शांत, संयमी अमिताभ बच्चन यांच्यातला 'टायगर' जागा होतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 05:52 AM2020-07-31T05:52:33+5:302020-07-31T05:53:45+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये ‘घराणेशाही विरुद्ध स्ट्रगलर्स’ यांच्यात सोशल मीडियावर वाक्युद्ध सुरू आहे. कंगना राणावतपासून शेखर कपूरपर्यंत अनेकजण यामध्ये सहभागी झाले आहेत. कारण त्यांच्याही हाताला काम नाही. यानिमित्ताने स्टार्स भूमिका घेत आहेत, हीच त्यामधील जमेची बाजू आहे.
'हम' चित्रपटात एक दृश्य आहे. ‘टायगर’च्या गुंडागर्दीच्या पूर्वायुष्याला पाठी टाकून ‘शेखर’ या नावाने जीवन जगणारा अमिताभ आपल्या भावाच्या हरवलेल्या पत्नीला शोधत असताना एक बसचालक शेलकी प्रतिक्रिया देताच खवळून उठतो आणि पुन्हा ‘टायगर’च्या देमार अवताराकडे वळतो. ही आठवण होण्याचे निमित्त ठरले ते बच्चन यांनी आपल्या ट्रोलरची अक्षरश: धुलाई करणारा ब्लॉग लिहिल्याचे.
बच्चन हे गेली १८ दिवस कोरोनावरील उपचाराकरिता एका खासगी इस्पितळात दाखल आहेत. त्याचवेळी त्यांचे पुत्र अभिषेक, स्नुषा ऐश्वर्या व नात आराध्या हेही कोरोनावरील उपचाराकरिता मागे-पुढे त्याच इस्पितळात दाखल झाले. घरातील एका व्यक्तीला कोरोना झाला तर संपूर्ण घर अस्वस्थ होते. येथे तर घरातील चौघेजण उपचार घेत असल्याने बच्चन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. त्यातच बच्चन ज्या इस्पितळात दाखल झाले त्या इस्पितळावर रुग्णांकडून महागडी बिले वसूल केल्याबद्दल बडगा उगारला गेला असल्याने आपली गेलेली पत सावरण्याकरिता बच्चन यांच्या प्रतिमेचा हे इस्पितळ वापर करत असल्याची टीका सोशल मीडियावर केली गेली. बच्चन इस्पितळात दाखल होण्याच्या वेळीच अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना झाल्याने बंगला सील केला गेला. त्यावरुन सोशल मीडियावर बरीच राळ उठली. ऐश्वर्या यांना कोरोना झाल्यावर त्यांनाही हिणकस विनोदांनी लक्ष्य केले गेले. तात्पर्य हेच की, बच्चन कुटुंब कोरोनाशी लढत असताना लॉकडाऊनमुळे सध्या रिकामटेकड्या असलेल्या लक्षावधी लोकांनी सोशल मीडियावर बरीच हेटाळणी सुरू ठेवली.
बच्चन असो किंवा अन्य कुणीही सेलिब्रिटी त्यांच्यावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक असतात. ते त्यांना प्रेम संदेश, शुभेच्छा संदेश देत असतात. पण हे संदेश त्यांच्या खिजगणतीत नसतात. सेलिब्रिटींना फॉलो करणाऱ्यांनाही त्याची माहिती झाली आहे. त्यामुळे एका फॉलोअरने कोट्यवधींच्या गर्दीत बच्चन यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याकरिता ‘बच्चन यांचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा’, अशी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली. पोस्ट करणाऱ्याचा हेतू जरी यशस्वी झाला असला तरी त्यामुळे शांत, संयमी, धीरगंभीर स्वरात जगाला पोलिओ डोस देण्यापासून ‘स्वच्छ भारत मिशन’पर्यंत अनेक सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या अमिताभ यांच्यातील ‘टायगर’ चवताळून उठला. या ‘मिस्टर अज्ञात’ याला उद्देशून लिहिताना बच्चन यांनी ‘कदाचित तुला तुझे वडील कोण हे ठाऊक नसावे.’ ‘माझे नऊ कोटी फॉलोअर्स तुझ्यावर तुटून पडतील. समजा मी जर त्यांना सांगितले, ठोक दो साले को, तर तुझी काय गत होईल, याची कल्पना कर’ वगैरे बरेच काही सुनावले. त्याची संभावना मारीच, अहिरावण, महिषासुर वगैरे राक्षसांसोबत केली. बच्चन यांनी पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ रंगवून सत्तर, ऐंशीच्या दशकात बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुंडगिरी या विरोधात लढणारा हिरो साकार करून प्रेक्षकांची मने आपल्या ‘जंजिर’मध्ये घट्ट जखडून ठेवली. ‘अमिताभ’ या नावाचे गारूड आजही लोकांवर कायम आहे. खासगी आयुष्यात बच्चन हे अत्यंत सालस व सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे बच्चन यांनी त्या अज्ञात ट्रोलरला इतक्या कठोर भाषेत का खडसावले? ही खरोखरंच त्यांची भाषा आहे की, त्यांच्यावतीने ब्लॉग लिहिणाऱ्याने इतके कठोर शब्द वापरले? उद्या कदाचित खुद्द बच्चन यांनाच आपण इतकी कडक भाषा वापरायला नको होती, असे वाटले तर कदाचित तेच आपले ‘शब्द’ मागे घेतील का? अशा अनेक प्रश्नांची मालिका या निमित्ताने बच्चन यांच्या चाहत्यांच्या मनात फेर धरून नाचू लागली आहे.
गेल्या चार महिन्यांत केवळ बच्चन हेच नव्हेतर अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती सर्वसामान्यांच्या ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत. कोरोनामुळे बहुतांश लोक घरी आहेत. काहींच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद पडले आहेत. आर्थिक चणचण आणि पर्यायाने व्यसनाधीनताही वाढली आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमध्ये वादळ उभे केले आहे. अनेक स्टार्स मनोरंजन क्षेत्रातील फोफावलेल्या अपप्रवृत्तींबाबत बोलत आहेत.त्याची झळ बच्चन यांनाही अशाप्रकारे बसलेली असू शकते. हरिवंशराय बच्चन यांची एक काव्यपंक्ती समर्पक आहे. ‘रास्ते का एक काँटा, पाँव का दिल चीर देता, रक्त की दो बूंद गिरती, एक दुनिया डूब जाती, आँख में हो स्वर्ग लेकिन, पाँव पृथ्वी पर टिके हो, कंटकों की इस अनोखी सीख का सम्मान कर ले.’