तिसऱ्या टप्प्यातील ‘दक्षिणायण’

By Admin | Published: August 23, 2016 02:13 PM2016-08-23T14:13:02+5:302016-08-23T14:13:02+5:30

धारवाड. कर्नाटकातील एक सुंदर हिरवे शहर. धारवाडचे नाव घेतले की त्या परिसरातील मल्लिकार्जुन मन्सूर, गंगुबाई हनगल, द. रा. बेंद्रे, जी. ए. कुलकर्णी आणि गिरीश कर्नाड ही नावे आठवतात.

The third phase of 'Dakshinaayan' | तिसऱ्या टप्प्यातील ‘दक्षिणायण’

तिसऱ्या टप्प्यातील ‘दक्षिणायण’

googlenewsNext

- प्रमोद मुनघाटे                                                                                                                                                             धारवाड. कर्नाटकातील एक सुंदर हिरवे शहर. धारवाडचे नाव घेतले की त्या परिसरातील मल्लिकार्जुन मन्सूर, गंगुबाई हनगल, द. रा. बेंद्रे, जी. ए. कुलकर्णी आणि गिरीश कर्नाड ही नावे आठवतात. अलीकडेच भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनीही धारवाडमध्येच आपले घर केले आहे. सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या या शहराच्या प्रतिष्ठेवर गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये एक काळा डाग लागला. कर्नाटकमधील प्रगतीशील लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची व कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या केल्यानंतर कट्टर धर्मांध शक्तीने जणू आपला त्रिकोण पूर्ण केला होता. त्यानंतर या असहिष्णुता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चिरडून टाकणाऱ्या वातावरणाचा निषेध म्हणून देशभरातील लेखक, विचारवंत आणि कलावंतांनी साहित्य अकादमी व राज्य शासनांनी दिलेले पुरस्कार परत केले होते. त्याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले. दादरी प्रकरण व पुण्यातील एफटीआयच्या संचालकपदावरील नेमणूक ही निमित्ते ठरली असली तरी भाजपा सरकारमधील साध्वी-महंत आमदार-खासदारांची उन्मत्त वक्तव्ये आणि त्यासंदर्भात पंतप्रधान मोदींचे मौन यामुळे विवेकनिष्ठ लेखक-कलावंत व पत्रकारांमध्ये असंतोष धुमसत होता. दक्षिणायण : एक चळवळ या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश देवी यांनी शांततेच्या मार्गाने कट्टरतावादाचा निषेध करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असलेल्या विवेकनिष्ठ लेखक कलावंतांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यातून ‘दक्षिणायण’ या चळवळीचा जन्म झाला. धारवाड येथे अलीकडेच ‘दक्षिणायण’च्या देशभरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत दक्षिणायणची पुढील दिशा आणि कार्यक्रम याबरोबरच नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणाऱ्या ‘राष्ट्रीय अभिव्यक्ती परिषदे’च्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. ‘दक्षिणायण’ या संकल्पनेला अनेक भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संदर्भ आहेत. आकाशात जेव्हा काळे ढग दाटून येतात, जेव्हा दिवसापेक्षा रात्र मोठी होत जाते तो काळ ‘दक्षिणायण’ म्हणून ओळखला जातो. आजची दक्षिणायण चळवळ ही साहित्य, कला, चित्रपट व नाटक अशा माध्यमातून भयमुक्त अभिव्यक्ती करण्याची सामूहिक कृती आहे. धर्म-पंथ, जात, वर्ग-वर्ण, भाषा-लिंग यांच्या पलीकडे जाऊन शुद्ध मानवतावादी व नैसर्गिक पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैलीचा अंगीकार करणाऱ्या समविचारी लोकांचे हे आंदोलन आहे. दक्षिणायण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधी नाही किंवा बांधील नाही. कोणत्याही संस्थेचे आर्थिक सहकार्य नाही. सहभागी लेखक व कलावंतांनी स्वत:च्या बळावर उभे केलेले हे आंदोलन आहे. दक्षिणायणचा पहिला टप्पा हा पुणे ते कोल्हापूर ते धारवाड ‘संवाद-यात्रा’ असा होता. गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटकमधील कार्यकर्ते या पहिल्या मोहिमेत सहभागी झाले होते. २४ ते २९ नोव्हेंबर २०१५ दरम्यान पुणे, कोल्हापूर व धारवाड या शहरात लेखक, पत्रकार व कलावंतांच्या सभा झाल्या. पुण्यात हमीद दाभोलकर व कोल्हापुरात मेधा पानसरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट या यात्रेतील सर्वांनी घेतली. