सत्तेसोबत असणे या बाबीच आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्या साध्य असतील तर देशातली पोलीस यंत्रणा सोडा, न्यायालयेही त्यांना हात लावीत नाहीत. माध्यमे त्यांच्याविषयी लिहायलाही भितात आणि प्रकाशवाहिनी त्यांचे अपराध अंधारात ठेवण्यातच शहाणपण मानतात. याउलट अपराधी अल्पसंख्य असेल, जातीने कनिष्ठ असेल, त्याचा पक्ष सत्तेत नसेल किंवा तो कोणत्याही पक्षाचा नसेल तर मात्र तो निश्चितच शिक्षेला पात्र ठरेल. दिल्लीतले अपराधी मोकळे आहेत, बाबरीचे गुन्हेगार स्वतंत्र आहेत, गुजरातचे हत्याकारी सत्तेत आहेत आणि मालेगाव ते हैदराबादपर्यंत हिंसाचार माजविणारे संशयावरून वा तपासातील त्रुटींमुळे सुखरूप राहिले आहेत. बकरीचे मांस घरात बाळगणारे मारहाण व जाळपोळ करून मारले जातात. मेलेल्या गार्इंची कातडी सोलणारी तरुण मुले दोरखंडांनी बांधून भररस्त्यात व पोलिसांच्या डोळ्यादेखत मरेस्तोवर मार खातात, उलट इंदिरा गांधींची हत्या करणारे पंजाबातील आरोपी धर्माचे सरोपे देऊन गौरविले जातात आणि देश तोडायला निघालेले खलिस्तानी त्या प्रदेशात धर्मपुरुष म्हणून सन्मान्य ठरतात.
एक बाब आणखीही आहे. ज्यांच्यावर अपराध लादला जातो त्या स्त्रिया वा अल्पवयीन मुली असतील आणि अपराध करणारे सत्ताधारी वा त्यांचे अनुयायी असतील तर त्यांच्या मागे केवळ राजकीयच नाही तर वकिलांच्या कायदेशीर संघटनाही उभ्या राहतात आणि त्या त्यांच्यासाठी रस्त्यावर येतात. राजकारणी अपराध्याच्या मुक्ततेसाठी त्याच्या अनुयायांनी याआधी मोर्चे काढलेले देशाने पाहिले आहेत. मात्र बलात्काºयांच्यासाठी वकिलांनी तसे मोर्चे काढण्याची जम्मूमधील घटना अभूतपूर्व व कायद्याला कलंक फासणारी म्हणावी अशी आहे. गेल्या काही वर्षात अशा गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले व निर्दोष म्हणून सोडले गेलेले अपराधी नुसते डोळ्यासमोर आणले तरी या विवेचनातले वास्तव लक्षात यावे असे आहे.
हैदराबादच्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली हे खरे. पण त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण हे कधी कुणाला, अगदी पोलिसांनाही कळले नाही. दादरी कांडाचे गुन्हेगार सरकारला अजून सापडत नाहीत. जम्मूमधील कठुआ जिल्ह्यात आठ वर्षे वयाच्या मुलीवर एका मंदिरात अनेक दिवस बलात्कार करून तिला ठार मारले जाते आणि तिच्या बाजूने उभे होणाºया वकील महिलेला बलात्कारापासून खुनापर्यंतच्या धमक्या दिल्या जातात. पोलिसांनी यातील संशयित पुढाºयांना हात लावताच जम्मूचे वकील त्यांच्या बाजूने न्यायालयावर बहिष्कार घालतात आणि त्या वकील महिलेच्या निषेधाचे मोर्चे काढतात. या घटनेचा देशात फार गवगवा झाला म्हणून जम्मू व काश्मीरच्या सरकारातील भाजपाचे मंत्री राजीनामे देतात. त्यांच्या रिकाम्या जागेवर आलेले भाजपाचे उपमुख्यमंत्री मात्र ‘कठुआची घटना फारशी गंभीरपणे घेण्याजोगी नाही’ असे म्हणून मोकळे होतात. एका निर्भयाने देशात भूकंप घडविला. एक भवरीदेवी देश पेटवू शकली. स्त्रीची अब्रू आणि दैवतावरची श्रद्धा याच समाजाच्या मर्मस्थानावर अधिपत्य गाजविणाºया बाबी आहेत हे या सुसंस्कृतांच्या पक्षातील पुढाºयांना कधी कळेल की नाही? वास्तविक अपराध ही व्यक्तिगत बाब आहे. मात्र तिच्या मागे जेव्हा जात, धर्म व पक्ष उभे होतात तेव्हा ती व्यक्तिगत न राहता सामूहिक व राजकीयही होत असते.
