काळ सोकावेल !

By admin | Published: April 13, 2016 03:45 AM2016-04-13T03:45:48+5:302016-04-13T03:45:48+5:30

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह

Time! | काळ सोकावेल !

काळ सोकावेल !

Next

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी थेट मोन्सँटो या बहुराष्ट्रीय कंपनीचे नाव घेऊनच दिला आहे. मोन्सँटोचा संयुक्त उपक्रम असलेली महिको मोन्सँटो बायोटेक लिमिटेड (एमएमबीएल) ही कंपनी भारतात बीटी कॉटन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाणाचे उत्पादन व विक्री करते. एमएमबीएलने इतर २८ भारतीय कंपन्यांनाही उत्पादनाचा परवाना दिला आहे. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या बोंडअळीला अटकाव करणारी ही जात जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. मोन्सँटोकडे या तंत्रज्ञानाचे एकस्व (पेटंट) असल्यामुळे ती कंपनी कपाशीच्या इतर वाणांच्या तुलनेत किती तरी चढ्या दराने विक्री करीत आहे. केंद्राने त्यालाच लगाम घालण्याचा निर्धार केला आहे. बीटी बियाणाची ४५० ग्रॅम वजनाची पिशवी मोन्सँटो आतापर्यंत एक हजार रुपयांहून अधिक किमतीला विकत होती; मात्र गेल्याच महिन्यात भारत सरकारने त्यासाठी ८०० रुपयांपेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही, असे फर्मान काढले. बीटी बियाणाच्या किमतीत, मोन्सँटो आकारत असलेल्या एक प्रकारच्या स्वामीत्वशुल्काचाही अंतर्भाव आहे. आतापर्यंत बीटी बोलगार्ड-१ साठी १२२.९६ रुपये, तर बीटी बोलगार्ड -२ साठी १८३.४६ रुपये स्वामीत्वशुल्क आकारले जात होते; मात्र आता त्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. कपाशी लागवडीच्या वाढत्या भांडवली खर्चामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राचा हा निर्णय नक्कीच मोठा दिलासा देणारा आहे. मोन्सँटोच्या मात्र तो स्वाभाविकच पचनी पडलेला नाही. किंमतीमध्ये पुरेशी वाढ करण्यास परवानगी दिली नाही, तर भारतातील कारभार गुंडाळावा लागेल आणि या देशात नवे तंत्रज्ञान आणता येणार नाही, असा इशाराच त्या कंपनीने दिला आहे. हा इशारा भारतासाठी धोकादायक आहे. वाढती लोकसंख्या आणि घटत चाललेले लागवडीखालील क्षेत्र, या पार्श्वभूमीवर भारताला कृषी उत्पादनात वाढ करणाऱ्या तंत्रज्ञानाची, विशेषत: नवनव्या बियाणांची नितांत गरज आहे. देशातील कृषी विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये उपयुक्त संशोधनाच्या बाबतीत आनंदीआनंदच आहे. मोन्सँटोचे बीटी बियाणे २००२ मध्ये भारतात दाखल झाले. तेव्हापासून देशी बीटी वाण विकसित करण्याच्या गप्पा सुरू आहेत; पण प्रत्यक्षात अद्यापही केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर)चे बीटी बियाणे बाजारात आलेले नाही. उद्या मोन्सँटो निघून गेली, तर जगातील इतर कंपन्याही भारतात आपले तंत्रज्ञान आणण्यापूर्वी दहादा विचार करतील. भीती त्याची आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावला तर काय?

Web Title: Time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.