ही माणसे आपली नाहीत
By गजानन जानभोर | Published: August 1, 2017 12:41 AM2017-08-01T00:41:10+5:302017-08-01T00:41:39+5:30
दलित, शोषित समाजातील मुलांचा पाटी आणि पोळीचा संघर्ष संपावा, यासाठी ही वसतिगृहे सुरु करण्यात आलीत. पण ती होरपळ अजून संपलेली नाही, उलट दिवसेंदिवस ती अधिक भयावह होत आहे.
दलित, शोषित समाजातील मुलांचा पाटी आणि पोळीचा संघर्ष संपावा, यासाठी ही वसतिगृहे सुरु करण्यात आलीत. पण ती होरपळ अजून संपलेली नाही, उलट दिवसेंदिवस ती अधिक भयावह होत आहे.
अशोक पवार यांच्या ‘बिराड’ या आत्मकथनातील एक आठवण. लहानगा अशोक शाळेत जातो. गणवेश नसल्याने शिक्षक त्याला हाकलून लावतात. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत मग गणवेश तरी कुठून आणणार? गणवेशाच्या धाकाने अशोक शाळेत जात नाही. एके दिवशी तो पाटी फोडतो अन् शाळा कायमची सुटते. भूक मात्र पिच्छा सोडत नाही. तो गावात परत येतो, मजुरीला जाऊ लागतो. भुकेल्यापोटी अंगमेहनतीची कामे? कशी झेपणार? तो अंथरुणाला खिळतो. शाळेसारखीच मजुरीही कायमची बुडते. दोन-तीन दिवसांपासून चूल पेटलेली नाही, पोटात अन्नाचा कण नाही. भुकेचा आगडोंब उसळलेला...अशोकला दारात कुत्रा दिसतो. त्याच्या तोंडात भाकर. भूक त्याला ओढत नेते, अशोक कुत्र्याशी झटापट करतो, तोंडातील भाकर हिसकावतो आणि पोटभर खातो... आजही गावकुसाबाहेर भूकेने व्याकूळ असे असंख्य अशोक आहेत. फक्त त्यांच्या कहाण्या आपल्या कानावर येत नाहीत. काल्पनिक कथांनी व्यथित होणाºया सुखवस्तू माणसांना अशा खºया कहाण्या नकोशा वाटतात. राज्यकर्ते नावाची प्रस्थापित जमातही ते कटू वास्तव स्वीकारीत नाही. ते दिसू नये, कायमचे अंधारात राहावे यासाठी मग या सरकारी व्यवस्थेतील भालदार-चोपदारांचा आटापिटा सुरू होतो. विदर्भातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांतील दयनीय अवस्था हे त्याचेच निदर्शक. दलित, शोषित समाजातील मुलांचा पाटी आणि पोळीचा संघर्ष संपावा, यासाठी ही वसतिगृहे सुरू करण्यात आलीत. पण ती होरपळ अजून संपलेली नाही, उलट दिवसेंदिवस अधिक भयावह होत आहे.
या वसतिगृहातील मुलांना पुरेसे जेवण मिळत नाही, झोपायला जागा नाही, प्यायला पाणी नाही, खोल्यांना गळती लागलेली... कुणी चुकून तक्रार केली तर ‘फुकटात मिळत आहे, खाऊन घ्या’ असे माजोरडे उत्तर मिळते आणि मेस बंद होते. जीएसटीचे नाव सांगून आता या मुलांच्या ताटातील अन्नही कमी करण्यात आले आहे. नागपुरात एकूण २६ वसतिगृहे, त्यापैकी १७ भाड्याच्या घरांत. एकूण क्षमतेच्या केवळ ६० टक्केच मुलांना या वसतीगृहांत प्रवेश दिला जातो. उर्वरित ४० टक्के विद्यार्थी निराश होऊन गावाला परत जातात. त्यातील काही मजुरीवर जातात, काही बापासोबत शेतात राबतात. पुढे आत्महत्या करतात...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय मुलींचे चार वसतिगृहे सुरू करण्यात आलीत खरी पण वर्ष होऊनही इथे सोयी, सुविधांचा दुष्काळ आहे. सामाजिक न्याय विभागाचे काही अधिकारी या मुलांसाठी प्रामाणिकपणे धडपडतात, पण मंत्रालयात बसलेल्यांना पैसे खायचे असतात. सरकार या मुलांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते, मग या सोयी त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? पाटी-पोळीसाठी जीव मेटाकुटीस आलेले ‘बिराड’मधील अशोक इथे पावलोपावली जसे दिसतात तसेच त्यांच्या तोंडातील भाकर हिसकावणाºया भक्षकांच्या झुंडीही जागोजागी ठाण मांडून असतात. सुदैव म्हणा की दुर्दैव या खात्याचे मंत्री राजकुमार बडोले याच अभावग्रस्त समाजातून आलेले. या खात्याचे उच्चपदस्थ अधिकारीही याच वसतिगृहांत शिकलेले. पण या मुलांच्या यातना थांबाव्यात असे कुणालाही वाटत नाही. मंत्री महोदय बडोले नागपुरातच राहतात. पण एखाद्या वसतिगृहात जाऊन मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे त्यांना कधी वाटत नाही. ठेकेदारांना मात्र ते आवर्जून भेटतात आणि काळ्या यादीतल्यांना पायघड्याही घालतात.
नागपूर ही क्रांतिभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांच्या मनात स्फुल्लींग चेतविले, ते याच दीक्षाभूमीत. भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुखांचीही हीच कर्मभूमी. पण या मुलांची अवस्था बघून कुणीही आंबेडकरी-बहुजन विचारवंत पेटून उठत नाही. सामाजिक क्रांतीची दिशा बदलली की प्राधान्यक्रम? शोषित-वंचितांमधील काही माणसे सुखवस्तू झालीत की ती प्रस्थापित होतात. मानसन्मानांनी सुखावतात आणि पुरस्कारांनी तृप्तही होतात. विद्रोहाचा हुंकार जागवला की, प्रस्थापितांच्या नजरेत आपण जातीयवादी ठरू, कळपातून बाहेर फेकले जाऊ ही भीती त्यांना असते. त्यामुळे स्वाभाविकच वंचनेशी ते कृतघ्न होतात. काल परवापर्यंत पेटून उठणारे हे क्रांतिवंत आता गेले कुठे? सामाजिक न्यायाचा घोष करणारे राजकुमार बडोले सुद्धा सत्तेचे मांडलिक झाले. ही माणसे आता आपली नाहीत, हा या वसतिगृहांतील मुलांच्या मनातील अव्यक्त आक्रोश आहे. दलित-बहुजन चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांमध्येही तो तसाच खदखदत आहे.