त्यांना शेतकऱ्यांएवढाच गांधीही समजत नाही

By admin | Published: June 13, 2017 05:17 AM2017-06-13T05:17:52+5:302017-06-13T05:17:52+5:30

२०१४ मध्ये केंद्राची सत्ता हस्तगत करेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह व त्यांचे पक्षाचे अन्य पुढारी काँग्रेस सरकारच्या प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करीत होते.

They do not even think of Gandhis as much as farmers | त्यांना शेतकऱ्यांएवढाच गांधीही समजत नाही

त्यांना शेतकऱ्यांएवढाच गांधीही समजत नाही

Next

२०१४ मध्ये केंद्राची सत्ता हस्तगत करेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह व त्यांचे पक्षाचे अन्य पुढारी काँग्रेस सरकारच्या प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करीत होते. त्याच्या चुकांचे राजकारण तर त्यांनी केलेच; पण त्या सरकारच्या चांगल्या निर्णयांचे विकृतीकरण करून त्याचेही त्यांनी राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्वीही झाल्या. त्यावेळी ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले’ इथपासून ‘काँग्रेसने शेतीचे स्मशान केले’ इथपर्यंतची मुक्ताफळे त्यांनी उधळली. आता त्यांचे राज्य असताना मात्र ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे राजकारण तुम्ही करू नका’ किंवा ‘ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना राजकीय वळण देऊ नका’ यासारखे उपदेश हे शाह आणि त्यांचे वेंकय्या हे मंत्री काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एखाद्या संताचा आव आणून करीत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन जोरात आहे आणि मध्य प्रदेशात त्यातले पाच शेतकरी पोलिसांच्या गोळ्यांना बळीही पडले आहेत. शेतकऱ्यांना त्यांची फसवणूक समजते आणि ती करणारेही कळतात. या स्थितीत ‘आम्ही जे केले ते तुम्ही करू नका’, असा उपदेश शाह आणि वेंकय्या इतर पक्षांना करीत असतील तर त्यातले दुटप्पीपण व ढोंग उघड आहे. शेतकऱ्यांचे आताचे आंदोलन कोणताही पक्ष चालवीत नाही. कोणत्याही प्रस्थापित पुढाऱ्याला शेतकऱ्यांनी सोबत घेतले नाही. सारेच पक्ष व पुढारी आपली फसवणूक करतात हे समजलेला हा जाणकारांचा वर्ग आता आपली आयुधे घेऊन स्वत:च सडकेवर आला आहे. राजकारणावाचून व पक्षांना दूर सारून उभे होत असलेले हे स्वतंत्र भारतातील जनतेचे पहिले व मोठे आंदोलन आहे. त्यासाठी सरकारनेच आत्मपरीक्षण करीत त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधकांना उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मैदानात उपोषणाचे नाटक मांडून या गंभीर आंदोलनाला विनोदी बनविण्याचेही कारण नाही. खरे तर पाच शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या या मुख्यमंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामाच द्यायचा. परंतु तसे प्रायश्चित्त न घेता ‘जिन्स घालून आंदोलन करतात ते शेतकरी कसे’, असे भाजपाच्या एका मूर्ख मंत्र्याने म्हणून त्याचे स्वत:च राजकारण करणे सुरू केले आहे. देशातील शेतकऱ्यांनी नेहमी फाटकी धोतरे व फाटकेच अंगरखे घालून रस्त्यावर यायचे असते काय आणि त्यांच्या आंदोलक मुलांनीही त्यांच्या बापांचेच ते फाटके अनुकरण करायचे काय हे त्या मंत्र्याने सांगितले नाही. अरे, मंत्री जर पोशाख बदलतात आणि धोतर कुडत्यातून सफारीवर वा मोदी जॅकेट््सवर येतात तर तसे आंदोलकांनी केले तर त्यात वावगे काय? प्रश्न, ‘आम्ही केले ते बरोबर, तुम्ही करता ती चूक’ या वेंकय्याच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विसंगत भूमिकेचा आहे. उत्तर नसले की प्रश्न उपस्थित करायचे आणि समर्थन नसले की आरोप सुरू करायचे ही राजकारणाची जुनी तऱ्हा आहे. वेंकय्या आणि शाह नेमकी तीच उपयोगात आणत आहेत. त्यातल्या अमित शाह यांनी तर याच घटकेला गांधीजींना ते ‘चतुर बनिया’ राहिल्याचे उन्मादी प्रशस्तिपत्रही दिले आहे. काँग्रेस आणि भाजपा यातील फरक सांगताना ‘कॉँग्रेस हा पक्षच नाही, तसा तो कधीच नव्हता, काँग्रेस नावाचे कडबोळे तो गांधी नावाचा बनिया एकत्र राखत होता’ असे त्या ज्ञानी पक्षाध्यक्षाचे म्हणणे आहे. त्याच वेळी ‘भाजपा हा धोरण असलेला, कार्यक्रमाधिष्ठित पक्ष आहे व तो शिस्तबद्धही आहे’ असे त्या शहाण्या नेत्याचे निरीक्षण आहे. गांधीजींना प्रशस्तिपत्र देण्याची लायकी या शाहमध्ये अजून यायची आहे हेही येथे नोंदविणे आवश्यक आहे. कधी गाय, कधी गंगा, कधी राम तर कधी अयोध्या अशा प्रश्नांवर धर्माची अहंता
वाढविणे हा कार्यक्रम आणि तेच राजकीय धोरण असेल तर मात्र शाहांचे म्हणणे अचूक ठरेल. गांधींनी असल्या गोष्टींचा आधार घेतला नाही. दुहीचे राजकारण केले नाही. ईश्वर-अल्ला तेरो नाम म्हणणारा तो राष्ट्रीय ऐक्याचा पुरस्कर्ता होता. त्याच त्याच्या थोरवीसाठी सारे जग त्याच्यापुढे नम्र झाले होते. तो चतुर वा लबाड असता तर आपल्या भूमिकेसाठी त्याने आपल्या छातीवर हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या माथेफिरूच्या तीन गोळ्या झेलल्या नसत्या व देशाच्या एकात्मतेसाठी देह ठेवला नसता. ही बनियाची मानसिकता नव्हे, बनियेगिरी काहीतरी मिळविण्यासाठी केली जाते. प्राण मोजण्यासाठी पुढे जाणारा इसम बनिया नसतो, तो हुतात्मा असतो. पण हौतात्म्याचे महात्म्य स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी भाग घेतला आणि प्राणार्पण केले त्यांना कळणार. खुनापासून खंडणीखोरीपर्यंतचे आरोप शिरावर असणाऱ्या लबाडांना ते कसे कळेल? सत्ता व
मग्रुरी यांनी भारलेल्या माणसांना गांधींचे हौतात्म्य कळणार नाही आणि शेतकऱ्यांचे मरणही विचलित करणार नाही. विरोधकांवर उपदेशाचे डोस फेकले की आपली जबाबदारी संपली असे जेव्हा सत्ताधीशांना वाटू लागते तेव्हाच त्यांच्या अध:पतनाचीही सुरुवात
होत असते हे त्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. एकारलेली मानसिकता बाळगणारे आणि समाजाच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नांएवढेच गांधींनाही समजून घेऊ शकत नाही हेच अशावेळी साऱ्यांनी लक्षात घ्यायचे असते.

Web Title: They do not even think of Gandhis as much as farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.