मुलींनी मुकाट राहायचे, दलितांनी गप्प बसायचे आणि अल्पसंख्याकांनी भिऊन जगायचे असा हा धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची शेखी मिरविणाºया आपल्या देशाचा चेहरा आहे. एखाद दुसºया मुलीवर बलात्कार झाला म्हणून एवढे संतापायचे कारण काय हे काश्मिरातील एका भाजपच्या मंत्र्याचे यावरचे म्हणणे तर आजवर दलितांवर अन्याय होत नव्हते काय असे दुसºया एका नेत्याचे सांगणे. अल्पसंख्याक तर काय, ते उपरेच आहेत आणि त्यांचे वास्तव्यही राजकारण्यांना धर्मसंमत न वाटणारे आहे. कायदा, सरकार, न्यायालये आणि घटना यातल्या कशावरही कारवाई करीत नाहीत आणि जे कारवाईची मागणी करतात ‘ते काय विरोधकच आहेत’ असे म्हणून हिणविले जाणारे आहेत. मुली असुरक्षित, स्त्रिया धास्तावलेल्या, दलित संतप्त पण मर्यादेत असलेले आणि अल्पसंख्य भयग्रस्त असणारे. आपल्या लोकशाहीतले हे वास्तव कशाचे द्योतक आहे? आपल्या धार्मिकतेचे, समाजशीलतेचे, घटनात्मकतेचे, कायदेशीर व्यवस्थेचे की देशात ‘अच्छे दिन’ आल्याचे?
इतिहास हे शिकवीत नाहीत. धर्म हे सांगत नाहीत. या देशात झालेले संत महात्मे असे म्हणाले नाहीत. स्वातंत्र्य लढ्याची ती शिकवण नाही. या समाजाचाही हा संस्कार नाही. मग ही भयकारी स्थिती का आली, ती कुणी आणि कधी आणली? वणद्वेष, धर्मद्वेष आणि अतिरेकी राष्ट्रवाद यांनी आता साºया जगालाच ग्रासले आहे. मध्यपूर्व युद्धग्रस्त, दक्षिण-मध्य आशिया निर्वासितांच्या अभूतपूर्व संकटाने ग्रासलेला, म्यानमार आणि बांगला देश रोहिंग्यांच्या छळ व पुनर्वसनाच्या सावटात, अमेरिकेचे सरकार अस्थिर, युरोप व इंग्लंडात बेबनाव तर रशिया व चीन हुकूमशाहीच्या टाचेखाली. भारताभोवतीची ही स्थिती आपल्या वर्तमानाला काही शिकविणारी आहे की नाही. समाज म्हणून आम्ही एक नाही. धर्म म्हणून आमच्यात वैरे आहेत आणि आता जातींमध्ये परस्परांविषयीचा अविश्वास जागलेला. त्यातून आताचे राजकारण हा तणाव वाढविणारे आणि त्यामुळे तापणाºया तव्यावर आपल्या राजकीय विजयाच्या पोळ्या भाजून घेणारे. अशा स्थितीत जे सर्वत्र घडते ते येथेही घडू शकेल की नाही? की ते येथे आताही घडतच आहे?

Web Title: There is a party to the crime ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.