काळ तर मोठा कठीण आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 03:48 AM2017-08-06T03:48:48+5:302017-08-06T03:48:48+5:30

शोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.

 The time was tough ... | काळ तर मोठा कठीण आला...

काळ तर मोठा कठीण आला...

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

शोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.
लोकही पूर्वीच्याच तन्मयतेने ते ऐकतात. त्याचीच थोडी उजळणी करू या -
‘शोले’ पूर्वीचा सिनेमा आणि ‘शोले’ नंतरचा सिनेमा असे म्हणण्याइतके परिवर्तन- बदल सिनेमाचा होत गेला. ‘शोले’मुळे खलनायकदेखील नायक झाला. त्याला तेवढे ग्लॅमर आले. परिणामी, बिस्किटासारख्या बाळाच्या जाहिरातीतदेखील ‘गब्बर की असली पसंद’ आले!
शोलेचे संवाद इतके लोकप्रिय झाले की, कालपर्यंत असल्या रेकार्ड्स निघत होत्या. तिथे ‘शोले’ या रेकॉर्ड्सवर निघाल्या आणि नाक्यानाक्याच्या सार्वजनिक कार्यक्रमातून त्या वाजविल्या जाऊ लागल्या!
पुढच्या चित्रपटात ‘शोले’ च्या कॉप्य दिसायला लागल्याच, पण नाटकातसुद्धा ‘शोले’ची बाधा दिसायला लागली. ‘शोले’चे लेखक सलीम जावेदचे हुजरे तर म्हणायला लागले की, ज्याच्या साम्राज्यावरचा सूर्य-लोकप्रतिनिधीचा सूर्य कधीच मावळणार नाही. आणि ते खरेच माणूस खुद्द सलीम जावेद उद्दामपणे वागू लागले म्हणे.
हे असे सगळे वातावरण हे अभूतपूर्व असेच होते. त्यामुळेच अनुपमा चोप्रा यांनी ‘मेकिंग आॅफ शोले’ हे सांगणारे पुस्तक लिहिले. हिंदी सिनेमावरचे हे इंग्रजी पुस्तक, त्याला राष्टÑीय पुरस्कार मिळाला!
हे फॅड इतके पसरत गेले की, मग हृषिकेश गुप्तेला हजार वेळा शोले पाहणाºयांची गोष्ट अशी कथा लिहावीशी वाटली.
तेव्हा मग वाटले, आता शोले आणि त्यासंबंधात कुणाला काही सांगायचे राहिले असे वाटत नाही. सांगितले गेले, तर जुन्याचीच ती पुनरावृत्तीच असेल, पण नाही तसे नाही, अजूनही ‘शोले’ पिच्छा सोडायला तयार नाही, असे वाटायला लागलेय. बघा-
इतना सन्नाटा क्यों है भाई
हंगल विचारतोय कधीपासून,
गब्बर झाडतोय कधीपासून
प्रार्थनासभेत प्रार्थना करणाºयांवर
प्रभातकाळी मार्निंग वॉक करणाºयांवर
तुम्ही गप्प आणि
म्हातारा हंगल विचारतोय
इतना सन्नाटा क्यों है भाई
त्याला माहीत आहे
समीर अहमद मरून पडलाय गोळा लागून, पण तुम्ही ते सांगावे ही इच्छा नाही त्याची आणि ‘बोलणं’ हे जीवंतपणाचे लक्षण आहे म्हणून.
तो सारखा विचारतोय.
इतना सन्नाटा क्यों है भाई
हं दिशादिग्दर्शन आहे ‘शोलेच्या कविता’मधून आणि त्याचे कवी आहेत किरण येले.
आपले वाङ्मयवृत्त (जुलै २०१७) अंकात किरण येले यांच्या शोलेच्या कविता आलेल्या आहेत.
किरण यांनी जणू कॅमेरा लावावा, असे चित्रण केले. सद्यस्थितीत किरणसारख्या कवीची घुसमट किती होत असेल आणि म्हणून त्याला ‘शोले’तदेखील स्वत:चा हुंकार दिसतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
दिवसेंदिवस झुंडशाहीचे प्राबल्य वाढत चालले आहे. आमच्या मनासारखे तुम्ही वागत नाही, बोलत नाही. मग आम्ही तुमचा आवाज घोटणार ही वृत्ती वाढत चालले आहे. सहिष्णुता ही गोष्ट म्हणजे आदर्शवाद आहे. जो गोष्ट कधीच अस्तित्वात नसते, त्याचा काहीच उपयोग नसतो, असे म्हणून गळा घोटण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. मग कधी नाटक बंद पाडण्याचे प्रकार होतात. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आतच अंदाजानेच तो आपल्या विरुद्ध आहे, असे वाटून त्याचे खेळच होऊ नये, याचा प्रयत्न सुरू होतो.
ही समांतर स्वयंघोषित सेन्सॉरशिप त्यापुढे एकटा दुकटा हतबल होतोय...
म्हणून तर म्हणतोय काळ तर मोठा कठीण आलाय हे खरेय.
पण म्हणून भले आपला आवाज क्षीण असला, म्हणून काय झाले आपले मत व्यक्त करायला काय हरकत आहे? शोलेच्या कविता असाच एक उद्गार आहे.
म्हणूनच त्याचे स्वागत करायचे.

Web Title:  The time was tough ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.