तिरकस- विजू मामा हाजीर हो ऽऽऽऽऽऽ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:46 AM2018-08-27T05:46:42+5:302018-08-27T05:47:38+5:30
इंद्रलोकांचा मराठीभूमीतील स्टार रिपोर्टर आपला यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी त्याला या सप्ताहात कुठच्याही रिपोर्टची मागणी न करता उलट त्याला एक दिवसाची सुट्टी दिली होती.
इंद्रलोकांचा मराठीभूमीतील स्टार रिपोर्टर आपला यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी त्याला या सप्ताहात कुठच्याही रिपोर्टची मागणी न करता उलट त्याला एक दिवसाची सुट्टी दिली होती. त्याच आनंदात ‘वेलकम जिंदगी’ हे पाहण्यासाठी गडकरी रंगायतनच्या प्रांगणात पोहोचत असतानाच कुणी तरी हाक दिली, ‘अहो यमके...’ इथं कोण आपल्याला हाक देणार? असे समजून यमके पुढे चालू लागला. पण आता थोड्या मोठ्या आवाजात पुन्हा हाक आली, ‘अहो, यमके थांबा!’. आता मात्र यमकेने वळून पाहिले तर एक महिला होती. त्याने त्या महिलेला विचारले, ‘तुम्ही मला हाक मारली?. त्या महिलेने होकारार्थी मान हलविली. आपण हिला कुठेतरी पाहिलं आहे, असा विचार तो करीत असतानाच ती महिला बोलू लागली, ‘इंद्रदरबारी मराठी भूमीची बित्तंबातमी कळविणारे स्टार रिपोर्टर यमके तुम्हीच ना? माझे तुमच्याकडे एक काम आहे. यमकेच्या डोक्यात ह्या बाईला कुठे पाहिलंय? या प्रश्नाचे चक्र गतीने फिरू लागले होते. त्यातच त्याने विचारले, तुम्ही कोण? या प्रश्नावर लाडिक आवाजात ती म्हणाली, ‘मला ओळखलं नाही’? यमकेने नकारार्थी मान डोलवली. ती महिला पुन्हा म्हणाली ‘जरा आठवून तर बघा’! यमकेने पुन्हा नकारार्थीच मान डोलवली.
महिला - ओळखण्यासाठी क्ल्यू देते.. प्र.के. अत्रे.. सुधीर भट..
यमके - नाही बाई, मी नाही ओळखत तुम्हाला. बोला काय काम आहे माझ्या कडे? (यमकेच्या नकारार्थी चेहऱ्याकडे पाहत आता मात्र ती महिला चक्क गाऊ लागली.)
महिला - टांग टिंग टिंगाक..(गाण्यांचे हे शब्द कानी पडता यमके अक्षरश: ओरडलाच..) यमके - मोरूची मावशी..मोरूची मावशी! महिला - होय!मी मोरूची मावशीच!
यमके - (आनंदाने)अरे व्वा!बोला मावशी, मी काय सेवा करू आपली?
मावशी - तुम्हा सर्वांचा विजू मामा..तो विजय चव्हाण मला सोडून स्वर्गलोकी निघून गेला. त्याच्याच विरोधात मला इंद्रदेवाकडे फिर्याद द्यायची आहे. त्याला इंद्रदरबारात खेचायचं आहे. त्याकामी तुमचे गुरू नारदांच्यामार्फत मदत करा.
यमके - मावशी, ज्या विजूमामाने तुम्हाला मोरूची मावशी ही ओळख दिली त्याच मामाला तुम्ही इंद्रदेवाच्या दरबारात खेचणार?
मावशी - मग काय करू? त्याच्यावर जीव टाकणारे अश्रू ढाळून थांबतील. पण माझी ओळख तोच असताना त्याला असे स्वर्गलोकी निघून जाण्याचा अधिकार दिलाच कुणी? त्याचा मुलगा वरदच्या भावनांची तरी कदर करायला पाहिजे होती. वरदच्या लग्नाला हजर राहण्याचा शब्द देऊन तो निघून गेला. लाखो रसिक अन् रंगकर्मी हजारो नाट्यप्रेमी आणि रंगकर्मींच्या भावना दुखावून गेला. त्याचाच जाब त्याला इंद्रदरबाराने विचारायला हवा.
यमके - मावशी तो गेलेला नाही. तुझ्या रूपात आजही भूलोकी आहे. इंद्रदरबारात तुला खेचायचेच तर यमदेवांना खेचा!
मावशी - केदार, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, दीपाली सय्यदसारख्या जीवलगातच तू विजूमामाला बघ.
यमके- मावशी, मोबाईलच्या जमान्यात मोबाईलशिवाय राहून सर्वांशी मनाने कनेक्ट राहणाºया विजूमामांना बोलवण्याऐवजी आपण या सगळ्यांनाच हाजीर हो म्हणत राहू.
राजा माने
(लेखक लोकमत समुुहात राजकीय संपादक आहेत)