ते संकट संपले नाही

By admin | Published: August 4, 2015 11:02 PM2015-08-04T23:02:52+5:302015-08-04T23:02:52+5:30

अल् कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याला २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या लष्करी पथकांनी कंठस्नान घातल्यानंतर आता तालिबान

They have not ended the crisis | ते संकट संपले नाही

ते संकट संपले नाही

Next

अल् कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याला २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या लष्करी पथकांनी कंठस्नान घातल्यानंतर आता तालिबान या तेवढ्याच दहशतखोर संघटनेचा प्रमुख मुल्ला मोहम्मद ओमर मुजाहिद याचा पाकिस्तानातील एका इस्पितळात मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. ओमरच्या तशा बातम्या गेल्या दोन वर्षांपासूनच येत असल्या तरी त्यांना अधिकृत दुजोरा कुणी दिला नव्हता. आता प्रत्यक्ष तालिबान्यांनीच ते वृत्त खरे असल्याचे व ओमरला २०१३ मध्येच मृत्यू आल्याचे जाहीर केले आहे. तथापि, ओसामा वा ओमर यांच्या मृत्यूमुळे इस्लामी दहशतवादाचे उच्चाटन झाले असे समजण्याचे कारण नाही. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरिया (इसिस) या संघटनेसारख्या जहाल उग्रवादी संघटना अजून मध्य आशियात कार्यरत आहेत. दोनच दिवसांपूर्वी इसिसचे हस्तक काश्मीर व भारताच्या काही भागात उत्पात घडवून आणण्याच्या बेतात आहेत असे सूचक वृत्त प्रकाशित झाले. श्रीनगरमध्ये इसिसचे झेंडे घेऊन निघालेल्या मिरवणुका भारताला आता चांगल्या ठाऊक आहेत. ओसामा आणि ओमर या दोघांनाही अमेरिकेच्या हातून मरण आले असले तरी त्यांना बळ देण्याचे कामही अमेरिकेनेच केले आहे. १९७९ मध्ये रशियाने अफगाणिस्तान ताब्यात घेऊन त्यावर नजीबुल्ला या आपल्या हस्तकाला अध्यक्ष नेमले. या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियामार्फत पैसा व लष्करी साहित्य पुरवून जो आतंक उभा केला त्याचे नाव अल् कायदा व त्याचा प्रमुख ओसामा बीन लादेन हा होता. त्या काळात तेच काम छोट्या प्रमाणावर व मदरशांच्या बळावर अफगाणिस्तानात ज्यांनी हाती घेतले त्यातला एक मुल्ला ओमर हा होता. या संघटनांनी प्रथम रशियन फौजांशी दोन हात केले. मात्र ते करीत असतानाच इस्लामच्या कालबाह्य व जुलूमी परंपरा जशाच्या तशा अमलात आणण्याचे व त्यासाठी इस्लामी जनतेत व विशेषत: स्त्रियांमध्ये येऊ घातलेला आधुनिकतावाद अतिशय क्रूरपणे दडपून टाकण्याचे कामही हाती घेतले. सामूहिक कत्तली, स्त्रियांची हत्याकांडे आणि पाश्चात्त्यांची मुंडकी उडवून ती दृश्ये वाहिन्यांवर दाखविणे असे सारेच त्या काळात त्यांनी केले. रशियात गोर्बाचेव्ह सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानातून आपल्या फौजा परत बोलविल्या. परिणामी अमेरिकेचा या प्रदेशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व तिने या अतिरेक्यांना द्यावयाची मदत आखडती घेतली. याच काळात तालिबानांनी अफगाणिस्तानच्या नजीबुल्लाला १९९२ मध्ये जाहीररीत्या फासावर लटकवून त्याचे शव अध्यक्षांच्या राजवाड्यासमोर कित्येक दिवस टांगून ठेवले व अफगाणिस्तानवर आपलीच सत्ता असल्याचे घोषित केले. तालिबान आणि अल् कायदा यांनी या काळात त्या परिसरात जी मानवताविरोधी अघोरी कृत्ये केली त्याविरुद्ध अमेरिकेने पुन्हा एक आघाडी उभारली. परिणामी जुने मित्र नवे वैरी झाले. ९/ ११ चा न्यूयॉर्कवरील अल् कायदाचा ६ हजारांवर लोकांचे बळी घेणारा हल्ला त्यातून उद््भवला. त्याचा बंदोबस्त म्हणून अमेरिकेने केलेल्या कारवाईच्या अखेरीस ओसामा मारला गेला. मात्र मुल्ला ओमर आणि त्याची तालिबान ही संघटना पूर्वीसारखीच राहिली. तिच्या बंदोबस्तासाठी पाकिस्तानने केलेली कारवाईही तोंडदेखलीच राहिली. याच काळात कुठल्याशा चकमकीत ओमरला त्याचा उजवा डोळा गमावावा लागला. मात्र त्याची संघटनेवरची पकड आणि संघटनेची दहशत तशीच राहिली. काबूलजवळच्या बामियन बुद्धाच्या मूर्ती तोफा डागून उडवून लावण्याचे त्याचे दहशती कृत्यही याच काळातले आहे. आता ओमरच्या मृत्यूची बातमी आली आहे. त्याचबरोबर त्याची जागा मुल्ला अख्तर मोहम्मद मंसूरने घेतली असल्याचेही जाहीर झाले आहे. मात्र त्याच्या मृत्यूमुळे इस्लामी दहशतवाद संपुष्टात येईल अशी स्थिती नाही. मध्य आशियापासून अफगाणिस्तान व पाकिस्तानपर्यंत चालणाऱ्या त्याच्या कारवाया भारताला येऊन भिडल्या आहेत. खरे तर इस्लामी दहशतवादाचा धोका अमेरिका व रशियाएवढाच चीनलाही आहे. ती राष्ट्रे त्याबाबत सतर्कही आहेत. पण या दहशतवादाचे मूळ मध्य आशियात आहे आणि आपल्या सीमा पार करून तिथवर जाण्याची तयारी यापैकी एकाही देशाची नाही. परिणामी सीमेवर बंदोबस्त झाला तरी मूळ स्थानी त्याचे बळ वाढतच आहे. अमेरिकेने त्यावर हवाई हल्ले केले तरी पूर्वीच्या व्हिएतनाम व नंतरच्या मध्य आशियातील गुंत्यामुळे त्याही देशाची या हल्ल्यांबाबतची भूमिका मर्यादितच राहिली आहे. मात्र तालिबान्यांना किंवा इसिसला भारतापर्यंत चालून यायचे तर त्यांना पाकिस्तान ओलांडून यावे लागते. त्या स्थितीत त्यांच्याकडून पाकिस्तानच्या व्यवस्थेलाही धोका उद््भवणार आहे. शिवाय पाकिस्तानचे लष्कर आता तालिबान्यांशी लढण्यात गुंतलेही आहे. या प्रकाराला एक दुसरीही बाजू आहे. धर्मांना देशासारख्या सीमा नसतात. तशा त्या धर्मवेडालाही नसतात. केरळ आणि कर्नाटकातील काही बहकलेले तरुण इसिसमध्ये सामील व्हायला गेले होते हे वृत्त साऱ्यांच्या स्मरणात असेल व ते यातला धोका सांगायला पुरेसे आहे. धार्मिक कट्टरवादापासून सावध राहणे हेच या स्थितीत महत्त्वाचे ठरते.

Web Title: They have not ended the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.