ते काहीही शिकणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:27 AM2018-06-01T05:27:27+5:302018-06-01T05:27:27+5:30
कालच्या पोटनिवडणूक निकालांनी भाजपाला काहीही शिकविले नाही. तसे शिकविण्याची क्षमता त्या निकालात नाही आणि काही शिकण्याची क्षमता भाजपामध्येही नाही
कालच्या पोटनिवडणूक निकालांनी भाजपाला काहीही शिकविले नाही. तसे शिकविण्याची क्षमता त्या निकालात नाही आणि काही शिकण्याची क्षमता भाजपामध्येही नाही. ज्या धर्मांधतेचे राजकारण त्या पक्षाने आरंभापासूनच नव्हे तर त्याच्या जनसंघावतारापासून केले ते त्याने कधी सोडले नाही. शिवाय त्याच एकारलेपणाने आपल्याला केंद्रात सत्तेवर आणले हा त्याचा भ्रम दृढ आहे. वाजपेयींनी पंतप्रधानपद तीनवेळा जिंकले ते त्यांच्यातील धर्मांधतेने नव्हे. ते त्यांच्या उदारमतवादी भूमिकेने त्यांना मिळवून दिले. मात्र मोदी सत्तेवर आले तेच मुळी एकारलेपण घेऊन. त्यांचे अनुयायी कार्यकर्ते व प्रवक्ते हेही सारे त्यांचीच बतावणी पेहरून तेच एकारलेपण गेली चार वर्षे वावरताना दिसले. संन्याशांना, योग्यांना आणि धार्मिक कट्टरवाद्यांना मुख्यमंत्रिपद वा पक्षातही अन्य पदे त्याचमुळे भाजपाने दिली. ती देताना हा देश एकारलेला नाही, तो मध्यममार्गी आहे, तो जातीयता व धर्मांधता याकडे एखादेवेळ संतापाने जाईल. पण ती त्याची खरी प्रवृत्ती नव्हे हे वास्तवच त्या पक्षाने कधी लक्षात घेतले नाही. त्याच्या इतिहासात लोकोपयोगी भूमिकांहून गंगाजल विक्री, राम मंदिराच्या विटांची विक्री, धर्मांधांना साथ आणि धर्मद्वेषाला बढती हे व असेच सारे विषय होते. अल्पसंख्यांकांचा द्वेष हा तर त्यांच्या मूलाचरणाचा भाग होता. कैराना या उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राजद या पक्षाने एका मुस्लिम महिलेला तिकीट दिले तेव्हा भाजपाने ते तिकीट जिनांचे असल्याचा अपप्रचार केला. त्यास उत्तर देताना राजदने येथे जिन्ना चालत नसून गन्ना चालतो असे तडाखेबंद उत्तर दिले व भाजपाचा पराभवही केला. उत्तर प्रदेशात आजवर झालेल्या सगळ्याच पोटनिवडणुका त्यांच्या योगी मुख्यमंत्र्याने गमावल्या. खरे तर त्यातल्या त्याच्या संन्यासत्वाची आठवण करून देऊन पक्षाने त्याला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या त्याच्या गोरखपूर आश्रमातच पाठवायचे. पण योगी जपावे लागतात. त्यांचे संबंध एकीकडे थेट अंधश्रद्धा व दुसरीकडे जुन्या परंपरागत मानसिकतेशी असतात आणि कर्मठ मानसिकतेवर असून देश थांबला असण्याचा भाजपाला विश्वास आहे. देशात १५ जागी झालेल्या पोटनिवडणुकांपैकी १३ जागा भाजपाने गमावल्या. त्यांचे मित्रही सर्वत्र हरले. मात्र त्यांच्या प्रवक्त्यांची मुजोरी तशीच राहिली. मोदींच्या सरकारने घोषणाबाजी फार केली. धर्मद्वेष टोकाचा केला. एकारलेपण कमालीचे केले आणि सत्तालोलूपता दाखविताना कोणताही पर्याय आपण सोडणार नसल्याचे दाखविले. शिवाय, सोनिया गांधी व राहुल यांच्यावर अपप्रचाराचा मारा केला. हे ढोंग जनतेला कळत नाही हा भ्रम फक्त एकारलेल्यांनाच जोपासता येतो. तो दूर व्हायला पोटनिवडणुकीतील पराजय पुरेसा नसतो. त्यासाठी मोठ्या व राष्टÑीय पातळीवरील पराभवांचीच गरज असते. देशाचे राजकारण पुन: पूर्वस्थितीवर व सुस्थितीवर आणण्याची अशी संधी पुढल्या वर्षी मतदारांच्या हाती येत आहे. तिचा वापर ते योग्य तोच करतील ही अपेक्षाही आहे.