लबाडाचं आवतण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:01 AM2018-02-05T00:01:11+5:302018-02-05T00:01:25+5:30
मराठी मुंबापुरीतील पृथ्वी शॉ नामक बालकाने राष्ट्रभूमीला जगज्जेते बनविल्याचा आणि ‘पद्मावत’वरील करनी बांधवांची नाराजी शत-प्रतिशत दूर झाल्याचा ई-मेल इंद्रलोकी पाठवून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर येमके निवांत झाला होता.
- राजा माने
मराठी मुंबापुरीतील पृथ्वी शॉ नामक बालकाने राष्ट्रभूमीला जगज्जेते बनविल्याचा आणि ‘पद्मावत’वरील करनी बांधवांची नाराजी शत-प्रतिशत दूर झाल्याचा ई-मेल इंद्रलोकी पाठवून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर येमके निवांत झाला होता. एवढ्यात नारदांचा व्हॉट्सअॅप मेसेज त्याच्या मोबाईलमध्ये येऊन धडकला! ‘लबाडाचं आवतण...’ ही भानगड काय? एका वाक्यातील या मेसेजने आपला येमके चक्रावून गेला. (येमके - यमगरवाडीचा मनकवडे बरं का!) दीपिकाच्या नाकावर पद्मावतमुळे आलेलं आरिष्ट दूर झालेलं असतानाही नारदांनी तसा मेसेज का टाकला असावा, याचा तो विचार करू लागला. तिने इतिहास सांगणा-या सिनेमातच काम न करण्याच्या निर्णयामुळे तर नारदांनी तसा मेसेज टाकला नसावा ना... की मराठी भूमीत आणखी कुठली भानगड झाली असावी, असे एक ना अनेक प्रश्न येमकेच्या मनात येऊ लागले. यापूर्वीही नारदांनी ‘रुमणं, जित्राब, येटन’ अशा शब्दांचा मेसेज टाकून येमकेला अनेकदा बुचकळ्यात टाकले होते. शेवटी त्याने थेट नारदांना नक्की काय अपेक्षित आहे, हे विचारायचे ठरवले. त्याने फोन केला, नारदांनी केवळ ‘जाणता राजा’ एवढा शब्द उच्चारून फोन कट केला. मराठी भूमीतील सुशिक्षित पंचतारांकित राजकारण्यांना बुचकळ्यात टाकणाºया शब्दांचं नातं जाणत्या राजाशी असल्याचा पक्का अंदाज येमकेने बांधला आणि राज्यातील आपले सर्व सोर्सेस कामाला लावले. नमो आणि कंपनीने बळीराजाला दिलेल्या दीडपट भावाचे निमंत्रण म्हणजेच ‘लबाडाचं आवतण’ या निष्कर्षाला येऊन तो पोहोचला. औरंगाबाद भूमीत जाणत्या राजाने हल्ल्याचे बोल व्यक्त करताना तसे शब्द उच्चारल्याचेही त्याला समजले.
त्याने इंद्रलोकी पाठविण्याचा रिपोर्ट तयार करण्याअगोदर नारदांशी चर्चा करण्याचे ठरविले व त्यांच्याशी संपर्क साधला.
येमके - महागुरू, आपल्याला ‘पद्मावत’त्रस्त दीपिकातार्इंचा रिपोर्ट पाहिजे होता का? त्यांच्या नाकावरील शूर्पणखा अवस्थेचे संकट आता टळलेले आहे. २०० कोटींचा गल्लादेखील भन्साळींच्या खात्यावर जमा झाला आहे. मग आता हे ‘लबाडाचं आवतण...’
नारद - (येमकेचे बोलणे कट करून) येमके, शिळ्या बातम्या सांगू नका. आवतणाचं बोला.
येमके - महागुरू, तुम्हाला जाणता राजाचा रिपोर्ट पाहिजे की जेटलींच्या ‘केटली’तून बाहेर पडलेल्या आवतणांचा?
नारद - तेही तिन्ही लोकी सर्वांनाच माहिती आहे... औरंगाबादमधील बोलांच्या हल्ल्यात काय झाले?
येमके - जी गुरुदेवा. तोच रिपोर्ट तुम्हाला देतो. दीडपट भावाने आता बळीराजाच्या घरी प्रत्येक सुगीला दिवाळी करण्याचे स्वप्न ‘नमो’ आणि कंपनीने पाहिले आहे. जाणता राजांनी त्यांच्या स्वप्नांचा भंग करणारे बोल उद्धृत केले आहेत.
नारद - येमके आता तुम्हाला विषय समजला. मग बळीराजाने आता खूश व्हायला काय हरकत आहे?
येमके - एरंडाचं गु-हाळ आणि लबाडाचं आवतण यातून कुणालाच काही मिळत नाही, हा अनुभव आहे देवा! मग बळीराजानं खूश कसं व्हायचं.
नारद - येमके आता तू स्वामीनाथन् नामक ऋषीने सुगीच्या दिवाळीबद्दल लिहिलेल्या अध्यायाचा अभ्यास कर. त्यातील दीडपट कमाईचा सिद्धांत वाच आणि मगच कोणत्याही आवतणावर तुझा रिपोर्ट पाठव.
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)