आजचा अग्रलेख - जागतिक पातळीवरील प्रभावशाली महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:37 AM2020-12-10T00:37:43+5:302020-12-10T00:41:41+5:30
Influential women : फोर्ब्जच्या जगभरातील १०० पॉवरफुल महिलांची यादी पाहिल्यावर दिसते की, जिथे राष्ट्रप्रमुख ते कंपनीप्रमुख म्हणून महिलांच्या हातात सत्ता आहे, तिथे सत्तेची अंमलबजावणीच वेगळी आहे
अमेरिकन निवडणुकीच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या ‘डीबेट’मध्ये तत्कालीन उपाध्यक्ष माइक पेन्स आणि प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांच्यात टोकाचे शाब्दिक वार-पलटवार सुरू होते. माइक सतत कमला हॅरिस यांचे बोलणे तोडत होते. असे सतत झाल्यावर हॅरिस यांनी हसत, नम्रपणे पण निक्षून सांगितले, ‘मिस्टर व्हाइस प्रेसिडेण्ट, आय ॲम स्पीकिंग’! त्यांचे हे ‘आय ॲम स्पीकिंग’ असे जाहीर म्हणणे अमेरिकन स्त्रियांचाच ‘आवाज’ असल्यासारखे त्या देशात गाजले. सर्वप्रकारचा दुजाभाव, दुय्यमत्व नाकारणाऱ्या विचारी पुरुषांनीही ते उचलून धरले. समाजमाध्यमात मिम्स ते तरुणांच्या अंगावरच्या टी-शर्टवर घोषवाक्य म्हणूनही ते अमेरिकाभर झळकले. सर्व सत्तावर्तुळे केवळ महिलांनाच नव्हे, तर ज्यांना ज्यांना हीन लेखतात त्या साऱ्यांना हे ‘मी बोलतेय’ हे सणसणीत उत्तर होते. हॅरिस यांच्या रूपाने जागतिक महासत्तेच्या पहिली कृष्णवर्णीय, आशियाई अमेरिकन महिला उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आली.
‘आय ॲम स्पीकिंग’ या शब्दांतील धग त्यांची ताकद बनली आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्ज मासिकाच्या जगातील १०० सर्वात प्रभावी- मोस्ट पॉवरफुल वूमनच्या यादीत त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. फोर्ब्जनेही ही यादी जाहीर करताना निवडणूक काळातील उपरोक्त प्रसंगाची आठवण आवर्जून नोंदवली आहे. जगभरातील १०० पॉवरफुल महिलांची यादी पाहिल्यावर दिसते की, जिथे राष्ट्रप्रमुख ते कंपनीप्रमुख म्हणून महिलांच्या हातात सत्ता आहे, तिथे सत्तेची अंमलबजावणीच वेगळी आहे आणि तिचा चेहराही अधिक ‘मानवी’ आहे. या प्रभावशाली महिलांच्या यादीत राजकीय, सामाजिक क्षेत्रांबरोबरच विविध कंपन्यांच्या सीईओ आहेत. ज्या ३० देशांतील १०० महिलांनी या यादीत स्थान मिळवले, त्यांच्या वयात, पिढी म्हणून वर्तन आणि विचारांत अंतर आहे. पण, एक गोष्ट समान दिसते ती म्हणजे हाती सत्ता असताना त्यांनी २०२० या जगाच्या इतिहासात खडतर ठरलेल्या वर्षात ज्या पद्धतीने निर्णय घेतले, अंमलबजावणी केली ती त्यांच्या पुरुष सत्ताधीश सहकाऱ्यांपेक्षा कितीतरी वेगळी आहे. नाजूक प्रश्नांची हाताळणी कोमलतेने आणि अंमलबजावणी ठोस अशी त्यांची कार्यपद्धती. ‘राजा बोले दल हाले’ असा या सर्वात प्रभावशाली महिलांचा पवित्रा नाही. समाजासोबत उभे राहून त्यांनी राजकीय वा कॉर्पोरेट इच्छाशक्तीतून सौहार्द आणि सर्वसमावेशकता यांची वाट चालून दाखवली.
या यादीत १० महिला राष्ट्रप्रमुख आहेत. कोविड-१९ समस्या हाताळताना त्यांनी आखलेली धोरणे आणि अंमलबजावणीतली करुणा - सहानुभूती जगभरात वेगळी ठरली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या यादीत ३१ व्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन आणि तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन, नाॅर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग. त्यांनी ‘पॅण्डेमिक पॉलिटिक्स’ची व्याख्याच बदलून टाकली. जगभरातील नेतृत्व महामारीच्या काळात देशांतर्गत जनतेच्या असंतोषाचा कमी-अधिक सामना करत असताना या महिलांनी थेट जनतेला समोर गेल्या आणि त्यांनी समाजोपयोगी राजकारणाची नवी परिभाषा मांडली. फोर्ब्ज मासिकही या प्रभावी महिलांची नोंद घेत म्हणते की, महामारीचे हे जागतिक संकट जगभरातील जुनाट व्यवस्था, सत्ता संरचना मोडून टाकण्याची संधी आहे. सत्ता हीच समानता आहे.
या यादीत भारतीय उपखंडातल्या केवळ चार महिला आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एचसीएल काॅर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालक रोशनी नाडर-मल्होत्रा, बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझमदार -शॉ आणि शेजारी बांग्लादेशच्या नेत्या शेख हसिना वाजेद. भारतासारख्या विशाल देशाच्या अर्थमंत्री म्हणून महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची फोर्ब्जने दखल घेतली आहे आणि खासगी क्षेत्रातील भारतीय नेतृत्वावरही विश्वास दाखवला आहे. मात्र प्रश्न असा की, केवळ राजकीयच नाही तर सर्वप्रकारच्या सत्तेत भारतीय उपखंडातील महिलांचा टक्का कधी आणि कसा वाढेल, याचा विचार नव्याने व्हायला हवा. व्यवस्थात्मक बदल होण्यासाठी ते आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी फोर्ब्जची ही यादीच पुरेशी आहे. पण सत्ता-समानता येणार कशी? पुरुषी वृत्तीच्या सत्तावर्तुळात अजूनही ‘काचेचे छत’ -ग्लास सीलिंग तोडून पुढे जाणे आणि मर्यादित वाढीसाठीच देऊ केलेले अवकाश झुगारणे वाटते तितके सोपे नाही. भारतीय उपखंडात तर नाहीच नाही. ‘आय ॲम स्पीकिंग’ हे एकट्या कमला हॅरिस यांचेच नव्हे, तर सत्तावर्तुळात स्वकर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या आणि सत्तासमानता मागणाऱ्या प्रत्येक महिलेचे विधान ठरायला हवे.