अंतरिक्ष शक्ती बनण्यामागची धमक आणि आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:16 AM2019-03-28T02:16:01+5:302019-03-28T02:16:17+5:30
अवकाशात भारताचे अनेक उपग्रह कार्यरत आहेत. शत्रूने आपला उपग्रह नाश करण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षणात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर स्थिती उद्भवू शकते.
प्रो. सुरेश नाईक (माजी संचालक, इस्रो)
अवकाशात भारताचे अनेक उपग्रह कार्यरत आहेत. शत्रूने आपला उपग्रह नाश करण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षणात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर स्थिती उद्भवू शकते. म्हणूनच अँटी-सॅटेलाइटची यशस्वी चाचणी महत्त्वाचे पाऊल मानले पाहिजे. भारताच्या क्षेपणास्त्र विकासाची सुरुवात खूप आधी झाली असली, तरी त्याला खरी गती मिळाली ती १९८१ नंतर. माजी राष्ट्रपती डॉ. ए़ पी़ जे़ अब्दुल कलाम त्या विशेष प्रकल्पाचे प्रमुख झाल्यानंतर. क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता विकसित होणे हा पहिला भाग. दुसरा म्हणजे नॅव्हिगेशन प्रणाली. अचूक लक्ष्यभेदासाठी ही प्रणाली अत्यंत सक्षम असावी लागते. आपल्या या दोन्ही क्षमता उच्च दर्जाच्या आहेत.
आजच्या यशस्वी चाचणीत आपण तीनशे किलोमीटरवरचे सॅटेलाइट नष्ट केले. हा फार मोठा पल्ला नाही, पण मुद्दा हा की, अवकाशातल्या कचऱ्याची समस्या गंभीर असल्याने भारताने जाणीवपूर्वक ‘लो अर्थ आॅरबिट’ सॅटेलाइट निवडले. अवकाश कचऱ्यात भर टाकणार नाही आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी यातून सरकारने घेतली. सातशे-आठशे किलोमीटरवरचे सॅटेलाइट निवडले असते, तर त्याच्या नाशानंतर निर्माण होणारा कचरा अवकाशात अनेक वर्षे राहिला असता. आजच्या चाचणीनंतर तयार झालेला कचरा फार तर दोन आठवड्यांत वातावरणात येऊन नष्ट होईल. क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम सुरू केल्यानंतर आपण क्षेपणास्त्र हल्ल्यापासून बचाव करण्यावर भर दिला होता. त्याला ‘अँटी-मिसाईल वेपनरी’ म्हणतात. त्यासाठी शक्तिशाली रडार लागतात. शत्रूने सोडलेल्या क्षेपणास्त्राचा ताबडतोब सुगावा लागून ते नष्ट करण्याचे तंत्रज्ञान यात आहे. हे ‘अँटी-सॅटेलाइट वेपनरी’शी मिळते-जुळते आहे. हेरगिरी करणारी सॅटेलाइट तुलनेने कमी उंचीवर असतात, पण या सॅटेलाइटस्ना नष्ट करणे आव्हानात्मक आणि किचकट आहे. सॅटेलाइट अवकाशात फिरतो, तेव्हा त्याची गती २५ ते २७ हजार किलोमीटर प्रतितास असते. इतक्या वेगवान मिसाईलचा भेद करायचा, तर नॅव्हिगेशन किती अचूक हवे, याची कल्पना करता येईल. लढाऊ विमानांचा भेद घ्यायचा म्हटले, तरी त्यांचा वेग ताशी दोन हजार किलोमीटर वगैरे असतो, पण ती दिसतात तरी, सॅटेलाइट दिसतही नाहीत.
चाचणीसाठी इस्रोने निकामी झालेल्या सॅटेलाइटची निवड केली. त्याच्या कक्षा, को-आॅर्डिनेट्स आदींची नेमकी माहिती घेऊन तो नष्ट करण्याचे नियोजन केले. निमिषार्धात आठ किलोमीटर दूर जाणाºया सॅटेलाइटला भेदण्यासाठी ते कोणत्या वेळेला, किती उंचीवर, कुठल्या कक्षेत असेल, याचे अचूक गणित मांडावे लागते. त्यानुसार, क्षेपणास्त्र सोडावे लागते. हे तंत्रज्ञान फार गुंतागुतीचे आहे. चाचणी आपल्याच सॅटेलाइटला नष्ट करण्याची असते. प्रत्यक्षात गरज पडल्यानंतर शत्रूच्या माहिती नसलेल्या सॅटेलाइटचा नाश करायचा आहे. ही क्षमता भारताने सिद्ध करून दाखविली. हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद टप्पा आहे. माझ्या माहितीप्रमाणे अँटी-सॅटेलाइट तंत्रज्ञान इस्रायलकडे आहे. जपान, फ्रान्सने यात प्रगती केली आहे, परंतु चाचणी घेण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती आणि आपल्या संशोधनावरचा, शास्त्रज्ञांवरचा आत्मविश्वास हे देश दाखवू शकलेले नाहीत. कारण या चाचणीत इतर देशांच्या सॅटेलाइट्सना धोका पोहोचू शकतो. हा धोका असा आहे की, थेट युद्ध सुरू होऊ शकते, म्हणूनच हे देश चाचणी घेण्यास धजावलेले नाहीत. भारताने मात्र अँटी-सॅटेलाइट वेपनरीची यशस्वी चाचणी घेऊन अंतरिक्षातली महाशक्ती बनण्याचा मान मिळविला आहे.
अग्नी-चार क्षेपणास्त्राचे पाच वर्षांपूर्वी प्लॅनिंग करून विकसन पूर्ण झाले. बॅलेस्टिक आहे. (अग्नी पाचची रेंज खूप जास्त. पाच हजार किलोमीटर जाहीर, पण आठ हजार किमी जाऊ शकते. अग्नी चार हजार किलोमीटरच्या आत आहे.) टेस्टची तयारी सात-आठ महिन्यांपासून तयार झाली असणार. यासाठी खूप बाजूने विचार करावा लागतो. राजकीय इच्छाशक्ती असावी लागते़ एअर स्ट्राइकमध्ये आपली विमानेही पाडली जाऊ शकतात. अशा चाचण्यांमध्ये दुसºया उपग्रहांना पाडले, तर थेट युद्धाची स्थिती ओढवू शकते. समजा चीनचे उपग्रह पाडले आणि म्हणालात अपघाताने झाले, तरी ती अतिशय गंभीर घटना ठरू शकते. आर्थिक मुद्दाही आहे. मिसाईल्सची किंमत वीस कोटी रुपयांच्या पुढे असू शकते. शिवाय सर्व तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ त्यांची बुद्धी, श्रम या कामी लावतात. मनुष्यळाची किंमत मोजता येत नाही, पण टेक्नॉलॉजी आत्मसात करायची, तर चाचणी केल्याशिवाय पर्याय नाही.