टिकटिकसोबत घड्याळात वाढली काटाकाटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:40 AM2020-08-19T00:40:24+5:302020-08-19T00:45:02+5:30

मिलिंद कुलकर्णी शरद पवार यांच्यासारखे दमदार व दूरदर्शी नेतृत्त्व हे महाराष्टÑातील महाविकास आघाडी सरकारचा मुख्य आधारस्तंभ आहेत. अक्षरश: गल्लीपासून ...

The ticking of the clock increased with the ticking! | टिकटिकसोबत घड्याळात वाढली काटाकाटी !

टिकटिकसोबत घड्याळात वाढली काटाकाटी !

Next

मिलिंद कुलकर्णी

शरद पवार यांच्यासारखे दमदार व दूरदर्शी नेतृत्त्व हे महाराष्टÑातील महाविकास आघाडी सरकारचा मुख्य आधारस्तंभ आहेत. अक्षरश: गल्लीपासून दिल्लीपर्यंत पवार यांचा वावर आहे आणि प्रत्येक घडामोडीकडे पूरेपूर लक्ष आहे. नातू पार्थ पवारची जाहीर कानउघाडणी करणारे पवार हे चिनसंदर्भात केंद्र सरकारने आॅनलाईन घेतलेल्या बैठकीच्या निर्णयाचे समर्थनदेखील करतात. मुंबईतील बॉम्बस्फोटाची संख्या एकाने वाढविणाºया पवार यांच्या चाणक्यनीतीचा परिचय अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणातही दिसून येतो. माझ्या जिल्ह्यात २० शेतकºयांनी आत्महत्या केल्या, पण माध्यमांचे लक्ष हे सुशांतच्या आत्महत्येकडे आहे, अशी मल्लीनाथी त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राष्टÑवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा दबदबा राहिला. प्रभावशाली व महत्त्वाची खातीदेखील पक्षाकडे असल्याने जनसंपर्क व निर्णयावर राष्टÑवादीचा ठसा दिसून येतो. भाजपसोबत युती करुन विधानसभा निवडणूक लढविणाºया शिवसेनेला निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देत अविश्वसनीय अशी महाविकास आघाडी अस्तित्वात आणणाºया राष्टÑवादी काँग्रेसचा पगडा सरकारवर आहेच. तो नाकारुन चालणार नाही. याची जाणीव राष्टÑवादीचे नेते अधून मधून शिवसेना व काँग्रेसला करुन देत असतात. पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतर असो की, नागपुरात प्रफुल्ल पटेल यांनी केलेले विधान असो, राष्टÑवादीने वर्चस्ववादी भूमिका कायम ठेवली आहे. या भुमिकेमुळे स्वाभाविकपणे नेत्यांपासून तर कार्यकर्त्यामध्ये जोश आणि उत्साह दिसून येत आहे. मात्र हा अतिउत्साह आता नेते व पदाधिकारी यांची डोकेदुखी ठरत आहे.
खान्देशातील चित्र पाहिले तर जळगाव, धुळे व नंदुरबारमधील एखादा तरी नेता, पदाधिकारी हा मुंबईत जाऊन धडकतोच. अधिकाºयांच्या बदलीपासून तर जिल्हाध्यक्ष हटवापर्यंत वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, अनिल देखमुख, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारीत होत आहेत. त्यातून भेटीचा उलगडा होतो. आणि प्रतिस्पर्धी गटदेखील मुंबई गाठतो.  दुसरीकडे थेट मंत्री, नेत्यांना मोबाईलद्वारे फोन लावून त्याचे रेकॉर्डिग प्रसारीत करुन स्वत:च्या संपर्क व ज्येष्ठत्वाचा बडेजाव मिरवला जातो.  पाच - सात महिन्यांपासून हे प्रकार सुरु असल्याने नेतेदेखील वैतागले असल्याचे सांगितले जाते.
राष्टÑवादी काँग्रेसमध्ये एवढे नेते आणि कार्यकर्ते असतील, तर गेल्या दोन निवडणुकांपासून केवळ एक आमदार कसा निवडून येतो. खासदार का निवडून येत नाही, असा प्रश्न पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे व अविनाश आदिक यांनी जाहीरपणे धुळ्यातील मेळाव्यात विचारला. या दोन्ही पक्षनिरीक्षकांनी गेल्या आठवडयात धुळे व नंदुरबारचा दौरा केला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या.  दोन्ही ठिकाणी गटतट, मतभेद दिसून आले. वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी घातल्या जातील आणि यथावकाश निर्णय होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.
थोडे मागे वळून पाहिले तर नंदुरबार आणि धुळ्यात ऐन विधानसभा निवडणुकीत राजेंद्रकुमार गावीत व राजवर्धन कदमबांडे या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसने एकही जागा दिली नाही. धुळ्यात मिळाली: मात्र यश आले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर पक्षनेतृत्वाने धाडसी निर्णय घेतला. भाजपशी काडीमोड घेतलेल्या फायरब्रँड नेता अनिल गोटे यांना थेट प्रदेश उपाध्यक्ष केले. पवार, भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठविणाºया गोटेनीदेखील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात राष्टÑवादीचा स्वतंत्र गट तयार करुन जोरदार संपर्क, कार्यक्रम, बैठकांचा धडाका लावला. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देत स्थानिक भाजप नेत्यांना जेरीस आणण्याचे काम गोटेनी प्रभावीपणे केल्याने प्रदेश नेतृत्वाला त्यांची उपयुक्तता पटली, मात्र स्थानिक पातळीवर अस्वस्थता वाढली. त्यातून मुंबई भेटींचा जोर वाढला. अखेर निरीक्षकांना धाडण्यात आले. नंदुरबारात गोटे समर्थक डॉ.अभिजित मोरे व शरद गावीत समर्थक सागर तांबोळी यांच्यात जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा आहे. धुळ्यात किरण शिंदे जिल्हाध्यक्ष आहेत, मात्र संदीप बेडसे, डॉ.जितेद्र ठाकूर, रणजित भोसले यांना स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे आहे. कदमबांडे आणि गोटे या दोघांपासून दूर असलेल्या नेत्यांना पक्षनेतृत्वाने बळ द्यावे, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांची आहे.
जळगावात दुखणे वेगळेच आहे. सेनेच्या पालकमंत्र्यांसह तीन आमदार हे राष्टÑवादीचा पराभव करुन निवडून आले आहेत. पाचोºयात राष्टÑवादी तिसºया क्रमांकावर राहिली. त्यामुळे सेनेचे वर्चस्व या तालुक्यांमध्ये असह्य होत असले तरी नेतृत्व दादपुकार घ्यायला तयार नसल्याने अडचण झाली आहे. यातून काय मार्ग निघतो, यावर घडयाळाची टिकटिक अवलंबून आहे. 

 

Web Title: The ticking of the clock increased with the ticking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.