यांना निर्बुद्धीकरण हवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 03:14 AM2018-07-30T03:14:29+5:302018-07-30T03:14:38+5:30
‘मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धिवाद्यांना गोळ्या घालून ठारच केले असते’ असे तेजस्वी उद्गार कर्नाटक विधानसभेतील भाजपा आमदार बसवनगौडा यांनी काढले आहेत. समाजात श्रद्धा व बुद्धी यांच्यात चालत आलेला वाद ऐतिहासिक आहे.
‘मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धिवाद्यांना गोळ्या घालून ठारच केले असते’ असे तेजस्वी उद्गार कर्नाटक विधानसभेतील भाजपा आमदार बसवनगौडा यांनी काढले आहेत. समाजात श्रद्धा व बुद्धी यांच्यात चालत आलेला वाद ऐतिहासिक आहे. श्रद्धा समाजाला स्थितीवादी बनविते व तसे राखण्याचा प्रयत्न करते. तर बुद्धी विचारांना चालना देऊन समाजाला नवे व उद्याचे मार्ग दाखविते. जगभरातील प्रतिगामी व पुरोगामी प्रवाहांमधील हा संघर्ष जुना आहे. मात्र त्याचवेळी ते प्रवाह परस्परांना पुरकही राहिले आहेत. समाजाने एक पुरोगामी पाऊल पुढे टाकायचे आणि श्रद्धेने त्याभोवती संरक्षक कवच उभे करायचे अशीच आजवरची समाजाची प्रगतीशाली वाटचाल झाली आहे. मात्र ज्यांना पुढचे पाऊल नको, प्रगती नको आणि नवा विचार नको त्यांना या बुद्धीचे व बुद्धिवाद्यांचे भय वाटते. त्याचमुळे जगाचा इतिहास संशोधकांच्या, तत्त्वज्ञांच्या, संत-महात्म्यांच्या व पुरोगाम्यांच्या छळाने वा त्यांना प्रतिगाम्यांनी ठार मारण्याच्या घटनांनी भरला आहे. या छळातून पाश्चात्त्यांएवढेच पौर्वात्य पुरोगामीही बचावले नाहीत. सॉक्रेटिस, आॅरिस्टॉटल व गॅलिलिओ यांच्यासारखे तत्त्ववेत्ते आणि संशोधक यांचे जसे बळी आहेत तसे आपल्याकडील संत-महात्मे आणि ज्योतिबांपासून गांधीजींपर्यंतचे सगळे नवा विचार मांडणारेही त्यांचे बळी ठरले आहे. पुरोगाम्यांना व नव्या विचाराच्या आधुनिकांना मारण्याची ही दुष्ट तºहा अजूनही संपली नाही. दाभोलकर व पानसरे या मराठी आणि कलबुर्गी व गौरी लंकेश या कानडी विचारवंतांचे खून त्याचसाठी केले गेले आहेत. श्रद्धेला तर्क खपत नाही. मग ती श्रद्धा देवावरची असो, धर्मावरची, नाही तर पक्ष वा पुढाऱ्यावरची. ‘मोदींना मत न देणाºयांनी पाकिस्तानात चालते व्हावे’ अशी भाषा त्याचमुळे याआधी उत्तर प्रदेशात बोलली गेली. बसवनगौंडांची बुद्धिवाद्यांना गोळ्या घालण्याची भाषा याच परंपरेशी जुळणारी आहे हेच लक्षात येणारे आहे. नशीब एवढेच की बसवनगौडा आता गृहमंत्री नाहीत. नाहीतर यापुढे देशातील एकही विचारवंत वा बुद्धिवादी माणूस जिवंत राहिला नसता. हा इसम एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्र्याच्या पदावर होता. वाजपेयींसोबत राहूनही ज्याला साधे शहाणपण वा अक्कल आली नाही त्याचा मेंदू जगातला कोणताही तज्ज्ञ दुरुस्त करू शकणार नाही. आपल्या अशा बोलण्याने आजवर ज्या बुद्धिवाद्यांच्या हत्या कर्नाटक व महाराष्टÑात झाल्या त्या करणाºयांचे आपण पाठीराखे ठरतो एवढेही या माणसाला कळत नसेल तर त्याला तिकीट देऊन आमदार, खासदार व मंत्री करणाºया पक्षाच्याच बुुद्धीची आपण कीव केली पाहिजे. मात्र ज्यांच्या राजकारणाला खून, तुडवून मारण्याचे प्रकार व हिंसाचार याविषयीची फारशी तमा नाही, त्यांच्याकडून तशा तारतम्याची अपेक्षाही नाही. संत तुकाराम आणि मंबाजी एकाचवेळी जगात आले. त्याआधी ज्ञानेश्वर, आणि त्यांना जातीची सर्टिफिकिटे मागणारी माणसेही अशीच जगात आली. ज्योतिबांचा छळ करणारे, आगरकरांच्या प्रेतयात्रा काढणारे आणि गांधीजींना गोळ्या घालणारे हे जसे सारेच गुन्हेगार त्या महात्म्यांचे समकालीनच होते. त्यामुळे बुद्धिवादी व श्रद्धा किंवा अंधश्रद्धावादी माणसांच्या, गतिशीलांच्या व स्थितीशीलांच्या परंपरा एकाचवेळी येथे चालत आल्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते लक्षात घेताना आपण कोणत्या परंपरेची कास धरायची याचाही निर्णय आपण घेतला पाहिजे. समाजातल्या अंधश्रद्धा त्याला पुढे जाऊ देत नाहीत. त्याला पूर्वीच्याच अंधाºया खातेºयात ठेवण्याचा त्या प्रयत्न करतात. बसवनगौडा, त्यांचे तिकिटदाते व त्यांना संरक्षण देणारे कोण तेही अशावेळी लक्षात घ्यायचे असते. त्याचवेळी आपण व आपल्या पुढल्या पिढ्यांनी या खातेºयात रहायचे की पुढे जायचे हेही ठरवायचे असते. बसवनगौडासारखी माणसे बुद्धीची वैरी आणि देशाचीही शत्रू असतात. अशा माणसांचे पुढारी होणे हीच आता संपविण्याजोगी बाब झाली आहे.