विरोधक आहेत की नाही ते दिसेल..!
By अतुल कुलकर्णी | Published: July 24, 2017 12:08 AM2017-07-24T00:08:51+5:302017-07-25T13:38:41+5:30
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष राज्यात शिल्लक आहे की नाही हे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात जनतेला दिसेल.
- अतुल कुलकर्णी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात होईल. राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली आणि संख्येने कमी असलेल्या विरोधकांचा उरलासुरला जोरही अधिवेशनाआधीच संपला. आता विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला अडचणीत आणण्याचे नियोजन करायला हवे. शस्त्र पारजून तयार ठेवायला हवीत. पण यातले काहीही न करता सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे आपापसातच भांडण सुरू आहे. राज्य विधिमंडळात नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणताना माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा ठराव आधी आणायचा की राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा? यावरून हे दोन पक्ष लहान मुलांसारखे भांडत आहेत.
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी एक म्हण आहे. ती या वादावादीवर चपखल लागू होते. इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव काँग्रेसने आधीच दिलेला होता. मग राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवून हा विषय संपवला असता तर सरकारला अडचणीत आणणारे अन्य विषय चर्चेला घेता आले असते. पण तुमचा ठराव मागे घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही असे सांगत राष्ट्रवादीने स्वत:च्या नेत्यालाच छोटे करून टाकले आहे. समोर युद्धाचा प्रसंग असताना तू माझी तलवार घेतलीस, मी तुझी ढाल देणार नाही... म्हणून भांडणं करण्याचा हा प्रकार जेवढा बालिश तेवढाच चिंतेचाही आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व कोणाचे हे स्पष्ट नाही, कोणाकडे पाहून पक्षात काम करावे असा चेहरा नाही. त्यामुळे या पक्षात आपल्याला काही भवितव्य आहे की नाही हा प्रश्न आमदारांना भेडसावत असताना त्यांना विश्वास देण्याचे काम कोणी करताना दिसत नाही.
दुसरीकडे, राष्ट्रवादीत पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यभर नियोजनबद्ध रीतीने दौरे सुरूकेले आहेत. त्यांना साथ देण्याचे काम विरोधी पक्ष नेते म्हणून धनंजय मुंडे अत्यंत ताकदीने करत आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी छगन भुजबळ विधानभवनात आले. त्या घटनेने सगळी राष्ट्रवादी एकवटली. त्यांनी जो अनुभव त्यावेळी घेतला आणि त्यांचे चेहरे जे काही सांगत होते ते पाहिल्यानंतर तर हा पक्ष आता पेटून उठेल असे वाटत होते पण तसे काहीही झालेले दिसत नाही. उलट राष्ट्रवादीचे नेते काँग्रेससोबत फुटकळ विषयावर भांडत आहेत. इंदिरा गांधी आज असत्या तर नको तो ठराव असे म्हणाल्या असत्या. शरद पवारही काही वेगळे बोलतील असे नाही, आपल्याच नेत्यांची प्रतिष्ठा आपणच पणाला लावतोय याचेही भान कोणाला उरलेले नाही.
भाजपा-शिवसेना सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक विषय असताना त्यांचा जाब काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारला विचारणार आहे की नाही? स्वच्छ भारत मोहिमेचा गाजावाजा झाला, दोन्ही काँग्रेसने यात काही केले नाही पण किती भाजपा आमदार, खासदारांची शहरं स्वच्छ झाली? त्याचे फोटो काढून आणून विधिमंडळात दाखवावे असे विरोधकांना वाटत नाही का? मोदींचा आदेश कचऱ्यात गेला का? असे विचारण्याची हिंमत दोन्ही काँग्रेसमध्ये आहे की नाही? ‘घर तेथे शौचालय’ म्हणून जाहिराती आल्या, पण भाजपा आमदार खासदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात किती शौचालये बांधली हे कोणी विचारणार की नाही? मुंबईत कोणीही उघड्यावर शौचाला बसत नाही म्हणून मुंबई पालिकेचा गौरव झाला तो किती खोटा आहे हे शिवसेनेला दाखवून देण्याची हिंमत भाजपात आहे पण ती दोन्ही काँग्रेसमध्ये उरली आहे का? आदिवासी विभागात चालू असलेल्या बेलगाम खरेदीवर सवाल करण्याएवढा अभ्यास विरोधकांनी केला की नाही? गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ‘मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याप्रमाणे मंजुरी देण्यात येत आहे’ असे फाईलवर लिहितात आणि त्यावर टीका झाली की त्या निर्णयाला स्थगिती दिली जाते, हा विषय विरोधकांना महत्त्वाचा वाटतो की नाही? शेतकऱ्यांची तूरदाळ व्यापाऱ्यांंनी हमीभावापेक्षा कमी दराने विकत घेतली आणि तीच डाळ नाफेड आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पुन्हा हमीभावाने विकून स्वत:चे उखळ पांढरे करुन घेणाऱ्या लॉबीवर विरोधक बोलणार की नाही? विरोधक जिवंत असल्याचे पुरावे आजपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिसतील की नाही याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.