त्यांना ‘हे’ कळायला हवे

By admin | Published: November 29, 2015 03:40 AM2015-11-29T03:40:20+5:302015-11-29T03:40:20+5:30

एड्सला प्रतिबंध करण्यासाठी खरी गरज आहे ती लैंगिक शिक्षणाची. ‘एचआयव्ही’चा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता, या रोगाबाबत असलेले गैरसमज याची माहिती नव्या पिढीला व्हावी,

They have to understand this | त्यांना ‘हे’ कळायला हवे

त्यांना ‘हे’ कळायला हवे

Next

- विलास देशपांडे

एड्सला प्रतिबंध करण्यासाठी खरी गरज आहे ती लैंगिक शिक्षणाची. ‘एचआयव्ही’चा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता, या रोगाबाबत असलेले गैरसमज याची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी १ डिसेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त
हा विशेष लेख.

टी.व्ही.वर मॅनकार्इंडची संतती प्रतिबंधची जाहिरात लागली आणि टी.व्ही. पाहतानाच सर्वांच्याच नजरा इतरत्र फिरल्या. उगीचच काहीतरी विषय काढून साऱ्यांचेच मन वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न मोठी माणसं करीत होती. मात्र मुलं ती जाहिरात मन लावून पाहत होती. मोठ्या माणसांपैकी कुणीतरी उगीचच ओरडून मुलांना बाहेर जा खेळायला असा लटका आदेश दिला; परंतु मुलांनी त्याकडे दुर्लक्ष करून टी.व्ही. पाहणे सुरूच ठेवले.
कार्यक्रम संपला, मुलं उठून गेली आणि मग बायकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. ‘आजकाल टी.व्ही.वर काय दाखवावं आणि काय दाखवू नये यावर धरबंदच राहिलेला नाही. प्रत्येक जाहिरातीत उघड्या नागड्या बायका कशाला दाखवतात हेच कळत नाही.’ एक वयस्कर काकू म्हणाली, ‘जाहिरातकाम करणाऱ्या बायकांना काहीच कसं वाटत नाही? पैशासाठी कुठल्या थराला जातील काहीच सांगता येत नाही.’
दुसऱ्या वहिनी म्हणाल्या, ‘अहो, हे काहीच नाही. माझी एक मैत्रीण सांगत होती, त्या मोबाइलवर स्त्री-पुरुषांच्या नको त्या गोष्टी दाखवत असतात आणि पोरे-पोरी डोळे फाडून फाडून बघत असतात. रात्र नाही, दिवस नाही.. तो मोबाइल सतत डोळ्यांसमोर असतो. अशानं पोरं बिघडली, मुलींवर अत्याचार झाले तर कुणाला दोष देणार? प्रगतीच्या नावावर सगळा सावळा गोंधळ चालू आहे.
मंडळी वरील प्रसंग हा एका घरातील असला तरी अनेक प्रसंग घरोघरी घडताना दिसतात. काळ बदलला पण काळाप्रमाणे आमची मनं आणि मतं बदलली. मी असं यासाठी म्हणतो की, किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षण दिलं तर मुलं बिघडतील, मुला-मुलींमधील लैंगिक संबंधामधून एचआयव्ही/एड्ससारख्या घातक आजाराची तसेच लिंग सांसर्गिक आजाराची भीती मोठ्या प्रमाणात वाढली असताना आपण भावी युवकांना म्हणजेच किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिकतेविषयी शास्त्रीय माहितीपासून वंचित ठेवणं म्हणजे त्यांना या आजाराच्या खाईत लोटण्यासारखं आहे. पालकांचे
गैरसमज
लैंगिक शिक्षण म्हणजे स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाची सखोल माहिती, त्याविषयीची चित्रे, व्हिडीओ मुलांना दाखविले तर मुले त्या क्रिया सहज अनुसरतील अशी एक भीती पालकांना आहे. हा विषय शिकविणारे शिक्षक याचा गैरफायदा घेऊन मुलींना त्रास देतील अशी ही भीती पालकांना वाटते.
अशा पालकांना मला सांगावंसं वाटतं की, शाळेमध्ये मुलांना शरीरशास्त्र शिकवलं जातं, यामध्ये शरीराच्या अवयवांचं महत्त्व, त्याची निगा इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. मात्र हे शिकविताना लैंंगिक अवयवाविषयी फार तोकडी माहिती दिली जाते. प्रजनन क्रिया अशी असते याबाबत फार मोकळेपणानं बोललं जात नाही. साहजिकच मुलांची उत्सुकता ताणली जाते. मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु याबाबत त्यांना उघड बोलता येत नाही. मुलांनी चुकून काही प्रश्न विचारला तर पालक गप्प बसायला सांगतात; किंवा काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देतात. बऱ्याच वेळा ही माहिती अशास्त्रीय असू शकते. मुलांना उत्तेजित करणारी असू शकते किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करणारीदेखील असू शकते. साहजिकच अशा माहितीमुळे मुलं अयोग्य मार्गाला लागतात. आत्मविश्वास गमावतात, शिक्षणात अपयशी झाल्यास काही वेळा टोकाचादेखील विचार करतात. हे टाळायचं असेल तर किशोरवयीन मुला-मुलींना शास्त्रीय पद्धतीनं माहिती देणं गरजेचं आहे.

