गारठा

By Admin | Published: January 16, 2017 12:09 AM2017-01-16T00:09:23+5:302017-01-16T00:09:23+5:30

बापरे बाप! काय ही थंडी? गारठलो मी! असे उद्गार सध्या सर्वत्रच ऐकू येतात.

Thresher | गारठा

गारठा

googlenewsNext


बापरे बाप! काय ही थंडी? गारठलो मी! असे उद्गार सध्या सर्वत्रच ऐकू येतात. मग कुणी स्वत: कडेकोट बंदोबस्तात राहून समोरच्याला प्रश्न करतात; बघा एवढ्याशा थंडीने गारठलात. ते आपले जवान बघा! केवढ्या थंडीत, बर्फात काम करतात ते ! याला उत्तर नाहीच! तिची ऊब अफाट ! आपले आजी-आजोबा गोधडीच वापरायचे. त्यांना कुठले ब्लँकेट आणि विंडचिटर? मुळात पूर्वीचे लोक चिटर कमी आणि भाबडे किंवा देवभोळे जास्त होते. त्यामुळे शेतावर काम करताना कुठली आली थंडी आणि गारठा ! गारठा तसा दोन प्रकारचा. एक निसर्गदत्त, तपमान उतरल्यानंतर जाणवणारा. तो आपण हवेवर, निसर्गावर सोपवला. दुसरा गारठा आपला, मानसिकतेचा ! एखादी बातमी ऐकून, घटना बघून, माणूस थंड पडतो. गोठून जातो. या अवस्था समाजातही कायम बघायला मिळतात. एकतर नुकतेच कॅशलेस, नोटाबंदीच्या सर्जिकल स्ट्राइकने देशातले एरवी एसीत राहून कारभार करणारे गारठून गेले, त्यांचे पैसे गोठले. आता हा गारठा नाही जाणवला. त्यातून थोडी ऊब निर्माण होते तर निवडणुका ! तिकिटासाठी धावाधाव, मारामार, कुरघोडी, कोलांटीउडी, नाही मी तर माझी बायको, मुलगा, मुलगी, भाऊ पण माझाच ! म्हणजे पद मला नसले तर माझ्या घरातच पाहिजे ! एवढे करून उमेदवारी पदरात पडली नाही तर संक्रांत कडू ! पतंग कटला, एकदम गारठणे सुरू ! ज्याला घाम गाळून उमेदवारी मिळाली त्याला गारठा नाही तर गारवा. बघा ना, गार शब्द एकच, पण त्याचा कधी गारठा होईल सांगता येत नाही. आपल्याला ‘वा’ची सवय त्यामुळे ठा नको. ध चा मा होतो हे ऐतिहासिक सत्य आहे. पण वा चा ठा झाला की दु:खच दु:ख. कुणीच आपल्याला विचारीत नाही. एरवी कोटीमध्ये लोळणारे कैदेत जातात. हा आर्थिक गारठा वाईटच. माणूस एका अक्षरात धुळीस मिळतो, तर असे गारठे खूप! आर्थिक, सामाजिक, बौद्धीक, राजकीय, कौटुंबिक अशा कितीतरी गारठ्यांमधून आपल्याला प्रवास करावा लागतो. सध्या महापालिका शेकोटी पेटवून बसलीय. तुम्ही जवळ गेलात तर चटका बसेल. दूर गेलात तर काकडून जाल. एकदा निकाल लागू द्या. काही गारठतील, काही शेकतील. बरं या नोटाबंदीमुळेही पैशांची ऊब किती देणार? ‘सेवक’ व्हायचंय ना? मग तीर्थाटनं घडवा, पर्यटन करा, साड्या-चोळ्या, भांडीकुंडी आता प्रेशरकुकर जुना झाला ओव्हन हवा, टीव्ही आहेच ! बोटांचा गारठा कमी करा ऊब वाढवा मग बटन दाबायलाही सोपं. नुस्तच गोडबोला म्हणू नका, जीव तीळ तीळ तुटतो हो ! चला केलेल्या कामांची यादी करा, पुस्तिका द्या ! अहो, निसर्गाचा गारठा काही दिवसांत कमी होईल. मग गरम होऊ लागेल. निसर्ग प्रेमळ आहे हो, गारठाही देतो त्याचा गारवाही करतो. पण सर्वसामान्य माणसाचे काय? त्याला किमान गरजा भागविण्याचा, त्याचे दैनंदिन जीवन सुखी समाधानी करण्याचा गारवा त्याला मिळाला तर इतरांचा गारठाही कमी होईल. नुस्त्या आश्वासनांच्या शेकोट्या पेटवू नका, त्या विझतील, कार्याची ऊब द्या ! आज माणसाला त्याची गरज आहे.
-किशोर पाठक

Web Title: Thresher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.