आजचा अग्रलेख: फसव्या क्रांतीला घरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:54 IST2025-01-23T09:53:55+5:302025-01-23T09:54:15+5:30

Naxalites: आणखी वर्षभरात हा संपूर्ण टापू कित्येक दशकांच्या हिंसाचारातून नक्की मुक्त होईल, याची खात्री देणारे यश सुरक्षा दलांनी गरियाबंद जिल्ह्यात नोंदविले आहे.

Today's Editorial: A fake revolution is coming | आजचा अग्रलेख: फसव्या क्रांतीला घरघर

आजचा अग्रलेख: फसव्या क्रांतीला घरघर

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अडतीस वर्षे नक्षल चळवळीत घालविलेली विमला चंद्रा सिडाम उर्फ ताराक्का इतर बारा माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांना शरण आली. त्यानंतर पाचच दिवसांत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पोलिसांचे वाहन स्फोटात उडविले. आठ जवानांसह नऊ जण मारले गेले आणि मध्य भारत माओवाद्यांच्या कचाट्यातून सोडविण्याच्या गृहखात्याच्या घोषणेकडे लक्ष गेले. माओवाद्यांनी त्यांचे अस्तित्व दाखवून दिल्याचे बोलले गेले. तथापि, तसे अजिबात नाही. आणखी वर्षभरात हा संपूर्ण टापू कित्येक दशकांच्या हिंसाचारातून नक्की मुक्त होईल, याची खात्री देणारे यश सुरक्षा दलांनी गरियाबंद जिल्ह्यात नोंदविले आहे. गरियाबंद या जिल्हा मुख्यालयापासून दक्षिणेला मैनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुल्हाडघाट, भालूडिग्गी भागात रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत छत्तीसगड व ओडिशा पोलिसांच्या प्रशिक्षित जवानांनी किमान चाैदा नक्षल्यांचा खात्मा केला आहे. घनदाट जंगलात जवळपास १५ किलोमीटर पायी जाऊन जवानांनी ही मोहीम राबविली.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर बहिष्कारासाठी माओवाद्यांचा गट मोर्चेबांधणी करीत असताना जवानांनी त्यांना टिपले. मृतदेहांजवळ एके-४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रे, संपर्काची साधने, रोख रक्कम सापडली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण हा भाग अतिदुर्गम आहे. महत्त्वाचे म्हणजे छत्तीसगड, ओडिशा राज्यांच्या पोलिसांनी १ कोटी रुपयांचे बक्षीस लावलेला प्रताप रेड्डी उर्फ जयराम उर्फ चलपती हा या चकमकीत मारला गेला आहे. तो माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य तसेच ओडिशा-आंध्र  राज्याचा प्रमुख होता. चलपतीचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. कारण, तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत मारल्या गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे याच्यानंतर तोच मोस्ट वाँटेड माओवादी होता. त्याच्या मृत्यूमुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले गेले नसेल तरच नवल. गरियाबंद हे जिल्हा मुख्यालय नेहमी बातम्यांमध्ये असलेल्या बस्तरच्या पूर्वेला महानदीच्या खोऱ्यात, छत्तीसगड व ओडिशा राज्यांच्या सीमेवर आहे. गरियाबंदच्या पूर्वेकडे ओडिशातील बालनगीरचा मैदानी भाग आणि त्यापुढे कालाहंडीचा आदिवासीबहुल जंगलप्रदेश आहे. याचा अर्थ असाही निघतो की, पश्चिमेकडे बस्तर किंवा गडचिरोली या पूर्वी अधिक सुरक्षित असलेल्या भागात सुरक्षा दलांनी एकापाठोपाठ एक मोहिमा राबविल्याने खिळखिळे झालेल्या माओवाद्यांनी आता पूर्वेकडे बस्तान हलविले आहे. आता सुरक्षा यंत्रणा आणि माओवाद्यांमधील ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे. गरियाबंदच्या चकमकीला पोलिसांनी घेतलेला बदला म्हणणे आपल्या शूर जवानांवर अन्याय करणारे आहे.

कधी कधी गस्त घालताना सुरक्षा दलांच्या जवानांकडून एखादी चूक होते आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागते. या महिन्याच्या व वर्षाच्या प्रारंभी बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात हुतात्मा झालेले आठ जवान व त्यांच्या वाहनाच्या चालकाचा मृत्यू असाच पुरेशी दक्षता न घेतल्याने झाला. योग्य नियोजन केले, काळजी घेतली तर किती सफाईदारपणे मोहीम फत्ते केली जाऊ शकते, हे तीन वर्षांपूर्वी मिलिंद तेलतुंबडे मारला गेला तेव्हाच्या चकमकीतून दिसून आले. त्रेसष्ट गुन्हे व पन्नास लाखांचे इनाम डोक्यावर असलेल्या तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांना गडचिरोली पोलिसांनी कंठस्नान घातले तेव्हा एकाही जवानाला साधे खरचटलेदेखील नव्हते. अशीच दक्षता आता माओवाद्यांच्या विराेधातील लढाई अंतिम टप्प्यात असताना घेणे गरजेचे आहे. सशस्त्र क्रांतीच्या नावाखाली आदिवासी मुला-मुलींना रक्तपाताच्या मार्गाला लावण्याची योजना आता शेवटचे आचके द्यायला लागली आहे. क्रांतीच्या बाता करणाऱ्यांना आता स्वत:च्या जिवाची भ्रांती सतावते आहे. खाणकाम, पोलाद उद्याेग, रोजगारनिर्मिती, शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा, रस्ते व रेल्वेचे जाळे आदींच्या माध्यमातून मध्य भारताचा हा सगळा टापू आता विकासाच्या दिशेने झेप घेऊ लागला आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने या भागातील आदिवासी बायाबापड्यांना पडू लागली आहेत. त्या स्वप्नांचा रक्तपाताने भंग होणार नाही याची काळजी धाडसी सुरक्षा दलांकडून घेतली जात आहे. हिंसाचाराचा शेवट जवळ येऊ लागला आहे.

Web Title: Today's Editorial: A fake revolution is coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.