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येमागील वास्तवाचा शोध घेणे, त्या संदर्भातील सामाजिक मानस समजून घेणे, पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखक-कलावंतांची भूमिका जाणून घेणे, गुजरात मॉडेलचे खरे वास्तव लोकांपुढे आणणे आणि समविचारी लेखक, कलावंत व शास्त्रज्ञ समकालीन परिस्थितीला कसा आकार देऊ शकतील यावर विचारविनिमय करणे असा या दक्षिणायण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा उद्देश होता. पुणे ते धारवाड या यात्रेच्या अखेरीस गुजरातमध्ये ३० जानेवारी २०१६ रोजी ‘दांडी यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या देशातील बहुसांस्कृतिकता, बहुविधता व एकात्मता यांची रूजवणूक करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी दृढ करण्यासाठी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला एकत्र येण्याचे ठरविले. ‘दक्षिणायण’ चा दुसरा टप्पा : दांडी यात्रा ‘सर्वभाषासंवाद’ या नावाने झालेल्या दांडी यात्रेत अनेक राज्यांतील सुमारे ५०० सामाजिक कार्यकर्ते, कवी, कादंबरीकार, चित्रकार, नाटककार, दिग्दर्शक व कलावंत सहभागी झाले होते. कोणत्याही संस्थेच्या मदतीशिवाय स्वयंस्फूर्तीने देशभरातून लोक एकत्र आले होते. महात्मा गांधींनी ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला होता त्या ठिकाणी प्रार्थना करण्याची परवानगी सरकारने नाकारली होती. नवसारी येथील कृषी विद्यापीठाच्या सभागृहात महात्मा गांधींचे पणतू राजमोहन गांधी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितांची मोठी सभा झाली. अनेकांची अत्यंत भावपूर्ण भाषणे झाली. सर्व वातावरण भारावून गेले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधाबरोबरच देशातील असहिष्णू व हिंसक वातावरणाबद्दल उद्वेग व चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर दांडी येथे प्रार्थनास्थळापर्यंत प्रतीकात्मक यात्रा काढण्यात आली. समोर राजमोहन गांधी, हमीद दाभोलकर, मेधा पानसरे व विजय कलबुर्गी होते. त्यांच्या मागे डॉ. देवी आणि विविध प्रांतांतील लेखक-कलावंत चालत होते. ‘‘वैष्णवजन तो तेणे कहिये’’ अशी गांधींची आवडती भजनं लोक म्हणत होते. एका अत्यंत ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत, या भावनेने सर्वांची अंत:करणे भरून आली होती. त्यानंतर प्रार्थनास्थळी उपस्थित लेखक कलावंतांनी चार सत्रांत आपली अभिव्यक्ती केली. नाटक, चित्रपट व कला क्षेत्रातील आनंद पटवर्धन, अतुल पेठे यांच्यासोबत दिल्ली, गोवा व पंजाबमधील अनेकांनी आपली मते मांडली. वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्राबरोबरच गोवा व कर्नाटकमधील अनेक लेखक-कवींनी सध्याच्या राजकीय वातावरणातील आपली घुसमट व्यक्त केली. दत्ता नायक, प्रभा गणोरकर, दीनानाथ मनोहर, राजन गवस, राजन खान, नीरजा, मीनाक्षी बाली, राजेंद्र पोद्दार, शंकर हलगट्टी व ताजुद्दीन पठाण असे अनेक लेखक याप्रसंगी उपस्थित होते. तिसऱ्या सत्रात गुजरातमधील शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना प्रकट केल्या. डॉ. देवी आणि उत्तम परमार यांच्या भाषणाने समारोप झाला. पण त्यापूर्वी अतुल पेठे यांनी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपले