‘ति’चा जागर!
By किरण अग्रवाल | Published: March 8, 2018 07:27 AM2018-03-08T07:27:30+5:302018-03-08T07:27:30+5:30
उत्सवी कार्यक्रमांमधून सेवा व समाधानाचा शोध घेण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्तही असे उत्सवी उपचार पार पडतील; स्त्रीशक्तीचा जागर व स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा झडतील; पण ते होत असताना समाजात अजूनही टिकून असलेल्या यासंदर्भातील असमानता अगर विषमतेकडे गांभीर्याने लक्ष न दिले गेल्यास त्या उत्सवी उपचारांना अर्थ उरणार नाही.
उत्सवी कार्यक्रमांमधून सेवा व समाधानाचा शोध घेण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्तही असे उत्सवी उपचार पार पडतील; स्त्रीशक्तीचा जागर व स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा झडतील; पण ते होत असताना समाजात अजूनही टिकून असलेल्या यासंदर्भातील असमानता अगर विषमतेकडे गांभीर्याने लक्ष न दिले गेल्यास त्या उत्सवी उपचारांना अर्थ उरणार नाही. नुकत्याच केल्या गेलेल्या आर्थिक सर्वेक्षणात समाजातील ‘नकोशी’चा जो मुद्दा निदर्शनास आणून दिला गेला आहे त्या पार्श्वभूमीवर तर ‘ति’च्या जागराची व मानसिकता बदलाची चळवळ अधिक गतिमान होणे अत्यंतिक गरजेचे ठरून गेले आहे.
महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. तथाकथित मर्यादा व संकोचाला बाजूला सारत त्यांनी अनेकविध क्षेत्रांत आपली हुकूमत प्रस्थापित केली आहे. काळ बदलतो आहे, हेच यातून स्पष्ट व्हावे. शासनही, मग ते कालचे असो की आजचे व कोणत्याही पक्षाचे; महिलांच्या सबलीकरणाकडे विशेष लक्ष देत आहे. कायद्याचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करताना प्रोत्साहनाची भूमििका घेतली जाताना दिसत आहे. गेल्याच महिन्यात रेडिओवरून ‘मन की बात’ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘जीवनाच्या वाटचालीमध्ये प्रत्येक क्षेत्रात व ‘न्यू इंडिया’च्या स्वप्नात महिलांचा सहभाग व त्यांची समान भागीदारी असावी’, असे म्हटले होते. महिला या केवळ आधुनिकच झाल्या नाहीत तर, त्या देश आणि समाजालाही नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले होते. समाजाला पुढे नेण्यासाठी धडपड करणाºया प्रत्येकाकडूनच स्त्री सन्मानाचा व समानतेचा उच्चार केला जात असतो. महिला दिनानिमित्त आजही तो घडून येईईल. विविध कार्यक्रम व पुरस्कार वितरणातून त्यासंदर्भातील जाणिवा अधिक बळकट व्हायला निश्चितच मदत होईल; पण तेवढ्यावर थांबता किंवा समाधान मानता येऊ नये. नारीशक्तीचा म्हणजे ‘ति’चा जागर हा केवळ एका दिवसापुरता व उत्सवी स्वरूपाचा न राहू देता रोजच्या जगण्यातील प्रत्ययाचा तो भाग ठरायला हवा, कारण काळाचाच तसा सांगावा आहे. त्याशिवाय स्त्री-पुरुष समानतेला बळ लाभणार नाही.
विशेषत: बाल जन्मदरातील जी तफावत पुढे आली आहे ती समस्त समाजाचे डोळे उघडून देणारी आहे. २०१७ मध्ये एक हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९४५ इतके होते. काही राज्यात तर हे प्रमाण यापेक्षाही कमी झाले असून, तेथे महिलांच्या खरेदी-विक्रीसारखे प्रकार घडून येऊ लागल्याचे आरोप होत आहेत. दिवसेंदिवस ही स्थिती भयावह रूप धारण करण्याची शक्यता असून, समाजव्यवस्थेला त्यातून धडका बसायला सुरुवातही झाली आहे. यंदा आर्थिक सर्वेक्षण करतानाही प्रथमच यासंदर्भातील गंभीरतेकडे लक्ष वेधले गेले असून, देशभरातील ‘नकोशीं’ची संख्या सुमारे दोन कोटी असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ‘नकोशी’ म्हणजे काय, तर इच्छेविरुद्ध जन्मास आलेली मुलगी. तेव्हा, अशातून म्हणजे अनिच्छेतून जन्मास आलेल्यांबद्दल निर्माण होणारे त्यांचे अस्तित्व, अस्मिता व आत्मसन्मानाचे प्रश्न लक्षात घेता, स्त्री-पुरुष समानतेची चर्चाच वायफळ ठरावी. कशातून होते हे सारे, तर अद्यापही बदलू न शकलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेतून. वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच या समजातून आणि चूल व मूल या मर्यादांतच अडकवून ठेवल्या गेलेल्या कौटुंबिक जबाबदारीच्या वेठबिगारी संकल्पनांतून. म्हणूनच केवळ महिलांच्याच नव्हे तर, एकूणच समाजाच्या जाणिवांचे आभाळ मोकळे होणे गरजेचे ठरले आहे.
आपण समानता वा बरोबरीच्या दर्जाच्या गोष्टी करतो; परंतु खुद्द महिलांत ते दिसते का हा पुन्हा वेगळा प्रश्न आहे. आर्थिक पातळीतून आकारास येणारी असमानता जाऊ द्या, मात्र सामाजिक स्तरावर सन्मान व अधिकारांतही अद्याप पुरेशी समानता आणता येऊ शकलेली नाही हे वास्तव आहे. कौटुंबिक कलहातून ओढवणा-या छळाच्या वा हुंडाबळीसारख्या घटनांतील आरोपींमध्ये अधिकतर महिलांचाच सहभाग आढळून येतो तो त्यामुळेच. तेव्हा, स्त्री-पुरुष समानतेला पूर्णांशाने साकारण्यासाठी मानसिकतेचीच मशागत गरजेची ठरावी. त्यासाठी विविध सामाजिक संस्था-संघटनांनी चालविलेल्या प्रयत्नांबरोबरच ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ सारख्या अभियानातून त्ययास हातभार लागत आहे, हेदेखील आवर्जून नमूद करता येणारे आहे. बालमनावर हे समानतेचे संस्कार कोरले गेले तर तेच भविष्यातील वाट प्रशस्त करणारे ठरतील. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील मुखेड या छोट्याशा गावात तेथील शाळेच्या पुढाकाराने घराघरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या अलीकडेच लावण्यात आल्या. आपल्या नावासोबत पित्याचे नाव लावण्याची परंपरा आहे; पण आईचेही नाव लावून तिला सन्मान देण्याचे पुरोगामित्व किशोर शांताबाई काळे यासारख्या काही मान्यवरांनी यापूर्वीच आचरणात आणून वेगळा आदर्श घालून दिला आहे. मुखेडकरांनी त्याचीच पुुढची पायरी गाठली म्हणायचे. हा खरा ‘ति’चा जागर ! यासारखे जनमनावर परिणाम करणारे उपक्रम सातत्याने व सर्वत्र राबविले गेल्यास त्यातून समानतेचा ‘टक्का’ वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच घडून येवो याच या महिला दिनानिमित्त अपेक्षा.