लैंगिक शिक्षण म्हणजे नेमकं काय?
यामध्ये मानवी प्रजोत्पादन प्रक्रियेची माहिती, स्त्री-पुरुष अवयवांची रचना, त्यांचे कार्य, लैंगिक आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत तपशीलवार माहिती देण्यात येते. आंघोळीच्या वेळी लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे, मासिक पाळीच्या वेळी मुलींनी स्वच्छतेची अधिक काळजी घेणे, किशोर अवस्थेमध्ये मुला-मुलींमध्ये जे बदल घडून येतात.
त्याबदल गोेंधळून न जाता मानसिक स्वास्थ टिकविणे, मुला-मुलींमधील निकोप संबंध वाढीस लावणे, लैंगिक आकर्षणापासून दूर राहणे, इंटरनेट, मोबाइल, टी.व्ही., फेसबुक यांचा वापर करताना त्यातील संभाव्य धोके कोणते, ते कसे टाळावेत याची माहिती देणे, लैंगिक संबंधाच्या धोक्यांची आणि त्यापासून होणाऱ्या आजारांची मुला-मुलींना माहिती देणे आणि त्यांच्या मनातील भीती, गैरसमज शंका दूर करणे हा लैंगिक शिक्षणाचा उद्देश आहे. या शिक्षणामुळे मुलांना मैत्री, प्रेम आणि लैंगिक आकर्षण यातील फरक समजला पाहिजे.
वरील सर्व बाबींचा विचार केला असता लैंगिक शिक्षणाचा विरोध किती अनाठायी आहे याचीही कल्पना येईल. आजकाल टी.व्ही., वृत्तपत्रे, यावरील बातम्यांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या बातम्या ठळकपणे दिल्या जातात. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी चित्रपट, इंटरनेट, टी.व्ही.वरील जाहिराती, विविध अश्लील साईट्स यांना किती जबाबदार धरायचं हा स्वतंत्र विषय आहे.
परंतु अत्याचारांची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. गुन्हे दाखल होणे, न्यायालयासमोर सुनावणी होणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे या अव्याहतपणे चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. परंतु अन्याय रोखायचे असतील तर मानसिकता बदलणे, किशोरवयीन मुले-मुली, युवक यांना लैंगिकतेविषयी चांगल्या-वाईटाची माहिती देऊन मानसिकरीत्या समर्थ करणे, हे आव्हान पेलण्यासाठी किशोरवयीन मुला-मुलींना तज्ज्ञ जाणकारांमार्फत शास्त्रीय पद्धतीचे लैंगिक शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे.

(लेखक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबईचे सहसंचालक आहेत.)

Web Title: They have to understand this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.