तलाव स्वच्छतेसाठी हजारो लोक कापताहेत केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 08:32 AM2023-10-25T08:32:57+5:302023-10-25T08:33:08+5:30
‘मी, माझं, मला..’ ही कायमच जगाची प्रवृत्ती राहिली आहे.
‘मी, माझं, मला..’ ही कायमच जगाची प्रवृत्ती राहिली आहे. अलीकडच्या काळात तर त्यात फार मोठी वाढ झाली आहे. आपल्या स्वत:शिवाय आणि आपल्या कुटुंबाशिवाय कोणालाच कसलंच देणंघेणं नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. समाजाप्रति जणू आपलं काही देणंच नाही, अशीच प्रवृत्ती सगळीकडे फोफावते आहे. काही जण मात्र त्याला अपवाद असतात आणि समाजाचं ऋण ते कायम मान्य करीत असतात. आपलं आयुष्यच त्यांनी जणू समाजाप्रति समर्पित केलेलं असतं आणि त्यासाठीच त्यांची धडपड चाललेली असते. आता सेलीन एस्ट्राच या तरुणीचंच उदाहरण घ्या. व्हेनेझुएला येथील २८ वर्षीय ही तरुणी. सर्वसामान्य. पण पर्यावरण आणि समाज याविषयी अत्यंत जागरुक असलेली.
व्हेनेझुएलामध्ये एक तलाव आहे. या तलावाचं नाव आहे माराकाईबो. हा तलाव गेल्या कित्येक वर्षांत खूप प्रदूषित आहे. त्याकडे लोकांचं तर जाऊ द्या, सरकारचंही लक्ष नाही. तेलाच्या तवंगानं हा तलाव अक्षरश: ‘तेलकट’ झाला आहे. त्यामुळे या तलावातली सजीवसृष्टी तर जवळपास नष्ट झाली आहेच, पण त्यातलं पाणीही कोणालाच कशालाच वापरता येत नाही. हा तलाव पाण्याचा आहे की तेलाचा, हेही लक्षात येऊ नये, इतकं तो क्रूड ऑइलनं माखला आहे. आकाशातून पाहिलं तरी हा तेलाचा तलाव लक्षात येतो.
आता व्हेनेझुएलामध्ये सेलीन एकटीच राहते का? लक्षावधी लोक राहतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाची अशीच अवस्था आहे, पण सेलिनला हे पाहावलं नाही, तिनं ठरवलं, हा तलाव आपण प्रदूषणमुक्त करायचाच. त्यासाठी तिनं कंबर कसली. तलाव कसा स्वच्छ करता येईल, तलावातल्या पाण्याचा तवंग कसा हटवता येईल यासाठी अभ्यास करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या, विज्ञानावरची आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅगझिन्स वाचून काढली.
तिच्या लक्षात आलं, हा तलाव साफ करायचा, त्यावरील तेलाचा तवंग नष्ट करायचा तर त्यासाठी ‘केस’ हा जालीम उपाय आहे ! या केसांच्या साहाय्यानं तलावातील तेलाचा तवंग शोषून घेता येईल हे लक्षात आल्यानंतर तिनं लोकांना आवाहन करायला सुरुवात केली, बंधू, भगिनींनो, आपल्या देशाचा ठेवा असलेल्या या तलावाचं ‘शुद्धीकरण’ करण्यासाठी आपले केस दान करा!
लोकांनीही सेलिनची ही कल्पना उचलून धरली आणि अक्षरश: हजारो लोकांनी रांगा लावून आपले केस दान करायला सुरुवात केली. अजूनही करताहेत. काही लोकांनी आपल्या कुत्र्यांचेही केस दान केले. स्वयंसेवकांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. सेलीन ही ‘प्रोएक्टो सिरेना’ या एका पर्यावरणवादी संस्थेचीही अध्यक्ष आहे. तीची टीम आणि स्वयंसेवक आता या केसांच्या माध्यमातून पुढच्या महिन्यात तलावातील तेलाचा तवंग काढणार आहेत.
सेलीन सांगते, हा एक अतिशय अभिनव असा उपक्रम आहे. आमच्या या उपक्रमाला नक्कीच यश येईल असा आमचा विश्वास आहे. कारण यामागे हजारो सर्वसामान्य लोकांचंही प्रामाणिक योगदान आहे. दोन पाऊंड केसांपासून तब्बल ११ ते १७ पाऊंड तेल शोषलं जाईल असं सेलीनचं म्हणणं आहे. या केसांचा अधिक कल्पक आणि वैज्ञानिक पद्धतीनं वापर करण्यासाठी तसेच हे केस वाया जाऊ नयेत यासाठी या केसाचं मोठ्ठं जाळंही विणलं जाणार आहे. त्यामुळे महत्प्रयासानं गोळा केलेले हे केस आणि त्यांचं जाळं परत परत वापरता येऊ शकेल.
अनेक दशकांपासून या पद्धतीवर काम करणाऱ्या पर्यावरण शास्त्रज्ञांच्या पावलावर पाऊल टाकत सेलीनचं काम सुरू आहे. अलाबामास्थित केशभूषाकार फिलिप मॅक्रोरी यांनी १९८९ मध्ये मानवी केसांपासून बनवलेल्या तेल-सफाई उपकरणाचा एक नमुना तयार केला होता. त्याचा आधार सेलीननं केसांचं जाळं तयार करण्यासाठी घेतला.
त्यातून तिला प्रेरणा मिळाली आणि तलाव तेलमुक्त करण्याचा विडा तिनं उचलला. फिलिप मॅक्रोरी यांनी केसांपासून तेलसफाई करणारं जे उपकरण तयार केलं होतं, त्याची नासानंही चाचणी घेतली होती आणि हे उपकरण प्रभावी असल्याचं मान्य केलं होतं.
मॅक्रोरीने नंतर ‘मॅटर ऑफ ट्रस्ट’ या कॅलिफोर्नियास्थित संस्थेशी संलग्न होत यासाठी आणखी बरंच काम केलं. ही संस्था गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ मानवी केसांच्या मदतीनं विविध गोष्टी करीत आहे. त्यासाठी मानवी केसांच्याही ती कायम शोधात असते.