गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

By Admin | Published: October 2, 2014 01:19 PM2014-10-02T13:19:30+5:302014-10-02T13:22:03+5:30

गांधीजी व तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत.

Three books of Gandhiji's life | गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

googlenewsNext

- सूर्यकांत पळसकर

सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता’, व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट’ आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंगगाथा’ हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणार्‍या या तिन्ही विचारांत अद्वैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढय़ाचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअल’ या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तक’ अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीता’ हे पुस्तक आणि ‘सत्य’ हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वत:शी जोडून घेतला. 
गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २0 ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसर्‍या गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.’ 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्ट’ हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्ट’ हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदय’ या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : १. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. २. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. ३. साधे अंगमेहनतीचे शेतकर्‍याचे जीवन हेच खरे जीवन आहे.
हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २00 वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।’ हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,’ हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वत:चा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।’ असे वचन लिहून जातात. 
तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्‍विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 
‘गीता’ आणि ‘अन्टू धिस लास्ट’ या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 
पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।..
गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसर्‍याच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अध्र्या जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.) 

Web Title: Three books of Gandhiji's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.