तिसऱ्या पर्यायाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:52 AM2018-04-12T00:52:33+5:302018-04-12T00:52:33+5:30
काँग्रेस व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांनी शेतक-यांचा भ्रमनिरास केल्याचा आरोप करीत, आता पुन्हा एकदा तिस-या पर्यायासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा पर्याय कितपत सक्षम ठरेल, हे काळच ठरविणार आहे.
-राजेश शेगोकार
काँग्रेस व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांनी शेतक-यांचा भ्रमनिरास केल्याचा आरोप करीत, आता पुन्हा एकदा तिस-या पर्यायासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा पर्याय कितपत सक्षम ठरेल, हे काळच ठरविणार आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निराश केल्याने, जनतेने २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पारडयात सत्तेच दान टाकले. नवे सरकार नवी धोरणे राबवून सामान्यांना दिलासा देईल अन् शेतकºयांमध्ये उमेद निर्माण करेल, अशी आशा बाळगलेल्या जनतेची निराशाच झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस अन् भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बळीराजाच्या मुलांनी एकत्र येऊन नवा राजकीय पर्याय निर्माण करावा, असा निर्णय नागपुरात लोकजागर अभियानातर्फे आयोजित शेतकरी नेते, विचारवंत, बुद्धिजीवी यांच्या सभेत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सुमारे शंभरएक नेते, चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले होते. लोकजागरचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर हे या बैठकीचे निमंत्रक होते.
शेतकरी नेते अमर हबीब, राम नेवले, प्रा. शरद पाटील, प्रा. श्रीकांत तराळ, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे, ललित बहाळे, गजानन अमदाबादकर आदींचा सहभाग असलेल्या किसान फ्रंटच्या माध्यमातून या नव्या पर्यायासाठी किमान समान कार्यक्रम ठरवावा, अशी सूचना या बैठकीमध्ये समोर आली. सोबतच लोकजागरच्या माध्यमातून नवा पर्याय देण्याचा हेतूने ‘शंभर युवा महाराष्ट्र नवा’ हा संकल्प मांडत येत्या विधानसभा निवडणुकीत शंभर युवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्धार करण्यात आला. दुसरीकडे राज्यातील ४० शेतकरी संघटनांचा समावेश असलेल्या सुकाणू समितीनेही तिसरा पर्याय देण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे प्रमुख रघुनाथ दादा पाटील यांनी सध्या राज्यभर दौरा सुरू केला आहे.
शेतकरी जागर यात्रेच्या निमित्ताने ते तिसºया पर्यायाची जुळवणी अन् पायाभरणीही करत आहेत. त्यासाठीच भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात १० मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो आंदोलन छेडण्याचे रणशिंग त्यांनी फुंकले आहे. या तिसºया पर्यायांना बळ देण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने अराजकीय मंचही स्थापन झाला आहे. भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांच्यासह काँगे्रस-राकाँचे नेते त्यामध्ये सहभागी असले तरी, या मंचची खरी ताकद शेतकरीच आहे. हा मंच १ मे रोजी कोल्हापुरात, तर ७ मे रोजी अकोल्यात आंदोलन छेडणार आहे. तिसºया पर्यायाच्या शोधात वेगवेगळ्या पातळीवर हे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न करणारे एकत्र आले अन् निश्चित असा किमान समान कार्यक्रम ठरवून, त्यांनी संघटितरीत्या सत्ताधाºयांना आव्हान दिले तरच सक्षम तिसरा पर्याय निर्माण होऊ शकेल. निवडणूक लढविणे हे आता सोपे काम राहिलेले नाही. सत्ताधाºयांच्या विरोधातील असंतोष संघटित होऊन, तो एकाच पर्यायाच्या मागे उभा राहिला, तर कदाचित बदल दिसेलही; मात्र तिसरा पर्याय देण्यासाठीच तीन-तीन पर्यायांची स्पर्धा सुरू झाली, तर भविष्यात चळवळीवर विश्वास असणाºयांच्या शेतातही निराशेचेच पीक येईल, याची जाण अन् भान या पर्यायांच्या धुरिणांना येणे आवश्यक आहे.