...असा ठणठणपाळ पुन्हा होणे नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 12:30 PM2024-08-18T12:30:34+5:302024-08-18T12:31:09+5:30
‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करत लेखक-साहित्यिकांची चेष्टामस्करी करणारे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. भरदार मिशा आणि हातात लाकडी टोला धारण केलेले ठणठणपाळचे चित्र म्हणजे साहित्यिकांसाठी मेजवानीच असायची. ललित मासिकात नेमाने प्रसिद्ध होणाऱ्या या सदरातून अनेकांच्या टोप्या उडविल्या जायच्या. त्यामुळे ठणठणपाळचे नेमके लेखक कोण, याबाबत साहित्यविश्वात कमालीची उत्सुकता होती...
- रामदास भटकळ
संस्थापक, पॉप्युलर प्रकाशन
ललित’ मासिक उघडल्यावर बहुतेक वाचक आधी ‘घटका गेली, पळे गेली’ हे सदर वाचायचे. विशेषतः ग्रंथव्यवसायातली मंडळी तर आपल्यावर गदा उगारली गेली नाही ना, ते पाहायला उत्सुक असायची. काहींना ते हवेहवेसेही वाटायचे. ठणठणपाळ गुद्दे कमी मारायचे, क्वचित चिमटे काढायचे; पण, बहुतेक वेळा गुदगुल्या करायचे. बहुतेक समीक्षक साहित्याकडे अतिगंभीरपणे पाहतात. दुर्बोध साहित्य उलगडून सांगण्यासाठी केलेली समीक्षा ही बऱ्याचदा मुळाहून गहन असते. ठणठणपाळ यांना फक्त साहित्यिकांच्या वैयक्तिक लकबींमध्ये रस नव्हता, तर साहित्यातही होता. त्यांच्या सदरातून त्या काळच्या लेखनाबद्दल आणि साहित्यिक घडामोडींबद्दल वाचकांना खूप काही कळायचे. फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी ही अर्कचित्रे काढणाऱ्या कार्टुनिस्टची होती, किंबहुना वसंत सरवटे यांच्या त्या सोबतच्या कार्टुन्सनी बहार यायची, हे लेखन वाचताना हा ठणठणपाळ कानपिचक्या घेणारा कोणी मुंबईकर विनोदी लेखक असावा, इतपत लक्षात यायचे. तरी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात बऱ्यापैकी यश लाभले होते.
त्या दिवसांत गिरगावातील बॉम्बे बुक डेपोत दरवर्षी स्वाक्षरी सप्ताह साजरा होत असे. त्या दहा वर्षांत आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर अशा शंभरहून अधिक साहित्यिकांनी हजेरी लावली. वाचकांना आपल्या आवडत्या लेखकाला भेटून त्यांची स्वाक्षरी घेण्याची संधी मिळत असे. एकदा पांडुरंग कुमठांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले ठणठणपाळ यांना बोलावण्याचे ठरवले, त्यांचे नाव उघड करू नये, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानंतर त्यांना मोकळेपणाने लिहिणे कठीण होईल, अशी भीती होती. त्यांचे जे सरवटेनिर्मित चित्र ‘ललित ‘मध्ये दरमहा यायचे त्याचा एक मोठा कटआऊट करण्यात आला. त्यामागे लपून ठणठणपाळ अशी सही वाचकांना मिळत असे. बराच काळ हा लपंडाव चालू राहिला. मग कोणा मित्राला राहवले नाही आणि त्यांच्या आर्जवामुळे जयवंत दळवी प्रगट झाले. त्यांच्या जन्मशताब्दीमुळे याची विशेष आठवण येते.
वास्तविक दळवी हे कथाकार, ‘चक्र’, ‘सारे प्रवासी घडीचे’सारख्या कादंबऱ्या, ‘बॅरिस्टर’, ‘महानगर’सारखी गंभीर विषयांवरची नाटके लिहून वाचकांना अंतर्मुख करणारे लेखक. त्यांना ग्रंथकर्मीची टोपी उडवायलाही आवडायचे. गंगाधर गाडगीळ मिश्किलीसाठी जसे बंडू स्नेहलतासोबत खेळायचे तसे दळवी ठणठणपाळाच्या अवतारात. त्यांनी स्वतंत्रपणे विनोदी कथाही लिहिल्या. पण त्यांतही निष्पाप सहजता नव्हती. ठणठणपाळाने कोणालाही सोडले नाही. साहित्याकडे गंभीरपणाने पाहणारे प्राध्यापक वा. ल. कुळकर्णी हे या निर्विष विनोदाचे कौतुक करायचे. साहित्य वर्तुळापासून जाणीवपूर्वक लांब राहणारे धारवाडचे जी. ए. कुलकर्णी वाचताना मिटक्या मारायचे. दळवींच्या या लेखनामागे साहित्यातील प्रवाहांची, मानवी स्वभावाची जाण होती. त्यामुळे त्या वाचताना मिटक्या लेखनाला फक्त टिंगलटवाळीचे रूप आले नाही. त्या काळात वाचकांना संदर्भ माहीत असण्याची अधिक शक्यता खरी, पण आज इतक्या वर्षानंतरही या लेखनाची खुमारी अवर्णनीय.
दळवी अमेरिकन माहिती केंद्रात अधिकारी होते. ‘पीएएल ४८०’ नामक एका अजस्र फंडाची जबाबदारी त्यांच्यावर होती. यामार्फत शेकडो पुस्तकांची मराठीत भाषांतरे झाली. यानिमित्ताने अनेक मराठी लेखक, प्रकाशकांशी त्यांचा जवळचा संबंध आला. ज्या सचोटीने सहृदयतेने आणि चोखंदळपणे त्यांनी हे काम केले. त्याने बहुतेक सगळे त्यांचे प्रशंसक झाले. कोणाबद्दल काहीही लिहिले तरी ते मांजरीच्या दातांसारखे इजा करत नसत. दळवींच्या आधी काही दिवस आणि नंतर बराच काळ वेगवेगळ्या लेखकांनी असे नर्मविनोदी सदर लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना ठणठणपाळ होणे शक्य झाले नाही.