ती २४ वर्षं... ही २४ वर्षं...; त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 08:55 AM2021-11-25T08:55:15+5:302021-11-25T08:57:08+5:30

‘लोकमत’चे संस्थापक - संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचा आज २४ वा स्मृतिदिन... त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण !

Today is the 24th Memorial Day of Founder-Editor of Lokmat freedom fighter Jawaharlal Darda | ती २४ वर्षं... ही २४ वर्षं...; त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण!

ती २४ वर्षं... ही २४ वर्षं...; त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण!

googlenewsNext

मधुकर भावे, लोकमतचे निवृत्त संपादक

बघता-बघता २४ वर्षं झाली. बाबूजींचा आज २४ वा स्मृतिदिन. बाबूजींच्या सोबत दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत - २४ वर्षे वावरलो. माणूस म्हणून बाबूजी किती मोठे आहेत, हे त्या २४ वर्षांतील प्रत्येक दिवशी अगदी सहजपणे समजत गेलं. हे मोठेपण त्यांनी कधी स्वत:हून सांगितलं नाही, त्यांनी मदत केलेली शेकडो माणसं समोर आहेत, त्यांच्यामुळे घरकुल मिळालेली कित्येक माणसं आहेत, त्यांच्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलसारख्या दर्जेदार रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेले शेकड्यांनी आहेत. पण बाबूजींनी डाव्या हाताचं उजव्या हाताला कळू दिलं नाही.  बाबूजींचं हे मोठेपण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी पाहिलं. प्रत्येकाला एक दिवस जायचं हे असतंच! मृत्यू हा महोत्सव आहे, असं विनोबा सांगत आणि बाबूजी त्याचाच उच्चार करत. 

मी ज्या २४ वर्षांत बाबूजींना पाहिलं, त्या २४ वर्षांत ‘लोकमत’चा वटवृक्ष झाला. त्याच्या पारंब्या महाराष्ट्रभर पसरल्या. बाबूजी मंत्री म्हणून सगळ्याच मुख्यमंत्र्यांना हवे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या कामाची यादी इतकी मोठी आहे की, आज अशी कामं होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर कोणी हात टाकत नाही. पक्ष न बघता  मदत करण्याचा विषय तर आता सोडूनच द्या. बाबूजींनी ना कधी जातीचा विचार केला, ना कधी पक्षाचा विचार केला. त्यांनी फक्त कामाचा विचार केला. 

स्वातंत्र्य चळवळीत या माणसानं १८ महिने तुरुंगवास भोगला, त्याच स्वातंत्र्यसेनानीला विधानसभेत ‘स्वातंत्र्यसैनिक नसल्याबद्दल’ विखारी टीका सहन करावी लागली... स्वातंत्र्यासाठी तुरुंगात राहण्याच्या त्यागापेक्षाही ही जहरी टीका शांतपणे पचविण्यासाठी लागणारी स्थितप्रज्ञता फार मोठी असावी लागते, हे सोपं काम नाही. ‘समोरच्या बाकावरील ज्या मित्रांनी स्वातंत्र्य चळवळीत कसलाही भाग घेतलेला नाही, त्यांना मी १८ महिने तुरुंगवास भोगला, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही’... बाबूजींच्या या एका वाक्याने सारं सभागृह अवाक् झालं आणि दुसऱ्या दिवशी चुकीच्या माहितीवरून बाबूजींवर आरोेप  केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला हेच आमदार आले तेव्हा कालचा विषय विसरुन त्यांना हात धरुन नाश्ता करायला बसवणारे बाबूजी मी पाहिलेले आहेत.

ज्यांनी टीका केली, ती माणसं लक्षात राहिली नाहीत; बाबूजींचा त्याग लक्षात राहिला.  ‘हे स्वातंत्र्य कोणाकरिता...’ - १९४७ सालच्या १५ ऑगस्टला ‘नवे जग’ या मासिकासाठी लिहिलेला पहिलाच अग्रलेख बाबूजींची मानसिकता सांगून गेला होता. त्याच बाबूजींनी १५ ऑगस्ट १९९७ला म्हणजेच स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा लिहिलेला अग्रलेख त्यांच्या सामाजिक उंचीची साक्ष देतो. दुर्दैवाने महाराष्ट्राला बाबूजींची सामाजिक, वैचारिक उंची पुरेशी समजली नाही आणि चिंतनशील प्रकृतीही उमजली नाही...

आज बाबूजी नाहीत. तसे ते अकाली गेले. ७४ वर्षं  हे काही जाण्याचं वय नव्हे. या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात, हेच खरं ! गेली २३ वर्षं दर २५ नोव्हेंबरला मी यवतमाळच्या प्रेरणास्थळावर  जातो. आज चोवीसावं वर्ष. या २४ वर्षांत समाधीस्थळावर, प्रेरणास्थळावर प्रत्येकवर्षी  चौफेर महाराष्ट्रातली माणसं आली. आदरांजली वाहून गेली. बाबूजींचं मोठेपण सांगून गेली.

तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत, नारायणदत्त तिवारी, अशोक गेहलोत, नितीन गडकरी, मनोहर जोशी, सुधाकरराव नाइक, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, अरुण गुजराथी, दिग्विजय सिंह, नरपत भंडारी, अजित जोगी, सुब्बारामी रेड्डी, आदी राजकीय नेते... गौतम सिंघानिया, नौदलप्रमुख विष्णू भागवत, विख्यात वैज्ञानिक रघुनाथराव माशेलकर, पत्रकार कुमार केतकर यांच्यासारखे मान्यवर आले... पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित राजन-साजन मिश्रा, उस्ताद राशिद खान, निलाद्रीकुमार,  पंडित विश्वमोहन भट यांच्यासारखे कलावंत आले. 

यावर्षी २०२१मध्ये महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,  सदाप्रसन्न सुशीलकुमार शिंदे येत आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो रुग्णांना केवळ आपल्या ‘दोन अंगठ्याच्या’ ऊर्जेने जीवनदान देणारे प्रख्यात धन्वंतरी डॉ. गोवर्धनलाल पाराशर येत आहेत...

बाबूजींच्या सोबत गेलेली २४ वर्षं डोळ्यासमोर आहेत, जणू बाबूजीच समोर आहेत आणि ते गेल्यानंतरची ही २४ वर्षं... आयुष्याची ही ४८ वर्षं आगळीवेगळी आहेत.

Web Title: Today is the 24th Memorial Day of Founder-Editor of Lokmat freedom fighter Jawaharlal Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.