रिंगणनाट्य सादर केले. ‘दक्षिणायण’चा तिसरा टप्पा : गोवा परिषद दरम्यानच्या काळात हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे व दिल्ली विद्यापीठातील कन्हैयाकुमारच्या प्रकरणामुळे देशातील राजकीय व सामाजिक वातावरण अधिकच ढवळून निघाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आणि धार्मिक कट्टरतेची दहशत यामुळे असहिष्णुतेचे प्रकरण आणखी विकोपाला गेले होते. या पार्श्वभूमीवर धारवाडची बैठक महत्त्वाची ठरली. ‘दक्षिणायण’ची पुढील दिशा काय असेल यावर विचारविनिमय करण्यासाठी धारवाड येथे ३० जून व १ जुलैला बैठक झाली. गोवा येथे १८ ते २० नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय दक्षिणायण अभिव्यक्ती परिषदे’चे आयोजन करण्याचे ठरले. यासाठी गोव्याचे दत्ता नायक यांनी पुढाकार घेतला आहे. मडगाव येथील रवींद्र भवन येथे आयोजित या परिषदेला संपूर्ण देशभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. १८ नोव्हेंबरला शहरातून संकल्प यात्रा काढून लोहिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन कले आहे. नंतरच्या दोन दिवसांत ‘भारतीय विद्वान अपयशी झाले आहेत का?’, ‘कला, नाटक व सिनेमाद्वारा भारतीय इतिहास व सामाजिक प्रबोधनाचा नवा दृष्टिकोन’, ‘कला, नाटक व सिनेमामधून सामाजिक प्रबोधन’, ‘स्वातंत्र्याची हमी आणि सद्य:कालीन माध्यमे’ व ‘ भारतीय लोकसाहित्यातील अंधश्रद्धा व लोकमानस’ या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. धारवाडच्या बैठकीत ‘दक्षिणायण’च्या राष्ट्रीय सचिवालयाची जबाबदारी डॉ. गणेश देवी, दत्ता नायक, संदेश भांडारे, शंकर हलगट्टी व कानजी पटेल यांनी स्वीकारली. गुजरातच्या मनिशी जानी आणि उत्तम परमार यांना वर्तमानकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दक्षिणायणचे धोरण ठरविण्याची जबाबदारी दिली गेली. महाराष्ट्र हे एकेकाळी पुरोगामी व विवेकवादी विचारांचे व चळवळींचे केंद्र होते. ती प्रतिमा पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रगतीशील विचारांच्या व्यक्ती, गट आणि संघटनांना परस्पर संवादासाठी एकत्र जोडले पाहिजे. सध्याच्या राजकीय आव्हानांच्या पलीकडे या कार्याचे ध्येय असावे. त्यासाठी महाराष्ट्रात धनाजी गुरव, माधव पळशीकर, प्रमोद मुनघाटे व माधव बावगे यांनी पुढाकार घेऊन एका मोठ्या कृती गटाची स्थापना करावी. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात गती आणण्यासाठी कर्नाटकमधील कार्यकर्त्यांनी कृती कार्यक्रम हाती घ्यावा, वर्तमानकालीन स्थितीत जनजागरण करण्यासाठी समविचारी अन्य गटांचे व चळवळींचे सहकार्य घेऊन सामूहिकरीत्या काम करावे, तसेच गुलबर्गा येथे महिलांच्या प्रश्नावर लवकरच सभा घ्यावी असे ठरले. यासाठी राजेंद्र चेन्नी, के. नीला व बसवराज सुलिभावी यांनी पुढाकार घ्यावा असे ठरवले गेले. चेन्नई येथे आॅगस्टमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे ठरले. त्याचप्रमाणे तेलंगणा व आंध्र प्रदेश येथे दक्षिणायण चळवळीचे कार्य महाराष्ट्र व कर्नाटकातील कार्यकर्त्यांनी तेथील कार्यक्र मात सहभागी व्हावे, असेही ठरले. अशाच प्रकारे अभिव्यक्तीच्या सर्व क्षेत्रांत नव्या सृजनशील प्रयोगांना वाव देणारे व जाती-धर्माच्या नावाखाली सर्व प्रकारच्या शोषणाला विरोध करणारे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन करण्यात आले. थोडक्यात, वर्तमानकाळातील काही धार्मिक व राजकीय शक्तींमुळे सामाजिक सुसंवाद आणि सांस्कृतिक बहुविधता धोक्यात आल्याचे आव्हान स्वीकारून निश्चित कृती करण्यासाठी दक्षिणायण ही चळवळ पुढे सरसावली आहे. ती काळाची गरज आहे. 

Web Title: The third phase of 'Dakshinaayan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.