संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:21 AM2023-10-20T11:21:24+5:302023-10-20T11:21:46+5:30

विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून निर्माण झालेले भय काळ पुढे जाईल तसे ओसरेल आणि पुन्हा एकदा माणसाला चांगले कसे जगता येईल यासाठीची धडपड सुरू होईल. 

There will be conflicts, wars; But there will be peace in the world again... | संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल...

संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल...

-एम. आर. लालू, मुक्त पत्रकार

भडकलेल्या युद्धांनी जगभरातील आनंदाचे क्षण झाकून टाकले आहेत. मग ते युक्रेन असो किंवा इस्रायल. युद्धांचे वेगवेगळ्या कारणांनी समर्थन होते तसाच धिक्कारही होतो. या विषयावर हतबल सुरात चर्चा होतात, राग व्यक्त होतो, कानउघाडणी केली जाते, दया दाखवली जाते, सहानुभाव व्यक्त होतो. काहीही झाले तरी युद्धाची भाषा थांबत नाही हा त्यातला सर्वात भयंकर भाग आहे. 

जेव्हा आकाशातून अग्निबाण बरसतात, जिवंत राहण्याची आशा मावळत चाललेल्यांच्या करुण किंकाळ्या भग्नावशेषांच्या ढिगाऱ्याखालून येत राहतात. रस्त्यांवर रक्तामांसाचा चिखल होतो आणि मृतदेहांची मोजदाद करावी, असेही कोणाला वाटत नाही. निराधार कुटुंबे आणि पोरकी झालेली मुले सीमा ओलांडून हजारोंच्या संख्येने आश्रयासाठी रांगा लावतात. युद्धभूमीवरचे आणि शेजारच्या देशांमधले चित्र कमालीचे बदलते. त्याचे दूरगामी परिणाम होणार असतात. चुकूनमाकून दिसणारी प्रगतीची हिरवळ चिरडली जाऊन तिचे वाळवंट होते आणि युद्धखोर जिंकण्यासाठी जी किंमत मोजतात तिला अंत राहत नाही. 

जागतिक युद्धापासून छोट्या- मोठ्या युद्धापर्यंत शत्रुत्व हे मानवी मनातच उपजलेले आहे. शेजाऱ्यापासून धोका असल्याचे भय त्याच्या मुळाशी आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेला या भयाने ग्रासले आहे. ती दूर करण्यासाठी करता येतील, असे उपाय निष्प्रभ ठरले आहेत. वेगवेगळ्या विचारप्रणालींनी भरलेले धार्मिक तत्त्वज्ञान श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असते. नवे प्रदेश पादाक्रांत करत सुटते. जिंकलेल्या भूप्रदेशावरील शहाणपण मारून टाकते. जेथे सर्व एकसारखे दिसेल, सर्वांची प्रार्थना, सगळ्यांचे पोशाख एक असतील, सर्वजण एकच घोषणा देतील आणि एकाच धार्मिक स्थळात जातील, असे जग या मंडळींना निर्माण करावयाचे आहे. वैविध्य हे पाखंड ठरवले गेले याकडे इतिहास लक्ष वेधतो आहे.    

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये उद्भवलेला संघर्ष मानवी क्रौर्य कसे दिसते याचा नमुना होय. हजारो निरपराध लोक मृत्युमुखी पडत आहेत. मुले आणि स्त्रिया दहशतवाद्यांकडून ओलीस ठेवल्या जात आहेत; त्यांना ठार करण्याच्या धमक्या मिळत आहेत. मर्यादीत अशा भूमीवर भय आणि विलाप यानी आसमंत भरून गेला आहे. कित्येकांना घरेदारे सोडून परागंदा व्हावे लागले. इस्रायली आणि पॅलेस्टीनी यांच्या पदरात पडले ते फक्त कधीही न संपणारे दु:ख.    

हमासने इस्रायलवर अकस्मात हल्ला केला. त्यांच्या दुस्साहसामुळे दोन्ही बाजूला भयंकर जीवित आणि वित्तहानी झाली. खऱ्या अर्थाने आपण या पृथ्वीतलावर सुखासमाधानाने जगण्याची शेवटची संधी घालवून बसलो आहोत काय? या पृथ्वीतलावरचा कुशाग्र बुद्धीचा माणूस भीती आणि वेदनांनी भरलेले आयुष्य किती काळ जगणार आहे? इस्रायलच्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या सीमा मूठभर हमास अतिरेक्यांनी कशा ओलांडल्या याचा अभ्यास आता सखोलपणे केला जाईल; पण गोष्टी तेथे थांबणार नाहीत. जेथे युद्ध होते तेथे अनेक पिढ्यांच्या मनीमानसी वैरभाव ठाण मांडून बसतो. भय, सर्व काही गमावणे, बेघर होणे आणि त्याचबरोबर शौर्याच्या कथा ऐकता ऐकता पिढ्या माेठ्या होतात आणि बदला घेण्याची संधी मिळण्याची वाट पाहत राहतात. म्हणजे जग पुन्हापुन्हा रक्ताने न्हाऊन निघणार.  

आज जरी अनेकांमध्ये धुमसते वैरभाव रोखून धरले गेले असले तरी कुठे ना कुठे त्याचा स्फोट होतोच. नि:संशयपणे विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून निर्माण झालेले भय काळ पुढे जाईल तसे ओसरेल आणि पुन्हा एकदा माणसाला चांगले कसे जगता येईल, यासाठी धडपड करू लागेल.
गोष्टी स्वाभाविक दिसू लागतील आणि जीवनाचा प्रवाह पुन्हा एकदा पुढे वाहू लागेल; परंतु, मानवी इतिहासाच्या पानांमधून पुन्हा एक प्रश्न समोर येईल की, आपण आपले हे जग निरामय, समतोल कधी करू शकू? मानवतेला खडबडून जागे करण्याची वेळ आता आली आहे. वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेतील मूल्यानुसार संघर्षविरहित सहजीवन सगळीकडे फुलवता येईल. आपल्याला एक सुखी आणि स्वस्थ जग मिळाले पाहिजे की नाही?
    mrlalu30@gmail.com

Web Title: There will be conflicts, wars; But there will be peace in the world again...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.