...थांबण्याची, मागे जाण्याची, ताठा सोडण्याची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:20 AM2021-04-22T05:20:06+5:302021-04-22T05:20:22+5:30
कोरोनाकाळात दर १७ तासांना एक अब्जाधीश निर्माण होत होता. महामारीतही आपली लालसा थांबलेली नाही. संकटातही जरुरीपेक्षा मगरुरीच चालू आहे.
- डॉ. राजेंद्र शेंडे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक
कार्यक्रमाचे माजी संचालक
आज वसुंधरा दिवस. अर्थ डे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही हा दिवस कोविडच्या काळातच आला आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की पृथ्वीला कळून चुकले की एक वर्षाचा अवधी मानवी जमातीला पुरेसा नाही. अजून काही काळ या माणसांना धडा शिकविणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांचीच जवळपास एक वर्षभर शिकवणी सुरू होती! खरंतर हे एक वर्ष म्हणजे अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला सुवर्णसंधी होती, पण त्याचा काहीही उपयोग आपण केला नाही. हे एक वर्ष आपण जणू समाधिस्थ झालो होतो.
मानवाला वाटतं, आपल्याकडे अतिशय प्रगत मेंदू आहे, आपण सुपरस्पेसिज आहोत. जैवविविधतेच्या पिरॅमिडमध्ये आपण सर्वांत वरती आहोत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सविषयी फक्त आपल्यालाच माहीत आहे, शोध आणि नवनिर्मिती केवळ आपणच करू शकतो! आपण मंगळावर जाऊ शकतो, चंद्रावर चालू शकतो; पण एका अतिसूक्ष्म विषाणूने आपला संपूर्ण पराभव केला. कोरोनानं आपला सारा अहंकार खाेटा ठरवून मातीत मिळवला, तरीही आपण काहीही शिकण्यास, आमचा पराभव झाला आहे हे मान्य करण्यास तयार नाही. हा विषाणू निसर्गातून आला आहे, पण तो येण्यास आणि वाढण्यास केवळ मानवच जबाबदार आहे. असंतुलित प्रगती आणि इतर प्राणीमात्रांच्या हक्काच्या अवकाशावर मानवानं केलेलं अतिक्रमण त्याला जबाबदार आहे. इतर प्राणीमात्रांसाठी माणसाने जागाच ठेवलेली नाही. विषाणूने गनिमी कावा करून ते परत मिळविण्याचा जणू चंगच बांधला आहे.
जगप्रसिद्ध निसर्ग संशोधक डेव्हीड अटेनबरो यांनी नुकताच एक लघुपट प्रसिद्ध केला. जेव्हा आपण इतर प्राणीमात्रांच्या अस्तित्वावर घाला घालतो, त्यांच्या इको सिस्टीमवर अतिक्रमण करतो, तेव्हा प्राण्यांमध्ये ताण निर्माण होतो, हे त्या लघुपटाचं सूत्र! प्राण्यांच्या शरीरावर व शरीरात अनेक प्रकारचे मायक्रोस्पेसिज राहात असतात. प्राण्यांचं शरीर हे त्यांचं नैसर्गिक निवासस्थानच असतं. या विषाणूंचा प्राण्यांना काहीही त्रास होत नाही. पण, मानवाला होतो.
मानवाला माहीत असलेल्या जगातल्या ८० लाख प्रजातींपैकी आपण केवळ एक आहोत. आपण सुपर स्पेसिज नाही आणि त्याचा गर्वही आपण करू नये. अशा स्थितीत आपण निसर्गाला कसं ओरबाडतोय आणि आपल्यासमोरची नैसर्गिक आव्हानं काय आहेत, हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. आपण जगातल्या सहाव्या संहाराच्या जवळ आलो आहोत. पाचवा संहार ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी एक भलीमोठी उल्का पृथ्वीवर कोसळून झाला होता. पृथ्वीवर सगळीकडे अंधार आणि धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. पृथ्वीचं तापमान वाढलं होतं आणि संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेतर्फे वातावरणातील बदलाचा अभ्यास केला जातो, तर ‘द इंटरगव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी ॲण्ड इकोसिस्टीम सर्व्हिसेस’ (आयपीबीईएस) या संस्थेतर्फे विश्वातील जैवविविधतेचा अभ्यास केला जातो. त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील ६५ टक्के जैवविविधता पूर्णपणे नष्ट झाली आहे. ती पुन्हा पूर्ववत करता येणार नाही. उरलेल्या ३५ टक्के इकोसिस्टीममध्ये कोण कोण राहणार, किती जणांना जागा आहे आणि मानवाने कसं राहायला हवं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोरोना काळात दर १७ तासांना एक अब्जाधीश निर्माण होत होता. श्रीमंत अधिक श्रीमंत होत होते, तर गरीब अधिक दरिद्री! म्हणजे महामारीतही आपली लालसा थांबलेली नाही. संकटातही जरुरीपेक्षा मगरुरीच चालू आहे.
इतक्या वर्षांत आपण काहीही शिकलेलो नाही. या वर्षीच्या वसुंधरा दिवसाचं सूत्र आहे, ‘रिस्टोअर द अर्थ’. पण, कसं करणार पृथ्वीला पुनर्स्थापित? त्याऐवजी मी म्हणेन ‘अंडरस्टँडिंग द नेचर्स बॅलन्स’ म्हणजेच निसर्गाचं संतुलन अधिक महत्त्वाचं आहे. काही जण म्हणतात, ‘बिल्ड बॅक बेटर’, मी तर म्हणेन, ‘बिल्ड बॅक बॅलन्स’! जोपर्यंत निसर्गाचा समतोल आपल्याला कळत नाही, हा समतोल कसा राखायचा, टिकवायचा हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला वाचवणारा कोणी नाही. आपलं अस्तित्व टिकवायचं तर आपल्याला निसर्गाकडेच जावं लागेल आणि निसर्गाकडून, प्राण्यांपासून शिकावं लागेल. अगदी मुंग्या आणि मधमाश्यांकडूनसुद्धा!
shende.rajendra@gmail.com