प्रत्येकाच्या मनामध्ये अयोध्या, समय के साथ श्रीराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 02:29 AM2020-08-06T02:29:27+5:302020-08-06T02:30:25+5:30

‘शत्रुता से मुक्त और समर्थ हाथोंसे जुडा हुआ’, असे वर्णन भागवत यांनी केले. ते प्रसंगाला अनुसरून होते. केवळ देशालाच नव्हे, तर जगाला संदेश देण्यासाठी राम मंदिर उभे राहत आहे, अशी प्रस्तावना भागवत यांनी केली.

With time, Shriram, Ayodhya of Shriram in everyone's mind | प्रत्येकाच्या मनामध्ये अयोध्या, समय के साथ श्रीराम

प्रत्येकाच्या मनामध्ये अयोध्या, समय के साथ श्रीराम

Next

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नेटकेपणे पार पडला. या भूमिपूजनाला तसा विरोध कोणाचाच नव्हता. श्रीरामजन्मभूमी चळवळीची पार्श्वभूमी पाहता अशा चळवळीतून उभे राहिलेल्या मंदिरात श्रीराम असेल का, मुळात प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या श्रीरामाला मंदिराची गरज काय, असा सवाल काही विरोधी लेखांतून करण्यात आला. मात्र हा विरोध व्यापक नव्हता. भारतातील बहुतांश नागरिक हे श्रीरामाच्या मंदिराच्या बाजूचे आहेत. इतिहासाची पिसे काढीत राहण्यापेक्षा अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होत आहे यामध्ये त्यांना समाधान आहे. त्या समाधानाला छेद देण्याचे उद्योग काँग्रेस पक्षातील काही मुखंड करीत होते. परंतु, प्रियंका गांधी यांनी त्यांना वेळीच ताळ्यावर आणले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत काय बोलतात याला महत्त्व होते. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमाचे औचित्य राखून योग्य भाषणे केली. वर्षानुवर्षे चिकाटीने काम करणाऱ्यांची संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिचित आहे. त्या चिकाटीचा उल्लेख भागवत यांनी केला. आत्मविश्वास व आत्मभान याचे अधिष्ठान असे हे श्रीराम मंदिर आहे असे सांगून, आता प्रत्येकाच्या मनामध्ये श्रीरामाची अयोध्या निर्माण करायची आहे असा संकल्प त्यांनी केला.

‘शत्रुता से मुक्त और समर्थ हाथोंसे जुडा हुआ’, असे वर्णन भागवत यांनी केले. ते प्रसंगाला अनुसरून होते. केवळ देशालाच नव्हे, तर जगाला संदेश देण्यासाठी राम मंदिर उभे राहत आहे, अशी प्रस्तावना भागवत यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात त्याचा विस्तार केला. संकल्पशक्तीच्या जोडीला संघटनशक्ती सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या नात्याचा केलेला उल्लेख मराठी जनांना सुखावणारा होता. मात्र, मोदींच्या भाषणाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, त्यांनी श्रीरामजन्मभूमीसाठी केल्या गेलेल्या संघर्षावर भर न देता श्रीरामाच्या गुणवर्णनावर अधिक भर दिला. श्रीराम हे दैवत मानवातील अत्युच्च गुणांचे प्रतीक आहे. म्हणूनच ते भारतापुरते मर्यादित न राहता दक्षिण आशियातील अनेक देशांत प्रतिष्ठा पावले. मोदींनी त्या गुणांचा आलेख चांगला मांडला. तथापि, त्यांच्या भाषणातील आकर्षक भाग म्हणजे मंदिर निर्माण हे परंपरेची पुनर्स्थापना करण्याबरोबरच आधुनिकतेची सांगड घालणारे असेल याचा केलेला उच्चार. ‘देश, काल, अवसर अनुहारी, बोले वचन बिनित विचारी’ असे श्रीरामाचे वर्णन असल्याचे सांगून, समय, स्थान, परिस्थिती पाहून श्रीराम विचार करायचे व त्यानुसार वागायचे, ‘समय के साथ, श्रीराम’ असे मोदी म्हणाले. श्रीराम हे परिवर्तनाचे व आधुनिकतेचे पाईक होते, असे मोदींनी दोन वेळा सांगितले. ही आधुनिकता कोणती याचे अधिक स्पष्टीकरण त्यांनी केले नाही. समोर बसलेल्या आचारनिष्ठ संत, महंतांसमोर असे स्पष्टीकरण करणे त्यांनी टाळले असावे.

आधुनिकतेचे स्पष्टीकरण मिळाले नसले तरी त्याचा उच्चार श्रीरामाच्या ठिकाणी होणे हे स्वागतार्ह आहे. ‘भयोबिन होई न प्रीती’ हे वचन सांगून धाक, सामर्थ्य असेल तरच सन्मान मिळतो हे मोदींनी ध्वनित केले. भारताच्या भावी धोरणाची दिशा त्यांनी अल्पशब्दांत सूचित केली. या कार्यक्रमातील आणखी दोन वैशिष्ट्यांचा उल्लेख केला पाहिजे. मंदिर निर्माणाचा कार्यक्रम हा विजयाचा वा उत्सवाचा कार्यक्रम नसून आनंदाचा आहे हे मोदी व भागवत यांनी म्हटले. ‘जय श्रीराम’ हा नारा व्यासपीठावरून देण्यात आला नाही. शत्रूता नसेल तेथे श्रीरामाचा वास असतो, असे भागवत म्हणाले, तर प्रेम व भाईचारा यांनीच मंदिराच्या विटा जोडल्या जाणार आहेत, असे मोदी म्हणाले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या विरोधकांना चार गोष्टी सुनावण्याच्या मोहापासून व्यासपीठावरील सर्वजण दूर राहिले. वांशिक वा बहुसंख्याकांच्या राष्ट्रीयत्वाचा वा धार्मिक उन्मादाचा रंग या कार्यक्रमाला चढणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आणि अखिल मानवजातीला प्रिय होईल अशा श्रीरामाच्या गुणदर्शनावर भर देण्यात आला हे योग्य झाले. तथापि, श्रीरामाचे परमभक्त असलेल्या रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे, ‘जैसे बोलणे बोलावे, तैसेचि चालणे चालावे’, असे वर्तन यापुढे मोदी सरकारकडून होणे आवश्यक आहे. नाहीतर मंदिर भव्य झाले तरी तेथे राम आहे का, अशी शंका जनतेला येईल.

वांशिक वा बहुसंख्याकांच्या राष्ट्रीयत्वाचा वा धार्मिक उन्मादाचा रंग या कार्यक्रमाला चढणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आणि अखिल मानवजातीला प्रिय होईल अशा श्रीरामाच्या गुणदर्शनावर भर देण्यात आला हे योग्य झाले.

Web Title: With time, Shriram, Ayodhya of Shriram in everyone's mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.