ते आले, त्यांनी पाहिले; पण..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:26 AM2017-10-18T00:26:18+5:302017-10-18T00:26:35+5:30
स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात लेख लिहून देशभर मोहोळ उठविलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांचा अकोला दौरा रविवारी पार पडला.
स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात लेख लिहून देशभर मोहोळ उठविलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांचा अकोला दौरा रविवारी पार पडला. ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’ या विषयांवरील व्याख्यानासाठी म्हणून सिन्हा यांनी अकोल्यात पायधूळ झाडली. या व्याख्यानाच्या आयोजकांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचेच असंतुष्ट खासदार नाना पटोले यांचाही कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला लाभलेला प्रतिसाद बघून आयोजकांचा हुरूप वाढला आणि त्यांनी थेट यशवंत सिन्हा यांनाच आमंत्रित केले. सिन्हा यांनीही त्यांना नाराज केले नाही. सिन्हांसारखे नाव आणि व्याख्यानाचा विषय यामुळे अकोलेकरांच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या होत्या. देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती कशी आहे, याविषयी देशाचे अर्थमंत्रिपद भूषविलेल्या तज्ज्ञ व्यक्तीचे निदान ऐकता येईल आणि त्या आधारे आपले मत बनविता येईल, हा अकोलेकरांचा दृष्टिकोन होता. विशेषत: निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) या खूप चर्चा झालेल्या विषयांवर वस्तुनिष्ठ असे काही तरी ऐकण्यासाठी अकोलेकर उत्सुक होते. त्यातच व्याख्यानाच्या शीर्षकात या तीनही गोष्टींची सांगड शेतीशी घालण्यात आल्यामुळे शेतकरीही सिन्हांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक होते. परिणामी, व्याख्यान ऐकण्यासाठी एवढी गर्दी झाली, की अनेकांना सभागृहाबाहेरून व्याख्यान ऐकावे लागले. स्वत: सिन्हाही उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भारावून गेले होते. कार्यक्रमाचे आयोजन खुल्या मैदानात केले असते तर बरे झाले असते, असेही ते ओघात बोलून गेले. दुर्दैवाने व्याख्यानास प्रारंभ होताना जो उत्साह श्रोत्यांमध्ये दिसला, तो व्याख्यान संपेपर्यंत बव्हंशी ओसरला होता. व्याख्यानाला गर्दी करणारे श्रोते सर्वसाधारणत: दोन प्रकारचे असतात. काही श्रोत्यांना विषयासंदर्भात आपल्याकडे नसलेली काही तरी नवी माहिती मिळेल, नवे पैलू ज्ञात होतील, ज्ञानात भर पडेल, अशी अपेक्षा असते. दुसºया प्रकारच्या श्रोत्यांना, त्यांना जे हवे ते फटकेबाजीच्या स्वरुपात ऐकायला मिळेल, अशी आशा असते. दुर्दैवाने सिन्हा यांनी दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांची निराशा केली. ना पहिल्या प्रकारच्या श्रोत्यांना काही नवी माहिती मिळाली, ना दुसºया प्रकारच्या श्रोत्यांना नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपाच्या विरोधातील आतषबाजीचा आनंद लुटता आला. सिन्हा यांची शालीनता, सुसंस्कृतपणा दुसºया गटातील श्रोत्यांच्या अपेक्षेच्या आड आला. त्यामुळे सिन्हा यांच्या अकोला दौºयाचा सार एवढाच, की ते आले, त्यांनी पाहिले; पण त्यांनी निराश केले!