किसी डिस्को में (ना) जाएँ, किसी हॉटेल में (ना) खाएं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:07 AM2021-12-31T09:07:36+5:302021-12-31T09:08:17+5:30

Thirty-first : थर्टी फर्स्टच्या सायंकाळपासून उत्तररात्रीपर्यंत पार्टीबिर्टी केली नाही, वारुणीचे प्याले रिचवले नाहीत तर पहाटेला कोंबडं आरवणार नाही, अशीच समाजातील नवश्रीमंत, मध्यमवर्गीयांची गेल्या काही वर्षांत धारणा झाली आहे.

Thirty-first : Go (no) to a disco, eat (no) in a hotel ... | किसी डिस्को में (ना) जाएँ, किसी हॉटेल में (ना) खाएं...

किसी डिस्को में (ना) जाएँ, किसी हॉटेल में (ना) खाएं...

googlenewsNext

फार वर्षांपूर्वी नाही अगदी ३५ ते ४० वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जेवायला जाणे मध्यमवर्गीयांना परवडत नव्हते आणि रुचतही नव्हते. एखाद्याचे कुटुंब चार दिवस गावी गेले असेल तर दोन वेळचे अन्न मिळेल इतका शेजारधर्म त्यावेळी शिल्लक होता. नात्यागोत्याची माणसे आजूबाजूलाच असायची. बदली होऊन अनोळखी ठिकाणी गेलेलाच खानावळी, हॉटेलांमध्ये तुकडे मोडत असे. मात्र, आता एखाद्याचा ‘बर्थ डे’ असेल तर शुभेच्छा देणारा लगोलग ‘आज काय प्लॅन?’, असे विचारून घेतो. मग अमुक-तमुक पॉश हॉटेलात कसे सेलिब्रेशन होणार आहे, हे सांगताना त्याचाही ऊर अभिमानाने भरून येतो.

थर्टी फर्स्टच्या सायंकाळपासून उत्तररात्रीपर्यंत पार्टीबिर्टी केली नाही, वारुणीचे प्याले रिचवले नाहीत तर पहाटेला कोंबडं आरवणार नाही, अशीच समाजातील नवश्रीमंत, मध्यमवर्गीयांची गेल्या काही वर्षांत धारणा झाली आहे. समाजातील अतिश्रीमंतांकरिता तर पार्टी हे जसे काही विधिलिखित आहे. गतवर्षी डेल्टाप्लस व्हेरिएंटने अनेकांच्या मनसुब्यांवर विरजण घातले होते. मात्र, राज्यात गेल्या चार-पाच महिन्यांत सर्व सुरळीत सुरू झाल्यामुळे व राज्य सरकारने विदेशी मद्यावरील कर घसघशीत कमी केल्याने यंदा गोवा किंवा अलिबागच्या समुद्रकिनारी नववर्षाचे सेलिब्रेशन करायचे, याचे प्लॅन्स काहींनी बरेच अगोदर पक्के केले होते. काहींनी फार्महाऊस, रिसॉर्ट वगैरेंचे बुकिंग करून टाकले आहे. त्यामुळे साग्रसंगीत तयारी करून आता घराचा उंबरठा ओलांडायचा तर ओमायक्रॉन व्हेरिएंट पाहुणा म्हणून समोर उभा ठाकलाय, अशी बहुतेकांची स्थिती झाली आहे.

निर्बंध शिथिल झाल्यापासून लोक इतके सैलावले आहेत की, जणू कोरोना हा मागच्या शतकात होता व आता त्याची सावली देखील शिल्लक नाही, अशी अनेकांची धारणा झाली आहे. सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग हे आता आतापर्यंत परवलीचे झालेले शब्द विस्मृतीत गेले आहेत. या साऱ्या बेफिकिरीचा परिणाम असा झाला की, आता अवघ्या चोवीस तासांत अनेक शहरांमधील रुग्णसंख्या दुप्पट, तिप्पट होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत ती आणखी झपाट्याने वाढेल, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.  दुसऱ्या लाटेत मृत्यूचे जसे तांडव पाहायला मिळाले तसे ते सुदैवाने अजून सुरू झालेले नाही. मात्र मृत्यूसंख्या वाढली आहे. अमेरिका व युरोपातील देशांत मृत्युदर प्रचंड आहे. त्यामुळे आपल्याकडेही तसे होणारच नाही, असे छातीठोक सांगता येत नाही.

राज्याच्या जवळपास सर्व जिल्ह्यांत कोविड इस्पितळांची सज्जता, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची जुळवाजुळव सुरू झाली. दुसऱ्या लाटेत केवळ ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला. ही तिसरी लाट किती घातक असेल याबाबत तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असली तरी खबरदारी ही घ्यायलाच हवी. कारण, कोरोनाने यापूर्वीच्या लाटेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींबाबत वेगवेगळ्या पद्धतीने ‘न्याय’ केला आहे. अगदी नव्वद वर्षांच्या आजी व्हेंटिलेटरवरून खडखडीत बऱ्या होऊन चालत घरी आल्यात तर चालत इस्पितळात दाखल झालेल्या तरुणाचे पुन्हा तोंड पाहण्याची संधीही घरच्यांना मिळालेली नाही.  त्यामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनकरिता समुद्र किनारे, हॉटेल, पब, रिसॉर्ट येथे गर्दी न करणे हे केवळ आरोग्य व्यवस्थेच्याच नव्हे तर आपल्या व्यक्तिगत तब्येतीच्या हिताचे आहे. कदाचित तुमची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याने तुम्ही गर्दीत गेला तरी तुम्हाला त्रास होणार नाही. मात्र, तुम्ही कोरोनाचे वाहक बनून तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचे निमित्त होऊ शकता.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये कार्यालयीन कामाकरिता व कौटुंबिक संपर्कासाठी अनेक नवनवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्याचा घरबसल्या वापर करून तुम्ही मित्रमंडळी, नातलग यांच्यासोबत गप्पागोष्टी करीत, सुंदर आठवणींना उजाळा देत नवीन वर्षाचे स्वागत करू शकता. टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म यावरील मनोरंजनाचे कार्यक्रम कुटुंबासमवेत पाहण्याचा आनंद काही औरच असेल. घरात बसून सेलिब्रेशन केले तर दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी डोके जड झाल्याचा व पुरेशी झोप न मिळाल्याने उत्साह हरपल्याचा अनुभव यंदा येणार नाही. २०२२ मध्ये सेलिब्रेशनची संधी वारंवार येईल; पण या घडीला तुमचा-आमचा संयम मोलाचा ठरणार आहे. ‘जान है तो जहान है’। त्यामुळे यंदा किसी डिस्को में (ना) जाएँ, किसी हॉटेल में (ना) खाएं...

Web Title: Thirty-first : Go (no) to a disco, eat (no) in a hotel ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.