‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 08:10 AM2023-12-20T08:10:25+5:302023-12-20T08:12:52+5:30

तरुणांच्या निषेधाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम चांगला होत नाही. संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे, हे विसरता कामा नये.  

'They' are neither terrorists nor Bhagat Singh! Parliament security breach views | ‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग!

‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग!

- योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया सदस्य, जय किसान आंदोलन

१३ डिसेंबरला काही तरुणांनी लोकसभा सभागृहात उडी मारून विरोध प्रदर्शित केला, ही नि:संशयपणे एक गंभीर घटना आहे. अशा घटनांकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे, त्यांची चौकशी गंभीरपणे केली पाहिजे आणि त्यावर गांभीर्याने चिंतन, मननही केले पाहिजे; परंतु ही घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तिचे रूपांतर एखाद्या रहस्यपूर्ण गुन्ह्याचा तपास गुप्तहेर करतात तशा घटनेत करून टाकले. काय घडले? आणि कसे घडले? यामध्ये सर्वांना स्वारस्य आहे; परंतु का झाले याची सखोल चौकशी करायला आपण तयार नाही. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा आपल्या कमकुवतपणावर पडदा टाकू इच्छितात. विरोधी पक्ष या निमित्ताने सरकारला घेरू पाहतो आहे. गंभीर चिंतन आणि मनन करण्याची कोणाचीही इच्छा नाही. 

शेवटी लोकसभेत उडी मारणारे तरुण कोण आहेत? त्यांना कोणते मुद्दे मांडायचे होते? असे हे धोकादायक पाऊल त्यांनी का उचलले? लोकशाहीमध्ये आपला आवाज उठवण्यासाठी उपलब्ध इतर मार्गांवर त्यांचा विश्वास का नव्हता? जोवर आपण या प्रश्नांना सामोरे जात नाही, तोवर भले आपण संसद भवन सुरक्षित करू, मात्र देशाचे भविष्य सुरक्षित करू शकणार नाही.

आतापर्यंत पोलिसांनी या घटनेत सामील असलेल्या सर्व सहा तरुणांना अटक केली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे; त्यांच्यातला कोणीही सराईत गुन्हेगार, गुंड नाही. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेले सामान्य, निम्न मध्यम वर्गातले अस्वस्थ असे ते तरुण आहेत. त्यांच्या अस्वस्थतेत  सामाजिक आणि राजकीय संदर्भांसह काही व्यक्तिगत निराशेचाही भाग आहे. कोणाच्याही बाबतीत याआधी कुठल्याही गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळालेली नाही. त्यांचा हेतू संसदेमध्ये घुसून हिंसा करण्याचा किंवा मालमत्तेचे नुकसान करण्याचा नव्हता, हेही स्पष्ट आहे. त्यांना ते करणे शक्य होते. जर ते लपून धुराची नळकांडी घेऊन गेले तर ते इतर घातक शस्त्रेही घेऊन जाऊ शकत होते; परंतु त्यांनी तसे केलेले नाही. लोकसभेमध्ये घुसून त्यांनी कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यांनी स्वतः मार खाल्ला; पण कोणालाही प्रत्युत्तरादाखल मारलेले नाही. काही असो, ते दहशत पसरवू इच्छित नव्हते. त्यांना दहशतवादी संबोधता येणार नाही.

संसदेत किंवा संसदेच्या बाहेर आपल्याला पकडण्यात आल्यानंतर आपली काय गत होईल याची कल्पना त्यांना नसेल इतके हे तरुण नादान दिसत नाहीत. आपल्याला यातनांना सामोरे जावे लागेल; आपल्या घरच्यांना त्रास होईल. दीर्घकाळ तुरुंगात खितपत पडावे लागेल. त्यापेक्षाही जास्त शिक्षा होऊ शकेल; हे सगळे त्यांना ठाऊक होते. सागर शर्मा याच्या डायरीमध्ये लिहिलेल्या ओळींवरून ते काय विचार करत होते याचा अंदाज करता येतो. तो म्हणतो, ‘संघर्षाच्या रस्त्यावर उतरणे माझ्यासाठी सोपे नव्हते. प्रत्येक क्षणाला उमेद बाळगून मी ५ वर्षे वाट पाहिली की असा एक दिवस येईल, ज्या दिवशी मी माझ्या कर्तव्याच्या दिशेने पुढे जाईल. हिसकावयाचे कसे हे जाणतो तो जगामधला बलवान माणूस नसतो. सुखांचा त्याग करण्याची क्षमता ज्याच्यात असते तो बलशाली माणूस असतो.’ गुंड किंवा देशद्रोह यांची ही भाषा असू शकत नाही.
अर्थात एवढ्यावर त्यांना भगतसिंग किंवा बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत उभे करता येणार नाही. सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकून आणि पत्रके वाटून भगतसिंग शहीद हुतात्म्यांचा शिरोमणी झाला नव्हता. त्याआधी तो क्रांतिकार्यात गुंतलेला होता. फाशीच्या तख्तावर जाण्यापर्यंतचा त्याग बलिदान आणि संकल्प त्याच्याकडे होता. या तरुणांच्या बाबतीत हेच म्हणता येणार नाही. 

परंतु एवढे नक्की म्हणता येऊ शकेल की त्यांचे कृत्य हे गुन्हेगारी स्वरूपाचे, दहशतवादी श्रेणीतले नव्हे, तर राजकीय विरोधाच्या पातळीवरचे ठरवता येईल. त्यांचा मार्ग आपल्याला पटला नसेल. संसदेत उडी मारून तिथले कामकाज बंद पाडण्याचे महिमामंडन करता येणार नाही; परंतु आपली इतकी जबाबदारी नक्की आहे की आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.


त्यांना काही सांगायचे आहे यात काही शंका नाही. बेरोजगारीच्या प्रश्नावर ते देशाचे लक्ष वेधून घेऊ इच्छितात हे स्पष्ट आहे. बेरोजगारी हे केवळ त्यांच्यासारख्या लोकांची किंवा मूठभर लोकांची समस्या नाही हेही खरे. आज देशातील तरुणाच्या समोर उभे असलेले ते सर्वात मोठे संकट आहे. देशाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह  टाकणारे संकट आहे. त्याशिवाय त्यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. महिला पहिलवानांच्या बाबतीत जो दुर्व्यवहार झाला त्याचा संदर्भ दिला आणि हुकूमशाहीच्या विरोधात घोषणा दिल्या.

देशात हुकूमशाही गुपचूप अशा प्रकारे पाय पसरून बसली आहे की त्यांच्या प्रश्नांना सामान्य लोकशाही पद्धतीच्या मार्गांनी व्यक्त करण्याची संधी उरलेली नाही, असे त्यांना वाटले, हे स्पष्टच होय. प्रसारमाध्यमातून आपले म्हणणे मांडावे किंवा लोकशाही पद्धतीने धरणे धरून, निदर्शने करून आपला आवाज उठवावा यात काही अर्थ नाही असेही त्यांना वाटले असेल. त्यांना असे वाटणे हे चुकीचे असू शकेल; परंतु जर आदर्शवादी विचार करू शकणाऱ्या निडर तरुणांचा एक छोटासा गट जर असा विचार करत असेल तर संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे. अशा आवाजाकडे कानाडोळा करण्याचा परिणाम चांगला होत नाही याची साक्ष इतिहास देतोच आहे.

Web Title: 'They' are neither terrorists nor Bhagat Singh! Parliament security breach views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.