उद्यासाठी गांधी विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:51 AM2019-10-02T05:51:43+5:302019-10-02T05:59:02+5:30
काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते.
- सुनीलकुमार लवटे
काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते. हे ब्रीद निरंतर, चिरंतन, राहणारे आहे. भारताची सध्याची स्थिती, गती, पाहता महात्मा गांधींचे जीवन, कार्य, विचार उद्याच्या अनेक वर्षांसाठी आवश्यकच नाहीत, तर अनिवार्य राहणार आहेत. महात्मा गांधी देशासाठी आज जितके आवश्यक तितकेच उद्यापण का? तर भारताचे प्रश्न आणि समस्यांना अंत नाही. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, विज्ञान-निष्ठा यासारखी मूल्ये प्रमाण मानत एकात्म भारताचे स्वप्न पाहिले होते, ते अद्याप अपूर्ण आहे. ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र गुंगा (मुका) है’ म्हणून खेद नि शल्य व्यक्त करणाऱ्या महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करायची असेल, तर उद्याचा भारत घडविताना आपणाला जात, धर्म, लिंग, प्रांत, भेद दूर सारून प्रसंगी संकीर्णतेस मूठमाती देऊन ‘देश प्रथम’चा विचार करावा लागेल. बहुविध भारतास एकाच रंगाने रंगविण्याचे प्रयोग भारतात मुघल नि इंग्रजांनी अनेकदा केले. भारत हा मुळातच बहुवंशीय, बहुसंस्कृतिक, बहुभाषिक देश होय. ‘विविधतेत एकता’ हे त्याचं वास्तव आहे. असं वास्तव असणारे जगात अनेक देश आहेत. त्यांनी देश घडविण्याचे केलेले प्रयोग नि इथलं वास्तव लक्षात घेऊन उद्याच्या विकासाचे चित्र आपण ठरविले पाहिजे. भावनेची सांगड कृतीशी घातल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम रूपात सांगितलेली ‘एकादश व्रते’ इथला माणूस घडण्यामागची आव्हाने काल होती, आज आहेत; पण उद्या ती न राहता आपला ‘आचार-धर्म’ बनेल, तर उद्याचा भारतीय नागरिक आदर्श होईल. म्हणून भारत सरकारने भविष्यातही महात्मा गांधी विचार आचार-धर्म मानत त्यांना कार्यांजली वाहत राहण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी १ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर २०१९ असे कार्यक्रम निश्चित केले असून, ते ‘गांधी -१५०’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काल युनोत आंतरराष्ट्रीय गांधी परिषद झाली. आज बंगळुरू येथे ‘गांधी प्रदर्शन’ आयोजित केले आहे. आपणही रोज या सदरात भविष्यासाठी महात्मा गांधींचे जीवनकार्य, विचार आचरणात आणून उद्याचे ‘लोकमत’ आणि ‘लोकमन’ घडविण्याचा जनसंकल्प करीत कार्यांजली वाहण्याचे ठरविले आहे.